आगमनकाळातील तिसरा सप्ताह
मंगळवार १९ डिसेंबर २०२३.
✝️
"जखऱ्या , भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे.
यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबियाच्या वर्गातील जखऱ्या नावाचा याजक होता. त्याची पत्नी अहरोनच्या कुळातील असून तिचे नाव अलिशबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा आणि विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते. उभयता वयातीतही झाली होती.
एकदा जखऱ्या आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आलेले याजकाचे काम करीत असता, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखऱ्या अस्वस्थ आणि भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, "जखऱ्या , भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि त्याचे नाव 'योहान' ठेव.
त्याच्या जन्माने तुला आनंद होईल आणि उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील.
कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल, तो द्राक्षरस आणि मद्दय कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.
तो इस्राएलच्या संतानांतील पुष्कळांना त्याचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. बापांची अंत:करणे मुलांकडे आणि आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल."
तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला, "हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे आणि माझी पत्नीही वयातीत आहे." देवदूताने त्याला उत्तर दिले, "मी देवासमोर उभा राहणार आहे आणि तुझ्याबरोबर बोलायला व ही सुवार्ता तुला कळवायला मला पाठवण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही. कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाही." इकडे लोक जखऱ्याची वाट पहात होते आणि त्याला पवित्रस्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्याला पवित्रस्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले. तो त्यांस खुणा करीत होता आणि तो तसाच मुका राहिला. मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला.
✝️

0 टिप्पण्या