Marathi Bible Reading | 30th week in ordinary Time | Saturday 1st November 2025

सामान्यकाळातील ३० वा सप्ताह 

शनिवार दि. १ नोव्हेंबर  २०२५

 
"आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. "
Rejoice and be glad, for your reward is great in heaven.
  ✝️ 

सर्व संतांचा सोहळा

ख्रिस्तसभा आज सर्व संतांचा सन्मान करुन आनंद व्यक्त करीत आहे. संत पदाला पोहोचणाऱ्या सर्वाबद्दल आजचे पहिले वाचन सांगत आहे, 'मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत, ह्यांनी आपले झगे कोकऱ्यांच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.' ह्याचाच अर्थ सर्व संतांनी देवाच्या गौरवासाठी आणि सुवार्तेसाठी त्यागमय जीवन जगून आपले सर्वस्व समर्पित केले होते. विशेषतः संतांनी पूर्णपणे ख्रिस्ताचे अनुकरण केले.
देऊळमाता आज सर्व संतांचा सन्मान करीत आहे. ह्या व्यक्ती संतपदाला पोहोचलेले असोत, धन्यवादित असोत, की संतपदाच्या प्रक्रियेत सामावलेले असोत, देऊळमाता त्यांना विशेष मिस्सावलीद्वारे गौरविते. असे करून आपण साहजिकच पवित्र आत्म्याचाच गौरव करीत असतो. कारण त्यानेच सर्वांना परिपूर्णतेकडे जाण्यास सामर्थ्य आणि प्रेरणा दिलेली आहे.
संत थॉमस अक्वायनस म्हणतात, “आपणासाठी मध्यस्थी करावी म्हणून
आपण संतांकडे प्रार्थना करणे आवश्यक आहे का?” आणि त्याचे उत्तर देताना तेच म्हणतात,” “देवाचे मार्गच मुळी असे आहेत की आपण संतांच्या
मध्यस्थीद्वारे देवाकडे जावे." त्याचा दैवी चांगुलपणा केवळ संतांच्याद्वारे
आपल्याला त्याची कृपादाने पुरविण्यास पुरेसा आहे. जर देवाचा कृपाशीर्वाद
संतांच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचत असेल तर त्यांच्याच माध्यमातून
आपण देवाकडे जावे हे साहजिकच आहे.
ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की देवाची दया आणि सामर्थ्य ह्यांना मर्यादा आहेत. उलट देवाने निर्माण केलेल्या सृष्टीचा जो क्रम आहे त्यावर अशा मार्गाद्वारे शिक्कामोर्तब केले जाते. निसर्गचक्र हे परस्परावलंबी आहे. जे लहान आणि कमी क्षमतेचे असते त्याला मोठ्या आणि अधिक क्षमतेच्या मदतीची आवश्यकता असते. “सूर्याविना चंद्र प्रकाशू शकत नाही.”

संत अल्फोन्सस म्हणतात, संतांच्या जीवनावरून आपल्याला देवाच्या प्रेमाची अगाधता, लांबी, रुंदी, उंची, खोली आणि व्याप्ती कळून येते. त्याबरोबर त्यांच्या जीवनावरून मानवाचे देवावरील एकनिष्ठ आणि त्यागमय प्रेम व्यक्त होते. ते पुढे म्हणतात, पावित्र्याची ओढ जो आपल्या मनात बाळगत नाही तो ख्रिस्ती असेल खरा, परंतु तो चांगले ख्रिस्ती जीवन जगूच शकत नाही.
इ. स. १५४८ साली ट्रेंट येथे भरलेल्या जागतिक ख्रिस्ती धर्मपरिषदेमध्ये पुढील शिकवण देण्यात आली; देव आपणाकडून अशक्य अशा गोष्टींची अपेक्षा करीत नाही. त्याचे नियम व कायदे आपल्या कुवतीचा व ऐपतीचा अंत पाहण्यासाठी नसतातच मुळी! जे आपण करू शकत नाही ते तो आपल्याकडून करून घेऊ इच्छित नाही. केवळ त्याच्याच मदतीने व कृपेने आपण संतपदाला पोहोचू शकतो.
अविलाची संत तेरेजा म्हणते, ह्या पृथ्वीतलावरील जीवनातही देव आपल्या चांगल्या इच्छा व हेतूंबद्दल आपल्याला गौरवित असतो.

