सामान्य काळातील एकविसावा आठवडा
गुरुवार २७ ऑगस्ट २०२६
“जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. Watch ye therefore, because ye know not what hour your Lord will come.
जन्माने ख्रिस्ती असलेल्या मोनिका हिचे लग्न वयाच्या २० व्या वर्षी उत्तर आफ्रिकेतील तागास्ते शहरातील पॅट्रिशिअस नामक श्रीमंत (परंतु मूर्तीपूजक) अधिकाऱ्याशी झाले. हा अधिकारी मोनिकापेक्षा वयाने खूप मोठा होता, त्यांना तीन मुले झाली.
तिचे पती परधर्मीय असल्यामुळे आणि अत्यंत तापट स्वभावाचे असल्याने मोनिकाला खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्याने मुलांना ख्रिस्ती शिक्षण देणे खूप जिकिरीचे केले. परंतु मोनिकाच्या प्रार्थनेचे सामर्थ्य इतके विलक्षण होते की तब्बल अठरा वर्षांच्या वैवाहिक जीवनातील कसोटीच्या काळानंतर अखेर पॅट्रिशिअस हा अधिकारी विश्वाचा सम्राट प्रभू येशू ख्रिस्त ह्याला शरण आला. त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. परंतु लवकरच मृत्यूने त्याला मोनिकाच्या जीवनातून हिरावून नेले. एका डोळ्यात पतीनिधनाचे दुःख, तर दुसऱ्या डोळ्यात त्याने ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारल्याचे समाधान अशा मिश्र भावनांनी मोनिकाचे जीवन व्यापले गेले.
आता मोनिकाने आपले सर्व लक्ष आपल्या मुलांवर केंद्रित करण्यास सुरुवात केली. तिचा मोठा मुलगा अगस्तीन हा कार्थेज येथे अभ्यास करीत असताना 'मानिकेइझम' नावाच्या पाखंडी विचारसरणीचा बळी बनलेला होता. या विचारसरणीनुसार जगात 'चांगली व वाईट' अशा दोन शक्ती आहेत असे मानले जाते. अगस्तीनने ह्या विचारसरणीनुसार जीवन जगायला सुरुवात केली होती. तब्बल १५ वर्षे तो एका स्त्रीच्या मोहपाशात अडकून पडलेला होता.
आपल्या मुलाचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून मोनिका अश्रू ढाळून प्रार्थना करीत असे. तिला भेटलेल्या एका विशपांना तिने विनंती केली की, 'तुम्ही तरी अगस्तीनला समजावून सांगा.' हे बिशप स्वतः मानिकेइझम ह्या पाखंडवादाच्या विचारसरणीतून बाहेर पडलेले होते. त्यांनी अगस्तीनची अवस्था पाहिल्यावर या तरुणाचा कायापालट होण्यास खूप वेळ लागेल हे जाणले आणि तात्पुरते का होईना मोनिकाचे सांत्वन करीत म्हटले, "ज्या तुझ्या मुलासाठी तू अश्रू ढाळीत आहेस तो तुझा मुलगा कधीच वाया जाणार नाही." त्या विशपांचे नाव होते संत अंब्रोज (सण: ७ डिसेंबर).
पुढे अगस्तीनला रोम शहरात भाषाशास्त्र शिकविण्याची संधी चालून आली. मोनिकाने त्याच्याबरोबर रोम शहरात जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. परंतु त्याने एकटेच जाण्याचा मनोदय तिच्याकडे व्यक्त केला आणि एका जहाजाने तो रोम शहरात पोहोचला. तेथून तो मिलान शहरात गेला व त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करू लागला. मोनिकाने तिथेही त्याचा पाठलाग केला आणि मिलानचे विशप अंब्रोज ह्यांच्याशी तिने जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. विशप अंब्रोज ह्यांच्या वक्तृत्वाने व पावित्र्याने अगस्तीन इतका भारावून गेला की त्याने तात्काळ ख्रिस्ताला आपले जीवन अर्पण केले व इ.स. ३८७ सालच्या इस्टरच्या दिवशी त्याने बाप्तिस्मा घेतला..
