आगमन काळातील
रविवार
३१ डिसेंबर २०२३
पवित्र कुटुंबाचा सण
✝️
हा प्रभूचा शब्द आहे.
जयघोष
ते बालक शरीराने व ज्ञानाने वाढले.
मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे येशूबाळ व मरिया ह्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर योसेफ व मरिया हे येशूबाळाला वर येरुशलेमला घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे. म्हणजे "प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा." असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिल्ले यांचा यज्ञ करावा. तेव्हा पाहा, (शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य येरुशलेम येथे होता, तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलच्या तारणाची वाट पाहत होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईवडील येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले :"हे प्रभो, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे."त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचे वडील व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, "पाहा, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे, ह्यासाठी इस्त्राएलात अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे." आणि पाहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तरवार भोसकून पार जाईल.)हन्ना नावाची एक संदेष्टी होती, ती आशेरच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुशलेमच्या मुक्ततेची वाट पाहात होते त्या सर्वांना त्याच्याविषयी सांगू लागली. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर योसेफ, मरिया व येशू गालिलात आपले गाव नाझरेथ येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.
✝️

0 टिप्पण्या