Marathi Bible Reading | Saint Cecilia | 22nd November 2020


रविवार 

२२ नोव्हेंबर २०२०

सामान्य काळातील 

चौतीसावा रविवार

संत सिसिलिया हिचा सण (रक्तसाक्षी)

ती देवाचे गुणगौरव गात मरण पावली. उपासना संगिताची आश्रयदाती संत म्हणून तिला गौरविण्यात आलेले आहे.

"ख्रिस्तासाठी मरण्याइतके दुसरे काहीही मला अधिक आनंदी करणारे नाही हे आपणांस ठाऊक नाही का?" - संत सिसिलिया

"मी सेवा करण्यासाठी आलो आहे सेवा करून घेण्यासाठी नव्हे." 

ख्रिस्तसभा आज प्रभू येशू विश्वाचा राजा हा सण साजरा करीत आहे. संत पौल आजच्या वाचनात सांगत आहे की, 'मृत्युनंतर पुनरुत्थान आहे कारण आपण पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे. मात्र सर्वांसाठी न्यायाचा दिवस येणार आहे. प्रभू येशू वैभवाने पुन्हा येणार आहे आणि वैभवशाली राजासनावर बसून तो सर्वांचा न्याय करणार आहे. प्रभू येशु स्पष्ट करीत आहे की, आपण भुकेल्यांस अन्न द्यावे, तान्हेल्यास पाणी द्यावे, परकियांस आसरा द्यावा, उघड्यास वस्त्र द्यावे, आजाऱ्यांच्या भेटीस जावे व कैदेत असलेल्यांना धीर द्यावा, असे केल्यानेच आपण प्रभू येशूच्या राज्याचे वारसदार बनणार आहोत.


पहिले वाचन : यहेज्केल : ३४:११-१२.१५-१७

वाचक :  यहेज्केल या पुस्तकातून घेतलेल वाचन

"प्रभू परमेश्वर म्हणतो: पाहा, मी स्वत: आपल्या कळपाचा शोध करीन, त्याला मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंध:काराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन. मी स्वत: माझा कळप चारीन आणि त्यांची निजण्या-बसण्याची सोय करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन, पण लठ्ठ आणि बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यांना मी यथान्याय चारीन.

"प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा, तुमचे असे होईल, मी मेंढरामेंढरांमध्ये, एडक्याबोकडांमध्ये निवाडा करीन."

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र २३:१-३,५-६

प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.

१)परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो.

२)तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो, तो आपल्या नामासाठी मला नीतीमार्गाने चालवतो.

३)तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

४) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.


दुसरे वाचन : १करिंथकरांस :१५:२०-२६.२८

वाचक :  पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन


ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथमफळ असा आहे. मनुष्याच्याद्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे, कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. प्रथम ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी, नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वत: पुत्रही होईल, अशा हेतूने, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

प्रभूच्या नामाने येत आहे तो धन्य!

आमचा पूर्वज दावीद ह्याचे राज्य सुवंदित असो.

आलेलूया !


शुभवर्तमान 

मत्तय २५:३१-४६

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.


येशू आपल्या शिष्यांना म्हणालाः "जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरिता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभो आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले? तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले ? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो? तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला नक्की सांगतो की, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे.

मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, अहो, शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान आणि त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी आणि बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही, त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभो, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला नक्की सांगतो की, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्याअर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगायला जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगायला जातील.

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
आज आपण ख्रिस्तराजाचा सण साजरा करतो. दाविदपुत्राचा जयजयकार असो. होसान्ना ! होसान्ना! असा जयघोष करत प्रभूचा गौरव व आराधना करतो. ख्रिस्त आगळा वेगळा राजा. आपल्या समर्पित आत्मबलिदानांद्वारे तो संपूर्ण जगावर राज्य करतो. त्याच्या राज्यांच्या सीमा ह्या अमर्यादित आहे. त्याचं तेज व वैभव हे स्वर्गीय आहे. असा राजा जो देव व प्रभू असून मानव झाला; मानवजात मिळविण्यासाठी त्याचं राज्यासन व पदासन हे वधस्तंभावरून घोषित करतो व सगळ्यास प्रेमाचा, क्षमेचा, शांतिचा व सेवेचा कानमंत्र देतो.असा हृदयी सम्राट आपणास सांगतो की, "मी सेवा करण्यासाठी आलो आहे सेवा करून घेण्यासाठी नव्हे." प्रभू म्हणतो, न्यायाचा दिवस समीप आहे. न्याय होणार. अंधाराचा आणि प्रकाशाचा. शेंढरांचा आणि मेंढरांचा न्याय होणार, गरिबांचा आणि श्रीमंतांचा न्याय होणार, खऱ्या भक्तांचा आणि ढोंग्यांचा. असा राजा आपणास त्याच्या राजाचा घोषवारा प्रकट करतो. "ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे." प्रभूच्या राज्याचे सेवक / सेविका म्हणून देवराज्य पसरविण्यासाठी आपण तयार आहोत का?

प्रार्थना - हे विश्वाच्या राजा, प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या वचनाप्रमाणे परोपकारी जीवन आचरण करण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या