Marathi Bible Reading | Pope Clement I | 23rd November 2020

  


सोमवार 
 
२३ नोव्हेंबर २०२०

सामान्य काळातील 

चौतीसावा सप्ताह

संत क्लेमेंट ह्यांचा सण 
(पोप रक्तसाक्षी धर्मपाल)

"येशूने एका गरीब विधवेलाही तेथे दोन छोटी नाणी टाकताना पाहिले." 

संत क्लेमेंट हे पोपमहाशयांच्या यादीतील तिसरे पोप म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ते दगडफोड्यांचे व खाण कामगारांचे आश्रयदाते संत म्हणून प्रसिद्ध आहेत.

प्रत्येक चांगले काम प्रसन्नतेने करण्यासाठी आपण मोठ्या उत्साहाने आणि पूर्ण तयारीनिशी पुढे आले पाहिजे. कारण सर्व वस्तूमात्रांचा निर्माता आणि प्रभू आपल्या हाताच्या कृतीकडे पाहून प्रसन्न होतो. - संत क्लेमेंट


पहिले वाचन : प्रकटीकरण : १४:१-५

वाचक :  प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

मी, स्वतः योहान ह्याने पाहिले, तो पहा, कोकरा लियोन पर्वतावर उभा राहिलेला दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर त्याचे नाम आणि त्याच्या पित्याचे नाम कपाळांवर लिहिलेली एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जी वाणी मी ऐकली ती, जसे काय वीणा वाजवणारे आपल्या वीणा वाजवत आहेत, अशी होती. ते राजासनासमोर आणि चार प्राणी आणि वडीलजन ह्यांच्यासमोर जसे काय एक नवे गीत गात होते. ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी आणि कोकरासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही, ते निष्कलंक आहेत.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र २३:१-६

प्रतिसाद : हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत.

१) पृथ्वी आणि तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.

२) परमेश्वराचा पर्वतावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो. 

३) त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल त्याला शरण जाणारे हेच लोक होत, हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

सरळ उभे राहा आणि वर पाहा, कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूकलिखित २१:१-४

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 

येशूने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका गरीब विधवेलाही तेथे दोन छोटी नाणी टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या गरीब विधवेने सर्वापेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानभांडारात टाकले, हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
खरा दानधर्म कोण करतो, हे आजच्या वाचनातून आपण शिकतो. समाजामध्ये ज्यांच्याकडे पैसा, धन संपत्ती आहे त्यांना श्रेष्ठ तर गरिबांना तुच्छ लेखले जाते. अशाच प्रकारची परिस्थिती येशूकालीन होती. एक गरीब विधवा तिचे पालनपोषण करणारा नवरादेखील मरून गेलेला होता आणि यहुदी धर्माच्या नियमानुसार प्रत्येक व्यक्तीने मंदिरात दान देणे जरुरीचे होते. श्रीमंत माणसे आपल्या संपत्तीतून मंदिराच्या दानपेटीत दान टाकीत होते. एका गरीब विधवेने आपली सर्व कमाई दानपेटीत टाकली. प्रभूने शिष्यांना म्हटले, ह्या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. लूक ६:३८ सांगते, “द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल." आपण जेव्हा दानधर्म करतो तेव्हा ते दान जबरदस्तीने, दिखाऊपणाने देऊ नये तर स्वखुशीने आणि हसऱ्या चेहऱ्याने परमेश्वराला दान करावे. विधवा स्त्रीने कमाईतून देवाला देऊन ती स्वतः रिक्त झाली आणि देवाच्या आशीर्वादास पात्र ठरली. आपण सुद्धा खिस्ताच्या सुवार्तेसाठी, गरजवंतांसाठी दान देण्यास मोकळ्या मनाने पुढे यावे व त्यासाठी आपणास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करू या.

प्रार्थना - हे प्रभू येशू, मला औदार्याचे दान दे आणि सुवार्ता प्रसार करण्यास तुझी कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या