"माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही."
कठीण प्रसंगी विश्वासणाऱ्या सर्वांचा परमेश्वर मुक्तिदाता कैवार घेईल. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू युगाच्या समाप्ती विषयी घडणाऱ्या घटनांविषयी आपल्या शिष्यांना जाणीव करुन देत आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन, दुःखसहन, मरण व पुनरुत्थानाचे आपण सर्वजण सहभागिदार आहोत. ख्रिस्ताची साक्ष जगाला देण्यासाठी आपल्या सर्वाना आजचे शुभवर्तमानात आवाहन करीत आहे. प्रभूची साक्ष देताना आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हाने व अडचणी येणार आहेत मात्र आपण आपल्या शब्दांद्वारे, कृतीद्वारे आणि आचरणांद्वारे ख्रिस्ती जीवनाचा आदर्श इतरांसमोर ठेवणार आहोत. देवराज्याची सुवार्ता आणि ख्रिस्ताची साक्ष देऊन प्रेमाचा, शांतीचा आणि सेवेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवु या.
पहिले वाचन : प्रकटीकरण : १५:१-४
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
मी स्वत: योहानने फार मोठे आणि आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. सात पीडा घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले, त्या पीडा शेवटच्या होत्या, कारण त्यांच्यायोगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काही तरी माझ्या दृष्टीस पडले, श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्यांच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातात देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकराचे गीत गात होते:
हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था,
तुझी कृत्ये थोर आणि आश्चर्यकारक आहेत.
हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे आणि सत्य आहेत,
हे प्रभो, तुला कोण भिणार नाही?
तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?
कारण तूच मात्र पवित्र आहेस आणि तुझी
न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत.
म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ९८:१-३,७-९
प्रतिसाद : प्रभू तुझी सर्व कृत्ये किती महान आहेत!
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.
२) परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले, राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली सत्यता आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.
३) समुद्र आणि त्यातील सर्व काही, जग आणि त्यात राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवोत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत.
४) कारण परमेश्वर पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थतेने करील आणि लोकांचा न्याय सरळपणे करील.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
जागृत आणि सिद्ध राहा, कारण कोणत्या दिवशी मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूकलिखित २१:१२-१९
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "लोक तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील, तुम्हांला सभास्थाने आणि तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नामासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा, कारण मी तुम्हाला अशी वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडवायला किंवा तिच्याविरुद्ध बोलायला तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील काहीजणांना ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल."

0 टिप्पण्या