Marathi Bible Reading | St Catherine Labouré | 28th November 2020


शनिवार  
 
२८ नोव्हेंबर २०२०

सामान्य काळातील 

चौतीसावा सप्ताह

संत कॅथरीन लाबोरे हिचा सण 
(कुमारिका)

"मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी " प्रार्थना करत जागृत राहा."

बर्गंडी येथील एका श्रीमंत फ्रेंच शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या अकरा मुलांपैकी नववी मुलगी कॅथरीन ही होय. इ.स. १८३० साली पॅरीसमधील सेंट विन्सेंट डी पॉलच्या सिस्टर्स ऑफ चॅरिटी संस्थेमध्ये नवशिष्या म्हणून तिने प्रवेश घेतला. इथेच तिला अतिपवित्र साक्रामेंतामध्ये प्रभृ येशू ख्रिस्ताच्या जिवंत उपस्थितीची प्रखरतेने जाणीव झाली व दर्शन घडले. शिवाय पवित्र त्रैक्याच्या सणाच्या रविवारी तिला ख्रिस्तराजाचा दृष्टांत झाला. त्याहीनंतर तिला पवित्र मरियेने तीन वेळा दर्शन दिले.तिला झालेल्या तीन दर्शनांपैकी दुसऱ्या दर्शनाच्या वेळी २७ नोव्हेंबर रोजी पवित्र मरीया भोवती एक सुंदर मेडल तिच्या दृष्टीस पडली. त्या मेडलवर पुढील शब्द सोनेरी अक्षरांमध्ये कोरण्यात आले होते. हे पवित्र मरिये तुझ्या, आश्रयाची अपेक्षा करणाऱ्या आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, कारण तू पापांवाचून गर्भी संभवलेली आहेस." त्यानंतर कॅथरीनच्या कानी एक वाणी पडली, "ह्या दर्शनाचे एक मेडल तयार कर आणि ते आपल्या गळ्यात घाल जो कोणी श्रेद्धेने हे मेडल गळ्यात घालील त्याला खूप मोठया कृपादानांची प्राप्ती होईल."ही मेडल धारण केल्यामुळे वेगवेगळे आजार बरे करणे, आध्यात्मिक कृपादानांचा लाभ होणे अशा प्रकारचे चमत्कार घडू लागले. त्यामुळे त्या मेडलला 'चमत्कारी मेडल असे नाव पडले.

संत कॅथरीन हिचा मृत्यू ३१ डिसेंबर १८७६ रोजी झाला. तिच्या मरणानंतर ५६ वर्षांनी तिचे थडगे उघडण्यात आले तेव्हा तिचे शरीर न कुजलेल्या अवस्थेत आढळते. हात आणि चेहरा गुलाबी रंगाचा, बाहू मऊ मलमली आणि डोळे खोबणीमध्ये व्यवस्थितपणे शांत असलेले दिसून आले. पोप पायस बारावे ह्यांनी २७ जुलै १९४७ रोजी तिला संतमालिकेमध्ये गुंफून घेतले.

पवित्र मरियेने संत कॅथरीन लाबोरे हिला म्हटले, "माझ्या मुली चांगुलपणाचा देव तुझ्यावर एक प्रेषितकार्य सोपवू इच्छितो. त्यामुळे तुला बरेच आत्मक्लेश सहन करावे लागतील. परंतु तू त्यावर मात करशील. कारण तू जे काही करशील ते देवाच्या गौरवासाठीच होईल."


पहिले वाचन : प्रकटीकरण :२२:१-७

वाचक :  प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

देवदूताने देवाच्या आणि कोकराच्या राजासनातून निघालेली, नगरीच्या मार्गावरून  वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला, योहान ह्यास दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूंस बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असेल आणि त्याचे सेवक त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील आणि त्याचे नाम त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करतील. नंतर तो मला म्हणाला, ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या गोष्टी आपल्या सेवकांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे. मी लवकर येतो. ह्या पस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य.

                   हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ९५:१-२,३-५,६-७

प्रतिसाद :  ये प्रभू ये, प्रभू येशू ये.

१) याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू या, आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू. उपकारस्मरण करत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गाऊन त्याचा जयजयकार करू. सर्व देवाहून तो थोर राजा आहे.

२) त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थळे आहेत. पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला, कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली.

३) याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो.

जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

जागृत आणि सिद्ध राहा, कारण कोणत्या दिवशी मनुष्याचा पुत्र येईल, हे तुम्हांला ठाऊक नाही.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूकलिखित २१:३४-३६

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 

येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हाला फासाप्रमाणे अकस्मात पकडील, कारण तो साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी " प्रार्थना करत जागृत राहा."

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
जी वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत याविषयी प्रभू आम्हांस सांगत आहे. प्रकटीकरण ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य. कारण प्रभूचा दिवस कधी येईल ते कळणार नाही. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आम्हांस सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. याचे आव्हान करीत आहे. ह्या जगातील ज्या गोष्टी आपल्या आत्म्याचा नाश करू पाहतात अशा सर्व गोष्टीपासून आपल्याला सावध राहण्याचा इशारा देत आहे. प्रभूच्या स्वागतासाठी आपण सज्ज असावे म्हणून आपल्याला पाचारण केले जात आहे. आपल्याला देवाच्या अस्तित्वाची जाणीव असणे खूप महत्वाचे आहे. जगात जुलूम, अत्याचार, भ्रष्टाचार, पाप वाढलेले आहे. अनेक प्रकारचे मोह, प्रलोभने यामुळे माणूस माणूसकी विसरला आहे. देवाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर सतत त्याच्या सान्निध्यात असणे आवश्यक आहे. देवाचा सहवास अनुभवण्यासाठी सतत निरंतन प्रार्थना करणे आवश्यक आहे.

प्रार्थना - हे परमेश्वरा, सर्वदा तुझ्याशी संवाद करण्यास व तुझा सहवास अनुभवण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या