सामान्यकाळातील ३१ वा रविवार
दि. २ नोव्हेंबर २०२५
स्वर्गातील सर्व संतांचा सन्मान केल्यानंतर विश्वव्यापी ख्रिस्तसभा शुद्धीस्थानातील आत्म्यांना शांती लाभावी म्हणून प्रार्थना करते, ह्यावरून देऊळमाता केवळ संतांचा परस्पर संबंधच नव्हे तर पृथ्वीतलावरील मानवाशी व मृत बंधुभगिनींशी असलेले आपले अतूट नाते व्यक्त करते. १५४८ साली ट्रेंट येथे भरलेल्या जागतिक ख्रिस्तसभेच्या धर्मपरिषदेमध्ये शुद्धीस्थानातील आत्म्यांना आपल्या प्रार्थना व दानधर्माद्वारे आपण सहाय्य करावे म्हणून प्रार्थना करण्यात आली. विशेषत: अशा आत्म्यांसाठी मिस्सा अर्पण केल्याने त्यांचे आत्मे प्रभूठायी विसावा पावतात अशी ख्रिस्तसभेची शिकवण आहे.
शुद्धीस्थानातील आत्मे परस्परांना मदत करण्यास असमर्थ असतात. त्यामुळे ते सर्वस्वी संतांच्या मध्यस्थीवर आणि आपल्या विश्वासू जनतेच्या प्रार्थना दानधर्मावर विशेषतः पवित्र मिस्साच्या कृपेवर अवलंबून असतात. परिपूर्ण पश्चात्ताप माणसाला परिवर्तनाकडे नेतो. अपूर्ण पश्चात्ताप त्याला अपराधी भावनेपासून तात्पुरती मुक्ती देतो. ह्या पृथ्वीतलावर वावरताना माणसाने पुरेसा पश्चात्ताप केलेला नसेल तर त्याची परिपूर्ती शुद्धीस्थानात केली जाते.
मृत भाविकांच्या आत्म्यासाठी मिस्सा अर्पण करण्याची परंपरा पाचव्या शतकापासून चालत आलेली आहे. क्लुनीचे संत ओडिलो ह्यांनी मात्र ही परंपरा विश्वव्यापी ख्रिस्तसभेला लागू केली व सर्वत्र २ नोव्हेंबर ह्या दिवशी सर्व मृत भाविकांसाठी मिस्साबली अर्पण करण्यात येऊ लागला.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी असंख्य माणसे मरण पावली. त्या परिस्थितीत पोप बेनेडिक्ट पंधरावे ह्यांनी १९१५ साली धर्मगुरूंना एक विशेष अधिकार दिला. ह्या अधिकारानुसार धर्मगुरू ह्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करू शकतात. पहिली मिस्सा शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी, दुसरी पोपमहोदयांच्या हेतूंसाठी आणि तिसरी धर्मगुरूंच्या हेतूंसाठी.
कॅथलिक पंथामध्ये ह्या दिवशी मृतांच्या खाचेवर प्रार्थना केली जाते. मेणबत्त्या पेटविल्या जातात. चर्चच्या घंटा वाजविल्या जातात.
चिंतन : मृत माणसे पापांपासून मुक्त व्हावीत म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हा एक पवित्र आणि परिपूर्ण विचार आहे.-२ मक्काबी १२:४६
आजच्या दिवशी दफनभूमीत जाऊन पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होणे व मृत भाविकांना श्रद्धांजली वाहून प्रार्थना करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. संत पौलाने म्हटले आहे, “आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे” (रोमकरांस ६:८).
0 टिप्पण्या