सामान्यकाळातील १६वा सप्ताह
रविवार २३ जुलै २०२३
नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.
परमेश्वर सर्वदा माणसांमध्ये| चांगुलपणाची, पावित्र्याची, सात्विकतेची आणि त्याच्या अमर्याद प्रेमाची पेरणी करित असतो. आपण विश्वासाने देवाच्या देणगीचा स्वीकार करुन आपले सर्वस्व त्याच्या ठायी समर्पित करुन जीवन जगले पाहिजे. देवाने आपल्या संरक्षणासाठी आणि मार्गदर्शसाठी त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आपण सर्वदा देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणे गरजेचे आहे.
देवाचे वचन आपल्याला दिलेले आहे. आपण त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रार्थना करणे गरजेचे आहे. देवाठायी पवित्र जीवन जगण्यासाठी पवित्र आत्मा मध्यस्थी करित असतो.
देवाच्या राज्याचे वारसदार बनता यावे म्हणून आपण प्रभू कडे कृपा मागू या. सर्वस्वी देवावर भिस्त ठेवून त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगू या.
✝️
"कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या."
(येशूने लोकसमुदायापुढे दुसरा एक दाखला मांडला; "कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले; त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदण पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला आणि दाणे आले तेव्हा निंदणही दिसले. तेव्हाघरधन्याच्या दासानी येऊन त्याला म्हटले, 'महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निंदण कोठून आले ?' तो त्यांना म्हणाला, 'हे काम कोण्या वैऱ्याचे आहे.' दासांनी त्याला म्हटले, 'आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय ? तो म्हणाला, 'नाही; तुम्ही निंदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन की, पहिल्याने निंदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.')
त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणा एका मनुष्या घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर सर्व भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांदयांत वस्ती करतात.”त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही. संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून त्याने दाखले सांगितले ते असे.
"मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.” नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निंदणाच्या दाखल्याची आम्हांला फोड करून सांगा.” त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निंदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत, ते पेरणारा वैरी हा सैतान आहे, कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीला होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे आणि दातखाणे चालेल. आणि नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत ते ऐको."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
✝️
.jpg)
0 टिप्पण्या