शुभवर्तमान योहान १८:१-१९:४२
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आमच्या प्रभू येशु ख्रिस्ताचे दुःखसहन
येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती. तो व त्याचे शिष्य तेथे गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परूशी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. आपणांवर जे काही येणार ते सर्व जाणून येशू बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, "तुम्ही कोणाला शोधता ?" त्यांनी त्याला उत्तर दिले, "नाझरेथकर येशूला." येशू त्यांना म्हणाला, "मीच तो आहे.' त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता. “मीच तो आहे." असे त्याने म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, "कोणाला शोधता?" ते म्हणाले, “नाझरेथकर येशूला.” येशूने उत्तर दिले, "मीच तो आहे असे मी तुम्हांला सांगितले, तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या." जे तू मला दिले आहेत त्यातून मी एकही हरवला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्रजवळ तरवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्रला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय?" मग सैनिकांची तुकडी, त्यांचा सरदार व यहुद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले. त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कयफाने यहुद्यांना मसलत दिली होती.
शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला, पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता. म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्रला आत आणले. ती तरूण द्वारपालिका पेत्रला म्हणाली, “तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय?" त्याने म्हटले, "मी नाही." थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता.
तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले, "मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात व मंदिरात सर्व यहुदी जमतात तेथे नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही. मला काय विचारता? ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा मी काय बोललो ते. पाहा, मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे" त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा असलेला एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, "तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस का ?" येशूने त्याला उत्तर दिले, "मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर, योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?" तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले.
शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला ते म्हणाले, "तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय ?" तो नाकारून बोलला, "मी नाही." ज्याचा कान पेत्रने कापून टाकला होता . त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता, तो त्याला म्हणाला, "मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले ?" पेत्रने पुन्हा नाकारले आणि लगेच कोंबडा आरवला. नंतर त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती. आपणाला विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे, म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत तेव्हा पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही ह्या माणसावर काय आरोप ठेवता? त्यांनी त्याला उत्तर दिले, "तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते." पिलातने त्यांना म्हटले, "त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियम शास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा." यहुदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही." आपण कोणत्या रीतीने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बालावून म्हणाला, "तू यहुद्यांचा राजा आहेस का? येशूने उत्तर दिले, "आपण स्वत: होऊन हे म्हणता की दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी सांगितले ?" पिलातने उत्तर दिले, "मी यहुदी आहे काय ? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले, तू काय केलेस?" येशूने उत्तर दिले, "माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सर्वांनी लढाई केली असती, परंतु माझे राज्य येथील नाही.' पिलात त्याला म्हणाला, "तर तू राजा आहेस का ? " येशूने उत्तर दिले, "मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो." पिलात त्याला म्हणाला, "सत्य काय आहे ?"
असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन त्यांना म्हणाला, “ह्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही. पण वल्हांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे, म्हणून मी तुमच्यासाठी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय ?" ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा!" बरब्बा हा एक लुटारू होता. नंतर पिलातने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकूट गुंफून त्याच्या डोक्यावर घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, "हे यहुद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो !" मग त्यांनी त्याला चपराका मारल्या. पिलातने पुन्हा बाहेर जाऊन त्यांना म्हटले, "पाहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो." ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, "पाहा, हा मनुष्य!" मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, “ह्याला क्रुसी खिळा, क्रुसी खिळा !" पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्याला नेऊन ब्रुसावर खिळा, कारण मला त्याच्या ठायी अपराध दिसत नाही." यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, "आम्हांला नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण ह्याने 11 स्वत:ला देवाचा पुत्र केले." तेव्हा पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, "तू कोठला आहेस ?" परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. ह्यास्तव पिलाताने त्याला म्हटले, "माझ्याबरोबर तू बोलत नाहीस का ? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला क्रसी खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही का?" येशूने उत्तर दिले, "आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता, ह्यास्तव ज्याने मला 33 आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे."
तरीही पिलात त्याला सोडवण्याची खटपट करीतच राहिला, परंतु यहुदी आरडाओरड करून म्हणाले, "आपण ह्याला सोडले तर आपण कैसरचे मित्र नाही, जो कोणी स्वत:ला राजा करतो तो कैसरला विरोध करतो." हे शब्द ऐकून पिलातने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात. तेव्हा वर्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे सहावा तास होता. त्याने यहुद्यांना म्हटले, "पाहा, तुमचा राजा!" ते ओरडले, "त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला क्रुसी खिळा!" पिलात त्यांना म्हणाला, "मी तुमच्या राजाला क्रुसी खिळावे काय?" मुख्य याजकांनी उत्तर दिले, "कैसरवाचून आम्हांला कोणी राजा नाही." मग त्याने त्याला क्रुसावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले.मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला क्रूस स्वत: वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूला व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूला आणि येशूला मध्ये, असे क्रुसी खिळले. पिलातने पाटी लिहून क्रुसावर लावली, तिच्यावर "यहुद्यांचा राजा नाझरेथकर येशू" असे लिहिले होते. येशूला क्रुसी खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी आणि हेल्लेणी ह्या भाषांत लिहिली होती. ह्यास्तव यहुद्यांचे मुख्य याजक पिलातला म्हणाले, "यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे, असे त्याने म्हटले, असे लिहा." पिलाने उत्तर दिले, "मी जे लिहिले ते लिहिले."
शिपायांनी येशूला क्रुसी खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेक शिपायाला एकएक वाटा असे चार हिस्से केले, त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता, ह्यास्तव ते एकमेकांस म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे. हे ह्यासाठी झाले की,
"त्यांनी माझे कपडे आपसांत वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, "बाई पाहा, हा तुझा मुलगा!" मग त्याने त्या शिष्याला म्हटले, "पाहा, ही तुझी आई!" आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने (शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून) म्हटले, "मला तहान लागली आहे." तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर,
"पूर्ण झाले आहे,' असे म्हटले आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
(थोडा वेळ शांतता पाळावी.)
तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरीरे क्रुसावर राहू नयेत (कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता). म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलातला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले, परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे. त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे. ह्यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. "त्याचे हाड मोडणार नाही" हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, "ज्याला त्यांनी विधी त्याच्याकडे ते पाहतील."
त्यानंतर अरिमथाईकर योसेफ ह्याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलातला विनंती केली, तो येशुचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता. पिलातने परवानगी दिल्यावरून त्याचे शरीर नेले. येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे शंभर रत्तल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले, त्याला क्रुसी खिळले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती, तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो यहुद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे आणि ती कबर जवळ असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
0 टिप्पण्या