Marathi Bible Reading |Tuesday 10th October 2023| 27th week in ordinary Time |

 सामान्यकाळातील २७वा सप्ताह 

मंगळवार १० ऑक्टोबर २०२३

 मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, 

Mary has chosen the good portion, 
  ✝️ 


संत फ्रान्सिस बोर्जिया
वर्तनसाक्षी (१५१०-१५७२)

 ✝️ 

येशुसंघामध्ये राहून संत फ्रान्सिस बोर्जिया ह्याने बरीच प्रगती केली. संत इग्नेशिअसने त्याला प्रथम खडतर मिशन भागात पाठविले. तिथे आपली पात्रता सिद्ध केल्यानंतर त्याला स्पेन, पोर्तुगाल, ईस्ट व वेस्ट इंडिज भागात (कार्यकारी) कमिशनर जनरल म्हणून नियुक्त केले. ह्या कार्यासाठी पुढील सात वर्षे त्याला बराच प्रवास करावा लागला. त्याने बरीच महाविद्यालये उघडली. वीस नवशिष्यालये बांधली आणि सर्वत्र येशूसंघियांसाठी नवनवे मित्र जमविले. येशूसंघियांचे दुसरे जनरल फा. लायनेझ ह्यांनी फ्रान्सिसला १५६१ साली विकर जनरल ही पदवी दिली. चार वर्षानंतर फा. लायनेस ह्यांच्या मृत्यूनंतर फ्रान्सिस जगभरच्या येशूसंधियांचे तिसरे फादर जनरल म्हणून निवडले गेले.त्याच वेळी पोप पायस पाचवे हे संत पीटरच्या आसनावरून ख्रिस्तसभेचा कारभार पाहात होते. धार्मिक सुधारणावादी चळवळीच्या त्या काळात संत चार्ल्स बोरोमियो, संत फिलीप नेरी आणि संत पीटर कनेशिअस सारखे ख्रिस्तसभेचे सरदार पोपमहाशयांना आधार देत होते. त्यात आता फ्रान्सिस बोर्जिया ह्यांची भर पडली.येशूसंघियांचे जनरल या नात्याने संत फ्रान्सिस बोर्जिया ह्यांनी अलिकडेच स्थापन झालेला येशूसंघ नावारूपाला आणला, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम आणि पोलंडसारख्या देशात त्यांनी ३१ नवीन महाविद्यालये स्थापन केली. त्यांच्या  कारकीर्दीत येशुसंघाचे कार्य फ्लोरिडा, मेक्सिको, पेरू आणि क्रेतसारख्या बेटांपर्यंत जाऊन पोहचले. तसेच जपानसारख्या देशात ६६ येशूसंघीय मिशनऱ्यांनी ख्रिस्तसभेच्या वाढत्या वेलीला आपल्या रक्तसाक्षित्वाने सिंचन घातले. 

पोप महाशयांच्या आदेशानुसार स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्ससारख्या देशांशी बोलणी करण्यासाठी जात असताना १० ऑक्टो. १५७२ साली संत फ्रान्सिस बोर्जिया ह्यांना देवाज्ञा झाली. पोप क्लेमेंट दहावे ह्यांनी १६७० साली त्यांना संताच्या मालिकेमध्ये समाविष्ट केले. देऊळमातेने त्यांना पोर्तुगालचा आश्रयदाता संत म्हणून गौरविले आहे.

चिंतन : लोकांनी आपल्याला कसेही वागविले तरी आपण मात्र सत्पथावरील आपला प्रवास थांबविता कामा नये. विशेषत: देवाला प्रसन्न करण्यासाठी आवश्यक तो अभ्यास करीतच राहावे. - संत फ्रान्सिस बोर्जिया

✝️

पहिले वाचन :योना ३:१-१०
वाचक : योनाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"निनवेतील लोक आपल्या कुमार्गापासून वळले,
तेव्हा देवाला अनुताप झाला.' परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले की, "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि मी तुला सांगेन तो संदेश त्याला जाहीर कर." तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवे येथे गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते, ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत. योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता घोषणा करीत गेला की, चाळीश दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीला मिळेल! तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपवास घोषित केला आणि श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणपाट नेसले.
निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला आणि आपल्या अंगातला झगा काढून गोणपाट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला आणि सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की, “कोणाही माणसाने, पशूने, गुराढोरांनी आणि शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये अगर पाणी पिऊ नये. मनुष्याने आणि पशूने गोणपाट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या अत्याचारापासून मागे फिरावे. कोणी सांगावे? देव कदाचित वळेल आणि त्याला अनुताप होईल आणि तो आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही."देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत ते पाहिले, तेव्हा त्याच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी त्याला अनुताप झाला आणि त्याने त्यांच्यावर अरिष्ट आणले नाही.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Jonah  3:1-10

