"परराष्ट्रीयांच्या वर्चस्वाचा काळ संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय येरुशलेमला पायांखाली तुडवतील."
लिओनार्डने पवित्र मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवाची भक्ती, अतिपवित्र साक्रामेंताची आराधना, येशूच्या अतिपवित्र हृदयाची भक्ती आणि पवित्र क्रुसाच्या वाटेची भक्ती अशा विविध भक्तींना खूप प्रोत्साहन दिले. विशेषत: पवित्र कुसाच्या वाटेच्या भक्तीवर त्याने भर दिला.
"आपल्या विकृत वासनांना शर्मविण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या अडचणींना वेंगेत घेत असतो. परंतु त्या टाळण्यासाठी आपण बोटदेखील लावीत नाहीत. एक पैशाचेदेखील दुःख भोगण्यास आज कुणी तयार नाही हीच जीवनाची खरी शोकांतिका आहे."- पोर्ट मॉरीसचे संत लिओनार्ड.
ह्या जगाचा आणि आपल्या सर्वाना नाश अटळ आहे. प्रभू पुन्हा येणार आहे त्या घटकेला मुक्तिसमय म्हटले आहे. आपला न्याय करण्यासाठी प्रभू येशू येणार आहे. मुक्तिसमय कधी येईल व प्रभू येशू वैभवाने केव्हा येईल हे माहित नाही, मात्र तो येण्यापूर्वी ज्या घटना घडतील त्याचा उल्लेख पवित्र बायबलमध्ये केलेला आहे. आपला प्रत्येकाचा न्याय केला जाईल.
पहिले वाचन : प्रकटीकरण :१८:१-२.२१-२३;१९:१-३.९
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
"महान नगरी बाबेल पडली आहे." मी, स्वत: योहानने दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातुन उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला, "पडली, मोठी बाबेल पडली. ती भुतांची वस्ती आणि सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय सर्व प्रकारच्या अशुद्ध आणि ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे." नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठया कळीसारखा घोडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले. अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल आणि ह्यापुढे कधीही सापडणार नाही, वीणा वाजवणारे गवई, पावा वाजवणारे आणि कर्णा वाजवणारे ह्यांचा नाद तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही, कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही आणि जात्याचा आवाज तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही, दिव्याचा उजेड तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही आणि वधुवरांचे शब्द तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाहीत. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्र तुझ्या चेटकाने ठकवली गेली. ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली:
'आलेलुया तारण, गौरव आणि सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत, कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे आणि नीतीचे आहेत ज्या मोठ्या कलावंतीणीने आपल्या जरकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे." ते दुसऱ्यांदा म्हणाले, आलेलुया! तिचा धूर युगानुयुगे वर चढत आहे." तेव्हा देवदूत मला म्हणाला: हे लिही की, कोकराच्या लग्नाच्या मेजवानीला बोलावलेले ते धन्य होत.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १००:१-५
प्रतिसाद : प्रभू तुझी सर्व कृत्ये किती महान आहेत!
१) अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, हर्षगीत गात त्याच्यापुढे या.
२) परमेश्वर हाच देव आहे हे जाणा त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो.
३) त्याचे उपकारस्मरण करत त्याच्या दारात, स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकारस्मरण करा. त्याच्या नामाला, धन्यवाद द्या.
४) खरोखर परमेश्वर किती चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. त्याची सत्यता पिढ्यानुपिढ्या टिकते.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूकलिखित २१:२० -२८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “येरुशलेमला सैन्यांचा वेढा पडत आहे असे पहाल तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा त्यावेळेस जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे येरुशलेमत असतील त्यांनी बाहेर निघून जावे आणि जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये. कारण शास्त्रलेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत. त्या दिवसांत ज्या गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार ! कारण देशावर मोठे संकट येईल आणि ह्या लोकांवर कोप होईल. ते तरवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करतील सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांचा वर्चस्वाचा काळ संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय येरुशलेमला पायांखाली तुडवतील." तेव्हा आकाशात सूर्य, चंद्र आणि तारे ह्यांच्यामध्ये अद्भुत चिन्हे दिसू लागतील, तसेच पृथ्वीवर समुद्र आणि लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे भयभयीत होऊन गोंधळात पडतील. भयाने आणि कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे गर्भगळीत होतील. आकाशातील शक्ती कंपायमान होतील. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने मेघावरून येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि वर पाहा, कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.

0 टिप्पण्या