Marathi Bible Reading | St. Virgules of Salzburg | 27th November 2020



शुक्रवार  
 
२७ नोव्हेंबर २०२०

सामान्य काळातील 

चौतीसावा सप्ताह

साल्झबर्गचे संत वर्जिलूस ह्यांचा सण 
(महागुरू,वर्तनसाक्षी)

"सर्व गोष्टी पूर्ण होतील. तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत."

प्रभूची वचने आपल्या संपूर्ण जीवनाला पोषक असून ह्या अमृत वचनांमुळे आपण प्रभूच्या प्रकाशात व सहवासात आनंदी जीवन जगू शकतो. ही वचने आपल्याला ह्या जगातील आव्हानांना सामोरे जाण्यास प्रेरणादायी आहेत. म्हणूनच दररोज आपण बायबल वाचन-चिंतन व मनन करुन ह्या अमृवचनांचा साठा आपल्या अंत:करणात साठवायला हवा.

पहिले वाचन : प्रकटीकरण :२०:१-४.११ २१:२

वाचक :  प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

मी स्वतः योहानाने एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती आणि त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्यास धरले आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. नंतर मी राजासने पाहिली, त्यांवर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाला व त्यांच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. नंतर मोठे पांढरे राजासन आणि त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला, त्याच्या तोंडापुढून पृथ्वी आणि आकाश ही पळाली, त्याकरिता ठिकाणी उरले नाही. मग मृत झालेल्या लहानथोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले, मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांस सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण आणि अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. नंतर मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही पाहिली, पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगर, नवे यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिले. ते वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे होते.

                   हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ८३:३,४,५-६अ,८अ

प्रतिसाद :  परमेश्वर लोकांमध्ये निवास करतो.

१) माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव आणि देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहेत.

२) हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधायला स्थळ मिळाले आहे.

३) तुझ्या घरात राहणार्यांना केवढी धन्यता! ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. ज्या मनुष्यांना तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ते केवढे धन्य! त्यांची शक्ती अधिकाअधिक वाढत जाते


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

सरळ उभे राहा आणि वर पाहा,

कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूकलिखित २१:२९-३३

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 

येशूने आपल्या शिष्यांस एक दाखला सांगितलाः अंजिराचे झाड आणि इतर सर्व झाडे पाहा, त्यांना पालवी फूटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की, आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की, सर्व गोष्टी पूर्ण होतील. तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत."

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्वतः म्हणत आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे. देवाचे राज्य समजवून देण्यासाठी प्रभूयेशूने अंजिराच्या झाडाचा दाखला देऊन काळ कसा ओळखता येतो हे नमूद केले आहे. प्रभूयेशूची वचने सर्वकाळ टिकणारी आहेत. प्रभू म्हणतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. प्रभुचे वचन म्हणजे देवाचा शब्द. प्रभू येशू म्हणतो मी जी वचने तुम्हांस सांगितली ती आत्मा व जीवन अशी आहेत. प्रभूचे वचन म्हणजे सत्याचे प्रकटीकरण होय. देवाच्या वचनाद्वारे आपणांस ज्ञान व शहाणपण प्राप्त होते. याद्वारे आपण देव व मानव यातील संवाद अधिक दृढ करू शकतो. प्रभूच्या वचनांनी आपले दैनंदिन जीवन अधिक प्रकाशमय बनू शकते. देवाच्या वचनाचा मी कसा आदर करतो? मी देवाची साक्ष दुसऱ्यांपर्यंत पोहचवतो का? यावर चिंतन करू या.

प्रार्थना - हे प्रभू येशु, तुझ्या वचनांचे चिंतन करुन ती आचरणात आणण्यास व तुझ्याशी संवाद साधण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या