संत अल्फोन्सस विचारतात "जर आपण देवाशी कुत्सित वृत्तीने आणि कुरकुर करीत वागलो तर त्याच्याकडून आपण श्रेष्ठ कृपादानांची अपेक्षा कशी काय बाळगावी बरे?”
संत एफ्राइम आणि संत जॉन क्रिझोस्टोम ह्यांच्या मते, “चौथ्या शतकामध्ये एका विशिष्ट दिवशी सर्व रक्तसाक्ष्यांचा सन्मान करण्यासाठी भाविक देवळामध्ये एकत्र जमत असत. पुढे आठव्या शतकात रोम शहरात हा दिवस १ नोव्हेंबर असा निश्चित करण्यात आला. पोप ग्रेगरी चौथे ह्यांनी त्यानंतर हा दिवस संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेसाठी सर्व संतांचा सोहळा म्हणून अधिकृतरित्या जाहीर केला.”
या दिवशी धर्मगुरू आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांच्या हेतूंसाठी मिस्सावली अर्पण करतात.
चिंतन : एखादा संत पाहणे किती भाग्याचे! त्या संतांच्या सहवासात राहणे तर सद्भाग्याचे आणि त्याहूनही परमभाग्य संत होण्याचे ! -संत अगस्तीन

पहिले वाचन : प्रकटीकरण  ७:२-४, ९-१४ 
वाचन :प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"सर्व राष्ट्रे, वंश लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, मोठा लोकसमुदाय माझ्या दृष्टीस पडला."
मी, योहान ह्याने, एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला आणि समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, "आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला आणि झाडांना उपद्रव करू नका.” ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली, इस्राएल लोकांच्या सर्व वंशापैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.
ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र लोकसमुदाय राजासनासमोर आणि कोकराच्या पुढे उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते: “ राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकराकडून, तारण आहे.” तेव्हा राजासन, वडीलमंडळ आणि चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले "आमेन. : धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य आणि बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहत. आमेन.”
तेव्हा वडीलमंडळापैकी एकाने मला म्हटले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत आणि कोठून आले?” मी त्याला म्हटले, "प्रभो, हे तुला ठाऊक आहे." तो मला म्हणाला, “मोठया संकटातून येतात ते हे आहेत, ह्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Revelation 7:2-4, 9-14

1, John, saw another angel ascending from the rising of the sun, with the seal of the living God, and he called with a loud voice to the four angels who had been given power to harm earth and sea, saying, "Do not harm the earth or the sea or the trees, until we have sealed the servants of our God on their foreheads." And I heard the number of the sealed, one hundred forty-four thousand, sealed from every tribe of the sons of Israel. After this I looked, and behold, a great multitude that no one could number, from every nation, from all tribes and peoples and languages, standing before the throne and before the Lamb, clothed in white robes, with palm branches in their hands, and crying out with a loud voice, "Salvation belongs to our God who sits on the throne, and to the Lamb!" And all the angels were standing round the throne and round the elders and the four living creatures, and they fell on their faces before the throne and worshipped God, saying, "Amen! Blessing and glory and wisdom and thanksgiving and honour and power and might be to our God for ever and ever! Amen." Then one of the elders addressed me, saying, "Who are these, clothed in white robes, and from where have they come?" I said to him, "Sir, you know." And he said to me, "These are the ones coming out of the great tribulation. They have washed their robes and made them white in the blood of the Lamb.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  २४:१-२, ३-४, ५-६
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तुझ्याठायी माझा समेट घडव.
हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत.

१ ) पृथ्वी आणि तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे, 
जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. 
कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, 
त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.

२) परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल ? 
त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? 
ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि 
ज्याचे मन शुध्द आहे, 
जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो.

