28th September 2020

वाचन 1, ईयोब 1: 6-22

नंतर एके दिवशी देवपुत्र (देवदूत) परमेश्वराला भेटायला आहे. त्यांच्याबरोबर सैतानही होता.परमेश्वराने सैतानाला विचारले, “तू कोठे होतास?”सैतानाने उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडत फिरत होतो.”मग परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोबला पाहिलेस का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कुणीही नाही. तो खरोखरच फार चांगला सात्विक माणूस आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टींपासून दूर राहातो.”सैतानाने उत्तर दिले, “होय, पण त्याच्याजवळ देवाची भक्ती करण्यामागे सबळ कारण आहे.तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे.पण जर तू त्याच्या जवळ जे काही आहे त्या सगळ्यावर आघात केलास तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करील हे मी खात्रीपूर्वक सांगतो.”नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला. “बरं आहे, तू त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंचे काहीही करु शकतोस. पण तू त्याच्या अंगाला मात्र हात लावायचा नाहीस.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला.
    एक दिवस ईयोबच्या सर्वांत मोठ्या मुलाकडे त्याची इतर मुले व मुली जेवत होते व द्राक्षारस पीत होते.तेव्हा एक निरोप्या ईयोब कडे आला व म्हणाला, “बैल नांगरीत होते आणि गाढवे जवळच चरत होती. परंतु शबाई लोक आमच्यावर चाल करुन आले आणि त्यांनी तुझी गुरे पळवून नेली. त्यांनी माझ्याखेरीज इतर सर्व नोकरांना मारुन टाकले. तुला हे सांगण्यासाठी मी एकटा स्वत:चा कसाबसा बचाव करुन आलो आहे.”पहिला निरोप्या हे सांगत असतानाच दुसरा निरोप्या ईयोबकडे आला. तो म्हणाला, “आकाशातून वीज पडून तुझ्या मेंढ्या व नोकर - चाकर जळून गेले. फक्त मीच तेवढा बचावलो आहे व तुला सांगायला आलो आहे.”दुसरा निरोप्या हे सांगत असतानाच आणखी एक निरोप्या आला. तिसरा निरोप्या म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या आपल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवल्या. त्यांनी हल्ला करुन उंट पळवून नेले आणि नोकरांना मारुन टाकले. फक्त मीच त्यातून सुटून तुला सांगायला आलो आहे.”तिसरा निरोप्या हे सर्व सांगत असताना आणखी एक निरोप्या तिथे आला. चौथा निरोप्या म्हणाला, “तुझी मुले व मुली तुझ्या मोठ्या मुलाकडे खात होते व द्राक्षारस पीत होते.तेव्हा वाळवंटातून सोसाट्याचा वारा आला आणि त्याने तुझे घर पडले. घर तुझ्या मुलामुलींवर पडल्यामुळे ते मेले. केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगायला इथे आलो.” ईयोबने जेव्हा हे ऐकले तेव्हा आपल्याला खुप दु:ख झाले आहे हे दाखविण्यासाठी त्याने आपले कपडे फाडले, डोक्यावरचे केस काढले व जमिनीवर पडून त्याने देवाची आराधना सुरु केली.तो म्हणाला:“मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”या रीतीने ईयोबच्या हातून पाप घडले नाही. देवाने चूक केली आहे असे काही तो बोलला नाही. 


स्तोत्रे 17: 1, 2-3, 6-7

प्रतिसाद : हे देवा माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक.


1)परमेश्वरा, न्यायासाठी, प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझी खरी प्रार्थना ऐक.

2)तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील. तू सत्य बघू शकतोस.

3)तू माझ्या ह्दयात खोलवर पाहिलेस. तू रात्रभर माझ्या बरोबर होतास तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही. मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.

4)देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा तू मला उतर दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.

5)देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस. ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.

शुभवर्तमान, लूक 9: 46-50

आपणांमध्ये सर्वांत मोठा कोण असा शिष्यांमध्ये वाद सुरु झाला.पण येशूला त्यांच्या मनातले विचार समजले, तेव्हा त्याने एका लहान बालकाला घेतले व त्याच्याजवळ त्याला उभे केले.येशू त्यानां म्हणाला, “जो कोणी ह्या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. कारण जो कोणी तुम्हा मध्ये सर्वांत लहान बनेल तो सर्वांत मोठा आहे.”परंतु योहानाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही कोणाला तरी तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, व आम्ही त्याला मना केले, कारण आम्ही जे तुम्हांला अनुसरतो त्यापैकी तो नाही.”परंतु येशू योहानाला म्हणाला, “त्याला मना करु नका, कारण जो तुमच्याविरुद्ध नाही तो तुम्हांला अनुकूल आहे.”
                                      प्रभू चे हे शुभवर्तमान 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या