The word of the Lord came to Jonah the second time, saying, "Arise, go  to Nineveh that great city, and call out against it the message that I tell you." So Jonah arose and went to Nineveh, according to the word of the Lord. Now Nineveh was an exceedingly great city, three days' journey in breadth. Jonah began to go into the city, going a day's journey. And he called out, "Yet forty days, and Nineveh shall be overthrown!" And the people of Nineveh believed God. They called for a fast and put on sackcloth, from the greatest of them to the least of them. The word reached the king of Nineveh, and he arose from his throne, removed his robe, covered himself with sackcloth, and sat in ashes. And he issued a proclamation and published through Nineveh, "By the decree of the king and his nobles: Let neither man nor beast, herd nor flock, taste anything. Let them not feed or drink water, but let man and beast be covered with sackcloth, and let them call out mightily to God. Let everyone turn from his evil way and from the violence that is in his hands. Who knows? God may turn and relent and turn from his fierce anger, so that we may not perish." When God saw what they did, how they turned from their evil way, God relented of the disaster that he had said he would do to them, and he did not do it.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १३०:१-४,७-८ 

प्रतिसाद : प्रभो, तू आमचा अधर्म लक्षात आणशील तर तुझ्यापुढे कोण वाचेल ?

१) हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे 
प्रभो, माझी वाणी ऐक, माझ्या विनवणीच्या 
शब्दांकडे तुझे कान लागोत.

२) प्रभो, तू आमचा अधर्म लक्षात आणशील,
तर प्रभो, तुझ्यापुढे कोण वाचेल ?
तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.

३) कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे,
त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे, 
तो इस्राएलला त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करील.



Psalm 130:1-4, 7bc-8 

If you, O Lord, should mark iniquities, Lord, who could stand?

 Out of the depths cry to you, O Lord; 
Lord, hear my voice!
O let your ears be attentive 
to the sound of my pleadings. R 

If you, O Lord, should mark iniquities, 
Lord, who could stand?R

But with you is found forgiveness,
that you may be revered. R

For with the Lord there is mercy, 
in him is plentiful redemption.
 It is he who will redeem Israel 
from all its iniquities.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
 तुझे नियम मला समजावून दे,
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
 आलेलुया!

Acclamation: 
Blessed be those who hear the word of God and keep it.

शुभवर्तमान   लूक   १०:३८-४२
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“मार्थाने येशूचे आपल्या घरी स्वागत केले, मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे."

येशू एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन त्यांना म्हणाली, "प्रभो, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा." प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 10:38-42

At that time: Jesus entered a village. And a woman named Martha welcomed him in her house. And she had a sister called Mary, who sat at the Lord's feet and listened to his teaching. But Martha was distracted with much serving. And she went up to him and said, "Lord, do you not care that my sister has left me to serve alone? Tell her then to help me." But the Lord answered her, "Martha, Martha, you are anxious and troubled abou many things, but one thing is necessary. Mary has chosen the good portion, which will not be taken away from her."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
मार्था - मरिया दोघी बहिणी. एक सेवा करत आहे तर दुसरी प्रभूचा शब्द ऐकत आहे. दोघीही प्रभूला संतोष होईल तेच करत होत्या. मात्र मार्थाचे लक्ष शारीरिक अन्नावर होते तर मरियेने आध्यात्मिक अन्नाला महत्त्व दिले. मार्थाची तारांबळ उडताच तिने प्रभूकडे तक्रार केली. परंतु प्रभूने मार्था येथे बस व ऐक असे सांगितले नाही किंवा मरियेला जा आणि तुझ्या बहिणीला मदत कर असे सांगितले नाही. कारण दोन्ही गोष्टी आवश्यक होत्या. काही लोक आपला वेळ सेवेसाठी किंवा देव कार्यासाठी देतात. तर काही लोक आपला वेळ प्रार्थना व मनन चिंतनासाठी देतात. मात्र त्यांनी एकमेकांची टिका न करता जे काही ते करतात ते ख्रिस्ताच्या प्रीतीखातर करावे म्हणजे ते प्रभूला संतोषकारक असेल. आपण सेवेसाठी देतो तो वेळ आणि प्रार्थना भक्तीसाठी देतो ती वेळ या दोहोमध्ये आपल्या वैयक्तिक जीवनात समतोल साधला पाहिजे. सर्व गोष्टीं मध्ये ख्रिस्ताबरोबर आध्यात्मिक सहभागिता असणे..... "जो माझ्यामध्ये राहातो आणि मी ज्याच्यामध्ये राहातो, तो पुष्कळ फळ देतो” कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही.. याहोन १५:५. यास्तव सेवा व प्रार्थना ह्याचा समतोल राखून मरियेसारखा आपल्या जीवनात चांगला वाटा निवडून घेणे रास्त आहे.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझी वाणी ऐकण्यास व तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमच्या कुटुंबात तु ये आणि वस्ती कर, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या