मोनिकाची आयुष्यभराची आशा सफळ झाली. ती म्हणाली, “माझ्या मुला, माझ्या जीवनात तुला कॅथलिक झालेला पाहणे इतकेच एक ध्येय होते. देवाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा अधिकच दिले आहे. येशूचे अनुकरण अधिक जवळून करता यावे म्हणून या जगातील सर्व ऐहिक सुखांचा त्याग करण्याचे दान देवाने तुला बहाल केलेले आहे इतके मला पुरे आहे! माझे शरीर कुठेही पुरले तरी चालेल मात्र “तू देवाच्या वेदीपाशी जाशील तेव्हा माझी आठवण ठेव !"
कार्थेज येथे परतण्याच्या हेतूने मायलेक दोघे रोमहून निघाले. वाटेत ऑस्ट्रिया बंदरावर थांबलेले असतानाच मोनिकाने आपल्या मुलाच्या, अगस्तीनच्या बाहुपाशात सुखाने प्राण सोडला. त्यावेळी तिचे वय ५६ वर्षे इतके होते.
चांगल्याने वाईटावर मात कशी करायची ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत मोनिका हिचे जीवन ! तिच्याच स्मरणार्थ पॅरीस येथे 'ख्रिश्चन मदर्स असोशिएशन'ची स्थापना करण्यात आलेली आहे. हाताबाहेर गेलेल्या पती व मुलांसाठी या स्त्रिया विशेष प्रार्थना करीत असतात.
चिंतन : तिचे माझ्यावर किती प्रेम होते ते शब्दबद्ध करणे कठीण आहे. तिच्या केवळ शब्दांनीच नव्हे तर करुणायुक्त नजरेने ती आमची हृदये प्रभूकडे लावण्यास आम्हाला प्रेरणा देई... हे माझ्या देवा, 'मी जर तुझे बाळ असेन तर ते केवळ तू मला दिलेल्या प्रेमळ आईमुळेच होय.' - संत अगस्तीन
चांगल्याने वाईटावर विजय कसा मिळविता येतो ह्याचे उत्तम ! उदाहरण म्हणजे संत मोनिका हिचे जीवन. आपल्या हाताबाहेर गेलेली मुले किंवा व्यासनाधिन अथवा गैरमार्गाला लागलेल्या व्यक्तीसाठी संत मोनिकाचा आदर्श समोर ठेवून आपण प्रार्थना करू या.
आपण ह्या जगतील प्रवासी असून आपले जागतिक जीवन क्षणभंगूर आहे. म्हणूनच आपणांस लाभलेल्या सर्व वरदानांचा व कृपादानांचा उपयोग स्वतः बरोबरच इतरांच्या भल्यासाठी व्हायला हवा. आपल्या प्रत्येक वर्तणुकीचा हिशोब घेतला जाणार आहे व आपण परमेश्वराचे देणेकरीच राहणार आहोत. त्यासाठी आपल्या जीवनात देवाला अग्रस्थान देणे खूप गरजेचे आहे. स्वतः बरोबरच इतरांच्या आत्म्याची काळची घेता यावी ह्यासाठी जागृत राहून सिद्ध होण्या साठी आपण प्रयत्नशील राहू या.
पहिले वाचन : १करिथ १:१-९
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“तुम्ही ख्रिस्ताठायी प्रत्येक बाबतीत संपन्न झाला.'
करिथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या आणि पवित्रजन होण्यास बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा आणि आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पौल आणि आपला बंधू सोस्थेनेस ह्यांच्याकडूनः
देव आपला पिता आणि प्रभू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा आणि शांती असो.
ख्रिस्त येशूमध्ये तुम्हांवर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुम्हांविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो. तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हांमध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात आणि सर्व ज्ञानात संपन्न झाला, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही दोषरहित ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :: First Corinthians 1: 1-9
Paul, called to be an apostle of Jesus Christ by the will of God, and Sosthenes a brother, To the church of God that is at Corinth, to them that are sanctified in Christ Jesus, called to be saints, with all that invoke the name of our Lord Jesus Christ, in every place of theirs and ours. Grace to you, and peace from God our Father, and from the Lord Jesus Christ. I give thanks to my God always for you, for the grace of God that is given you in Christ Jesus, That in all things you are made rich in him, in all utterance, and in all knowledge; As the testimony of Christ was confirmed in you, So that nothing is wanting to you in any grace, waiting for the manifestation of our Lord Jesus Christ. Who also will confirm you unto the end without crime, in the day of the coming of our Lord Jesus Christ. God is faithful: by whom you are called unto the fellowship of his Son Jesus Christ our Lord.
This is the word of God
Thanks be to God
