Marathi Bible Reading | Andrew Dũng-Lạc | 24th November 2020

   


मंगळवार 
 
२४ नोव्हेंबर २०२०

सामान्य काळातील 

चौतीसावा सप्ताह

संत अ‍ॅन्ड्र्यू डँग ह्यांचा सण 
(रक्तसाक्षी)

"तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा." 

प्रभू येशू ख्रिस्तावरील आपली श्रद्धा बळकट करण्यासाठी पवित्र शास्त्राचे वाचन-मनन-चिंतन करणे गरजेचे आहे. पवित्र आत्म्याठायी प्रार्थना करुन ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीशी आम्ही एकनिष्ठ राहातो. जगातील दुष्ट शक्ती व सैताना बरोबर युद्ध करण्यासाठी आम्ही देवाची शस्त्रसामग्री धारण करतो  तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थनामय जीवन जगण्यास प्रेरणा व सामर्थ्य देतो. 


पहिले वाचन : प्रकटीकरण : १४:१४-१९

वाचक :  प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

मी स्वतः योहानने पाहिले आणि पाहा, पांढरा मेघ आणि त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीएक दृष्टीस पडला, त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, "तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली."

मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला, त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, "तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षवेलींचे घड तोडून घे, तिची द्राक्ष पिकली आहेत." तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ९६:१०-१३

प्रतिसाद :  परमेश्वर पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.

१) राष्ट्रांमधील लोकांना जाहीर करा की, परमेश्वर राज्य करतो, जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळणार नाही, तो सरळपणे लोकांचा न्याय करील. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत

२) शेत आणि त्यातील सर्वकाही उत्सव करोत, मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा,

म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूकलिखित २१:५-११

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 

मंदिर उत्तम पाषाणानी आणि अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी काहीजण बोलत असता येशूने म्हटले, "असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहा त्यातला पाडला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही." तेव्हा त्यांनी त्याला विचारले, "गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा होतील? आणि ज्याकाळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय?" तो म्हणाला, "तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन, मीच तो आहे आणि तो काळ जवळ आहे, असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका आणि जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही.

मग त्याने त्यांना म्हटले, "राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल, मोठेमोठे भूमिकंप होतील, जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील.

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू युगाच्या समाप्तीवेळी घडणाऱ्या गोष्टीविषयी शिष्यांबरोबर बोलत असताना त्यांना म्हणाला, तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. कारण सॉलमोनने इ. स. पूर्व १००० मध्ये बांधलेले मंदिर नबुखदनेसरने इ. स. पूर्व ५८६ साली उद्ध्वस्त केले होते. तो दिवस कधी असेल ह्या भीतीने अर्धमेला अवस्थेत जगण्यापेक्षा परमेश्वराच्या सेवेत कार्यात स्तुतीत त्या दिवसाला आनंदाने, प्रेमाने सामोरे जावयास प्रेरणा घेऊ या. बायबलमध्ये आपण अनेक उदाहरणे पाहतो. (१ पेत्र ५:८) सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान गर्जणाच्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो. सध्याच्या काळात विशेषकरून बरेच लोक ख्रिस्ताच्या नावाने चुकीचा संदेश देत आहेत. दानधर्म करण्याच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या माणसाचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आपण त्याच्या मोहात पडू नये व चुकीचा सल्ला न स्वीकारता, योग्य व अभ्यासू धार्मिक व्यक्तीचा सल्ला घेऊन आपल्या श्रद्धेत वाढण्यास परमेश्वराने आपणांस एकनिष्ठ ठेवावे. देवावरील प्रेमात व श्रद्धेत आपण मजबूत व्हावे म्हणून सामर्थ्य मागू या.

प्रार्थना - हे प्रभू परमेश्वरा, तुझ्यापासून आमचा कधी ही वियोग होऊ नये म्हणून तुझ्या संरक्षक पवित्र आत्म्याला आम्हामध्ये पाठव, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या