Marathi Bible Reading | Saturday 27th May 2023 | 7th Week of the Easter |

पुनरुत्थान ७वा  सप्ताह 

शनिवार  दि.२७ मे २०२३ 

  तू माझ्या मागे ये." 

✝️


कॅटरबरीचे संत अगस्तीन सण .

• महागुरू, वर्तनसाक्षी (... ६०५)

“मी जर प्रेमाने जगत नसेल तर मी मृतवत आहे. जो प्रेमाने जगतो त्याला कुठल्याही वेदनेचे दुःख होत नाही आणि जरी वेदना असलीच तरी ती प्रेमाने कुरवाळतो.” कॅटरबरीचे संत अगस्तीन

त्यागमय जीवन जगणे, देवाच्या इच्छेला प्राधान्य देणे, क्रुस व वेदनांना स्वीकारणे, प्रभूची वचने पाळून पवित्र जीवन जगणे आणि आपल्या जीवनाद्वारे  देवाची सुवार्ता पसरविणे. येशू ख्रिस्ताच्या मागे चालत असताना आपल्या  जीवनात अनेक संकटे, अडचणी व आव्हाने येणारच, मात्र त्यातून निभावून  जाण्यासाठी प्रभू येशू आपल्याला धैर्याचा व सामर्थ्याचा आत्मा देत आहे..

पहिले वाचन प्रे. कृ.  २८: १६-२०,३०-३१

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

 "पौल रोम शहरात राहिला. तेथे तो देवाच्या राज्याची घोषणा करीत असे."

आम्ही रोम शहरात गेल्यावर पौलला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.
तीन दिवसानंतर पौलने यहुद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, मी आपल्या लोकांविरूद्ध आणि पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध काही केले नसता मला येरुशलेममध्ये बंदिवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर माझ्याकडे मरणदंडास पात्र असा काही गुन्हा नसल्यामुळे ते मला सोडू पाहत होते, परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले; तरी मला आपल्या राष्ट्रांवर काही दोषारोप करावयाचा होता असे नाही. ह्याकरता तुमची भेट घेऊन तुम्हांबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हांला बोलावले, इस्त्राएलच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे.” तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११ :४-५,७

प्रतिसाद : हे प्रभो, सज्जनांना तुझे दर्शन होईल.

१) परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वराचे सिंहासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवांना पाहतात. त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात.

२) प्रभू सज्जनांची आणि दुर्जनांचीही परीक्षा करतो. पण अत्याचारी माणसांचा त्याला अगदी मनापासून वीट येतो. 

३) परमेश्वर न्यायी आहे. त्याला धार्मिकता प्रिय आहे. सज्जनांना त्याचे दर्शन होईल.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. 

आलेलुया!

शुभवर्तमान  योहान  २१:२०-२५

वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हांला माहित आहे."

पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून “प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे ?" असे म्हणाला होता त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, "प्रभू ह्याचे काय ?" येशूने त्याला म्हटले, "मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय ? तू माझ्या मागे ये." ह्यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वाच्यता बंधुवर्गामध्ये पसरली; तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय ?" असे म्हटले होते. 
जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो आणि ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन: मरणातून येशू जिवंत होऊन शिष्यांची भेट घेतो. त्यावेळचा हा प्रसंग आहे. पेत्र येशूला विचारीत आहे, “प्रभू योहानाचे काय होणार आहे?" येशू पेत्राच्या लक्षात आणून देतो की, त्याने आपले लक्ष विचलीत होऊ देऊ नये. प्रभूने त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती पार पाडण्यासाठी त्याने अखेरपर्यंत विश्वासू राहावे. ख्रिस्तसभेला योग्यरीत्या मार्गदर्शन करावे. ख्रिस्तसभेची धुरा वाहण्यासाठी पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन घ्यावे. आम्हा विश्वासूंना देखील ख्रिस्त स्मरण करून देत आहे की, शुभवर्तमानाची साक्ष देण्याचे मिशनकार्य पार पाडण्यासाठी आम्ही सदैव जागृत राहावे. जगातील विविध प्रलोभनांच्या आहारी जाऊ नये. प्रभु ख्रिस्ता तुझे निष्ठवान अनुयायी होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर.


प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगून तुला अनुसरण्यास  आम्हाला कृपा दे, आमेन.

                    पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना

हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!

आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या