पवित्र आत्म्याच्या आगमनाचा
रविवार
दि.२८ मे २०२३
"तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो."
✝️
आजच्या पहिल्या वाचनात स्वर्गरोहणानंतर पेन्टेकॉस्टच्या दिवशी सर्व शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला व त्याच्या सामर्थ्याने सर्व प्रेषितगण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले त्याचा वृत्तांत आहे. परमेश्वर पिता, देवपुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने प्रत्येक ख्रिस्ती माणसाला पवित्र आत्मा मिळाला आहे. प्रेषितांनी जसे प्रेरित होऊन प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देऊन सुवार्ता पसरविली तसेच आपल्या प्रत्येकाला सुवार्तेची साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
संत पौल म्हणतो त्याप्रमाणे, ‘आपल्या सर्वांना विविध कृपादाने मिळाली आहेत', त्यानुसार आपण प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. एकच आत्मा, एकच प्रभू आणि एकच देव अशा ऐक्याचे अवयव असलेले आपण पवित्र आत्म्याठायी संचरित होऊन देवाचा गौरव करु या.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये २:१-११
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि बोलू लागले. "
पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, अकस्मात मोठ्या सुसाट्यासारखावाऱ्याचा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले.त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रांतील भक्तिमान यहुदी यरुशलेममध्ये राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोधंळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आह्वयनि थक्क होऊन म्हणाले, "पाहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदीया, कप्पुदुकिया, पंत, आसियास, फ्रुगिया, पंफूलिया, इजिप्त आणि कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहुदी आणि यहुदीयमतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगतांना ऐकतो."
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०४: १,२४,२९-३१,३४
प्रतिसाद : प्रभो, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे.
१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर !
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस.
हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत!
तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे.
२) तू त्यांचा श्वास काढून घेतोस
तेव्हा ते मरून मातीत मिळतात.
तू आपला आत्मा पाठवतोस
तेव्हा ते उत्पन्न होतात आणि
तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस.
३) परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो !
परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो!
मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो.
परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल.
दुसरे वाचन करिंथ १२:३-७,१२-१३
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे."
पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही "येशू हा प्रभू आहे" असे म्हणता येत नाही. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते.
कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
पवित्र आत्म्या, ये, तुझ्या श्रद्धांवतांची हृदये व्यापून टाक आणि तुझा प्रेमाग्नी त्यांच्या हृदयात प्रज्वलित कर आलेलुया!
आलेलुया !
शुभवर्तमान योहान २०:१९-२३
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा."
त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, "तुम्हांला शांती असो." असे बोलून त्याने आपले हात आणि कूस दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, "तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो." असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, "पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: पिता आणि पुत्र ह्या मानवी नातेसंबंधाच्या संकल्पना असल्यामुळे परमेश्वरपिता आणि देवपुत्र ह्या प्रतिमा माणसाला सहज समजू शकतात. मात्र पवित्र आत्मा ही दृश्य संकल्पना नसल्याने ती मूर्त स्वरूपात व्यक्त करण्यासाठी काही प्रतीके वापरली जातात. त्यामुळे पवित्र आत्मा ही पवित्र त्रैक्यातील एक व्यक्ती आहे, तो साक्षात परमेश्वर आहे हे सत्य नजरेआड होऊ शकते. आजची वाचने पवित्र आत्म्याची प्रतीके, दाने आणि फळे आपल्यासमोर सादर करतात.
अ. पवित्र आत्म्याची प्रतीके : आजचे पहिले वाचन (प्रे. कृ. २:१-११) पवित्र आत्म्याची दोन प्रतीके आपल्यासमोर सादर करते: वारा आणि अग्नी. ही दोन्ही प्रतीके जुन्या करारात परमेश्वराच्या दिव्य उपस्थितीसाठी वापरण्यात आलेली आहेत. देवाने प्रारंभी जेव्हा आकाश आणि पृथ्वी ह्यांची निर्मिती केली तेव्हा परमेश्वराचा आत्मा जलाशयावर विहार करीत होता. मोशेला तर परमेश्वर जळत्या झुडपात प्रकट झाला. आता पेन्टेकॉस्टच्या प्रसंगी सुसाट्याचा वारा आणि अग्नीजिभा ह्यांच्या रूपाने पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला. त्यांनाही परमेश्वराच्या दिव्य उपस्थितीची जाणीव झाली. त्यांचे प्रेषितकार्य स्पष्ट झाले. ते धैर्याने देवाचे वचन सांगू लागले. ब. पवित्र आत्म्याची दाने आजचे दुसरे वाचन (१ करिंथ १२ : ३ब - ७) आपल्यासमोर दाने, सेवा आणि कृत्ये ह्यांचे उगमस्थान व हेतू स्पष्ट करते. त्यांचा उगम पवित्र क्याठायी आहे. आत्मा कृपादाने देतो, पुत्र सेवेस प्रवृत्त करतो आणि पिता कार्य करण्यास सामर्थ्य देतो. त्यांचा हेतू हा सार्वजनिक हीत हा होय म्हणजेच देवाचा गौरव आणि समाजाचे कल्याण ही पवित्र आत्म्याच्या दानांची दोन मुख्य ध्येये होत.
क. पवित्र आत्म्याची फळे : पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचे आगमन सर्वांसमक्ष झाले. पुनरुत्थानाच्या दिवशी संध्याकाळी मात्र येशूने बंद खोलीत प्रेषितांना पवित्र आत्म्याचे दान दिले (योहान २०:१९-२३). त्यानंतर ते आनंद, शांती, क्षमाशीलता अशी फळे अनुभवू लागले. आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात मी कोणकोणत्या बाबतीत पवित्र आत्म्याचे कार्य, दाने व फळे अनुभवतो ? त्यात कोणकोणते अडथळे येऊ
शकतात ?
प्रार्थना : हे पवित्र आत्मा, ये आणि तुझ्या सामर्थ्याने आमच्याद्वारे देवाची सुवार्ता पसरविण्यास आम्हाला सामर्थ्य व कृपा दे, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
.jpg)
0 टिप्पण्या