३. ) त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, 
आपल्या उध्दारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल.
 त्याला शरण जाणारे हेच लोक होत, 
हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी 
आतुर असलेले हेच लोक होत.

Psalm 24:1-2, 3-4ab, 5-6
These are the people who seek your face, O Lord.

The Lord's is the earth and its fullness, 
the world, and all those who dwell in it.
It is he who set it on the seas; 
on the rivers he made it firm. R

Who shall climb the mountain of the Lord? 
Who shall stand in his holy place?
The clean of hands and pure of heart, 
whose soul is not set on vain things. 

Blessings from the Lord shall he receive, 
and right reward from the God who saves him. 
Such are the people who seek him, 
who seek the face of the God of Jacob. R

दुसरे वाचन : १योहान ३:१-३
वाचन :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"परमेश्वर आहे तसाच तो आपल्याला दिसेल."

आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोच ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही, तरी ती प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा शुध्द आहे, तसे आपणाला शुध्द करतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading :1 John 3:1-3

Beloved: See what kind of love the Father has given to us, that we should be called children of God; and so we are. The reason why the world does not know us is that it did not know him. Beloved, we are God's children now, and what we will be has not yet appeared; but we know that when he appears we shall be like him, because we shall see him as he is. And everyone who thus hopes in him purifies himself as he is pure.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
 प्रभू म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, 
 तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
 आलेलुया!

Acclamation: 
 R. Alleluia, alleluia.
Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest, says the Lord.

R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   मत्तय  १४:१२-१४
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. "

लोकसमुदायाला पाहून तो डोंगरावर चढला आणि तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागलाः
"जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
“जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.
“जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील..
“जे नीतिमत्वाचे भुकेले आणि तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
“जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.
“जे अंतःकरणाचे शुध्द ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
“जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. "नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

“माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुमच्याविरुध्द सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.'

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 5:1-12a

At that time: Seeing the crowds, Jesus went up on the mountain, and when he sat down, his disciples came to him. And he opened his mouth and taught them, saying: "Blessed are the poor in spirit, for theirs is the kingdom of heaven. Blessed are those who mourn, for they shall be comforted, Blessed are the meek, for they shall inherit the earth. Blessed are those who hunger and thirst for righteousness, for they shall be satisfied. Blessed are the merciful, for they shall receive mercy. Blessed are the pure in heart, for they shall see God. Blessed are the peacemakers, for they shall be called sons of God. Blessed are those who are persecuted for righteousness' sake, for theirs is the kingdom of heaven. Blessed are you when others revile you and persecute you and utter all kinds of evil against you falsely on my account. Rejoice and be glad, for your reward is great in heaven.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:  
ख्रिस्तमंडळाने आपले निकश लावून संत घोषित केले आहेत. त्यात हुतात्मा आहेत, कुमारिका आहेत, धर्मगुरू आहेत, धर्मपंडित आहेत... इत्यादी. त्यांची नावे आपल्याला माहिती आहेत. त्यांचे सण व स्मृतिदिन चर्चच्या वार्षिक उपासनेत नमूद केले आहेत. त्यांचे स्मृतिदिन आपण त्यांना दिलेल्या दिवशी उपासनेत (मिस्सात) आपण स्मरतो व त्यांची मध्यस्थी भाकीत असतो. कारण ते स्वर्गात कोकरासमोर मध्यस्थी करित असतात. त्यांच्याशिवाय हजारो माणसे स्वर्गात आहेत. ते आपल्या जीवनात विविध छळवणुकीतून व दुःखातून पार गेले आहेत. मात्र त्यांची नावे आपल्याला माहीत नाहीत. पण ते आपल्यासाठी कोकरासमोर मध्यस्थी करित असतात. अशा सर्व संत मंडळीची आज आपण सामुहिकपणे पवित्र मिस्सात आठवण करतो.

प्रार्थना : हे माझ्या आश्रमदात्या संत (नाव), तुझ्या गुणांचे अनुकरण करण्यास व ख्रिस्ताची साक्ष जगाला देण्यास मला प्रेरणा लाभावी म्हणून माझ्यासाठी विनंती कर आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या