आगमनकाळातील पहिला सप्ताह
मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५
“तुम्ही जे पाहत आहा ते पाहणारे डोळे धन्य होत.
"Blessed are the eyes that see what you see!
✝️
संत बिबियाना
कुमारिका व रक्तसाक्षी (३६३)
रोम शहरामध्ये पाचव्या शतकात संत बिबियाना हिच्या नावाने एक ख्रिस्तमंदिर उभारण्यात आले होते. त्यामध्ये तिचा मृत देह अविनाशी अशा अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेला होता. पोप संत सिम्प्लीसिऊस ह्यांनी ते मंदिर आशीर्वादित केले होते. तिचे दुःखसहन आणि त्यामागची पार्श्वभूमी ह्याविषयी इतिहासात काहीच माहिती उपलब्ध नाही.
एका मौखिक परंपरेनुसार रोम शहराचे माजी प्रमुख फ्लेवियन आणि त्याची पत्नी डॅफ्रोझा ह्यांची बिबियाना ही मुलगी होती. दोघेही पती-पत्नी खूप श्रद्धाळू व धार्मिक वृत्तीचे जीवन जगत होते. त्यांच्या दृढ श्रद्धेमुळे संतापून मूर्तिपूजकांनी फ्लेवियन ह्याला तापत्या लोखंडी सळीने भाजून काढले. त्याचा चेहरा विद्रूप करून टाकला व त्याला एका जंगलात हाकलून दिले. तिथे जखमी अवस्थेत तो मरण पावला.
बिबियानाची आई हीसुद्धा आपल्या पतीप्रमाणे अतिशय भक्तिमान व साध्वी वृत्तीचे जीवन जगत होती, त्यामुळे तिचाही तसाच छळ करण्यात आला. तिला बराच वेळ एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले व शेवटी तिचा शिरच्छेद करण्यात आला.
त्यांच्या मागे उरलेल्या बिबियाना आणि डेमेट्रीया ह्या दोन बहिणींना खूप दारिद्र्याचे जीवन जगावे लागले. त्यांच्याकडची सर्व संपत्ती व मालमत्ता मूर्तिपूजकांनी व त्यांच्या मातापित्याच्या मारेकऱ्यांनी त्यांच्याकडून हिरावून घेतली. पाच महिने ह्या दोन कुमारिका उघड्यावर वणवण हिंडू लागल्या. परंतु अशाही अवस्थेत उपवास व प्रार्थना करीत दोघींनी ते दिवस कृपावंत करून टाकले.
रोमचा राज्यपाल ॲप्रोनियानुस ह्याने ज्युलियन ह्या सम्राटाच्या काळात ह्या दोन्ही बहिणींना आपणासमोर हजर होण्याचा हुकूम सोडला. बिबियानाची बहीण डेमेट्रीया हिने न्यायालयामध्ये सर्वांसमक्ष आपली ख्रिस्ती श्रद्धा धैर्याने प्रकट केली. त्यानंतर ती थरथर कापू लागली आणि काही क्षणातच खाली पडली व मरण पावली.
बिवियाना हिला त्या शहरातील कुप्रसिद्ध स्त्री रूफिना हिच्या ताब्यात देण्यात आले. ती चांगली कलावंतीण होती, परंतु तिने बिबियानाला वेगळ्या पद्धतीने छळायला सुरुवात केली. परंतु रूफिनाचे सर्व प्रयत्न असफल ठरले. तिला श्रद्धेपासून आणि शुद्धतेपासून छळण्याचा रूफिनाने खूप खूप प्रयत्न केला पण सारे मुसळ केरात !
शेवटी बिबियाना हिला एका खांबाला बांधण्यात आले. काटेरी चाबकाने तिला फोडून काढण्यात आले. मरेपर्यंत तिला चाबकाचे फटके मारण्यात आले. हे सर्व तिने अगदी प्रसन्नमुखाने सहन केले आणि आपल्या मारेकऱ्यांच्या समोर तिने आपली मान टाकली.
बेवारशी कुत्र्यांनी तिचे शरीर फाडून खावे ह्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह उघड्यावर टाकून दिला. परंतु एकही कुत्रा तिच्या पवित्र शरीराला स्पर्श करण्यास धजला नाही. शेवटी दोन दिवसांनी तिच्या मातापित्यांच्या बहिणीच्या खाचेशेजारी जॉन नावाच्या धर्मगुरूंनी लिसिनिअस राजवाड्यानजीकच रात्रीच्या वेळी तिला पुरले.
.......
प्रेषितांनी जसा ख्रिस्त येशूचा सहवास अनुभवला तसा तो आपण सुद्धा अनुभवित आहोत. पुनरुत्थित प्रभू आपल्या मध्ये हजर आहे. त्याने केलेल्या पवित्र आत्म्याच्या वर्षावाने आपण त्याची सहभागिता अनुभवीत असतो. आजही प्रभू येशू पवित्र भाकरीच्या रुपाने आपल्याशी एकरुप होत असतो. प्रभूची वचने आपल्याला जीवनदायी मार्ग दाखविताता.आपल्या प्रार्थनेद्वारे व त्याचे वचनें आणि त्याच्या आज्ञा पाळल्यानेप्रभूचा सहवास आपल्यला मिळतो
प्रभू येशू सर्वांना तारणदायी जीवन देण्यास आणि सर्वकाळच्या आनंदात सहभागी बनविण्यास आला होत. ह्या आगमन काळात आपण त्याच्याशी एकरूप होऊन त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याची प्रयत्न करु या.
✝️
पहिले वाचन : यशया ११ :१-१०
वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर राहील."
इशायाच्या खोडाला धुमारा फुटेल. त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आणि सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे आज्ञापालन त्याला आनंददायक वाटेल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय देणार नाही. तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील. पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखरूप वेताने पृथ्वीला ताडण करील. आपल्या मुखाच्या फुंकरीने दुर्जनांचा संहार करील. धार्मिकता त्याचे वेष्टन आणि सत्यता त्याचा कमरबंद होईल.
लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू आणि सिंहाचे पिल्लू एकत्र राहतील. त्यांना लहान मूल वळील. गाय आणि अस्वल मित्र बनतील. त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. छोटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत आणि नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या समयी असे होईल की राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.