सामान्यकाळातील २० वा सप्ताह
सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५
“पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून गरिबांना दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये."
"If you would be perfect, go, sell what you possess and give to the poor, and you will have treasure in heaven; and come, follow me."
संत हेलेना
सम्राज्ञी (--- २५०-३३०)
कॉन्स्टॅन्टाईन द ग्रेट ह्या सम्राटची माता हेलेना ही पूर्वी बिथानिया येथल्या उतारशाळेची प्रमुख होती. अत्यंत नम्र वृत्तीची असलेल्या या स्त्रीच्या जीवनात आर्मी ऑफिसर असलेला कॉन्स्टॅन्शिअस हा अधिकारी आला आणि तिचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.
मात्र वीस वर्षानंतर कॉन्स्टॅन्शिअस ह्याने राज्यपदावर असताना तिला घटस्फोट दिला आणि केवळ राजकीय कारणास्तव तिला टाकून दिले. परंतु पुढे कॉन्स्टॅन्टाईन द ग्रेट हा तिचा मुलगा जेव्हा वडिलांच्या जागेवर आला तेव्हा तो आपल्या आईशी एकनिष्ठ राहिला आणि त्याने तिला मोठ्या सन्मानाची वागणूक दिली.
इ. स. ३१३ साली कॉन्स्टॅन्टाईन राजाने मॅक्सेन्शिअसवर विजय मिळविला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्याच्याबरोबर राजमाता हेलेना हिने देखील ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. तिची नम्र आणि सौजन्यशील आणि तितकीच अधिकारवाणीने युक्त असलेली प्रतिमा ख्रिस्ती श्रद्धा पसरविण्यास सहाय्यभूत ठरली.
आपल्या ऐश्वर्याचा व दानशूरवृत्तीचा वापर करून राणी हेलेना हिने युरोपभर अनेक ख्रिस्तमंदिरांची उभारणी केली, शेवटी वयाच्या ७५ व्या वर्षी तिने पवित्र नगरी जेरूसलेमची यात्रा सुरू केली. तिथे गेल्यावर येरूशलेमनजीक 'स्वर्गारोहणाचा पर्वत म्हटलेल्या ठिकाणी आणि बेथलेहेम गोठ्याच्या गुहेजवळ अशी दोन चर्चेस बांधली. '
रोममध्ये तिने आपल्या राजमहालाचे रूपांतर एका भव्य ख्रिस्तमंदिरात केले. आजही त्या मंदिरात ख्रिस्ताला ज्या क्रुसावर ठार मारण्यात आले तो क्रूस व पिलाताचा लेख ठेवण्यात आलेला आहे. संत हेलेना ही सुई व खिळे तयार करणाऱ्यांची आश्रयदाती संत मानली गेलेली आहे.-------------
देवाची आज्ञा न पाळता अन्य देवातांची सेवा करुन इस्त्राएली लोकांनी भ्रष्टतेचा मार्ग अवलंबिला. तरी सुद्धा देवाने शास्ते पाठवून इस्त्राएली जनतेला संरक्षण दिले. परमेश्वराच्या आज्ञा पालनामुळेच त्याची अनुकंपा जाणवते व कृपा अनुभवावयास मिळते. देव प्रीति आहे, म्हणूनच भरकटेल्या इस्त्राएली जनतेला देवाने वेळोवेळी सन्मार्गावर आणले.
आजच्या शुभवर्तमानातील तरुण नियमशास्त्रातील देवाच्या आज्ञांचे पालन करणारा जिज्ञासु माणूस होता. सार्वकालिक जीवनाची प्राप्ती आपणास व्हावी अशी त्या तरुणाची इच्छा होती; मात्र एका गोष्टीची उणीव त्याच्या मध्ये होती. कारण तो आत्मत्याग करुन शेजाऱ्यांवर प्रीति करावयास तयार नव्हता. परमेश्वर प्रीतिआणि परस्पर प्रीतिची आज्ञा पाळण्यास प्रभू येशूने आपल्या सर्वांना आज्ञापिले आहे. विशेषरितीने प्रभूने आपल्या सर्वांना त्याचे अनुकरण करण्यासाठी आवाहन केले आहे. येशूच्या मागे जाणे म्हणजे त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणे. आपल्या प्रमाणेच आपण इतरांसाठी त्याग करायला शिकणे.
श्रीमंती ही स्वर्गराज्यासाठी आडकाठी बनू शकते. श्रीमंत तरुण त्याग करायला तयार नव्हता. आज आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या. देवाच्या आज्ञा पाळण्यास आडकाठी बनणाऱ्या कोणत्या गोष्टी आपण सोडायला तयार नाहीत. प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास कोणत्या स्वार्थी गोष्टींना आपण चिकटून राहतो.देवासाठी, स्वत:साठी तसेच इतरांसाठी सुद्धा आपल्याला जगता यावे म्हणून आत्मत्याग व सेवा करण्यासाठी प्रेरणा मागू या.