"सावध राहा कारण घराचा यजमान कधी येईल ती घटका तुम्हांला माहीत नाही."
ह्यूबर्ट हा अत्यंत प्रभावी वक्ता होता. मूर्तिपूजकांवर त्याने असा घणाघाती हल्ला चढविला की, त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक मूर्तिपूजा सोडून खऱ्या देवाची भक्ती आराधना करू लागले. आर्देनेस मधून मूर्तिपूजक पूर्णपणे निघून गेले. त्याच्या उत्साहामुळे आणि समर्पित वृत्तीमुळे तो 'आर्देनेसचा प्रेषित' म्हणून प्रसिद्ध आहे.
तो शिकार्यांचा आश्रयदाता संत म्हणून ओळखला जातो. तसेच हायड्रोफोबिया ह्या आजारापासून रोगमुक्ती मिळविण्यासाठी त्याचा धावा केला जातो.
आजच्या शुभवर्तमानात जीवनात सर्वदा सतर्क राहून प्रभूच्या स्वागतासाठी आपण तयार राहण्याचा सल्ला प्रभू येशू आपल्याला देत आहे. आपल्यावर सोपविलेली प्रभूच्या सुवार्तेची साक्ष आपण आपल्या जीवनाद्वारे इतरांना द्यावी. त्यासाठी आपण सर्वदा सावध असावे म्हणून प्रभू आपल्याला आवाहन करीत आहे. आपल्या सर्वांना अनंत काळव्या आनंदात सहभागी होण्यासाठी पाचारण केले जात आहे आगमन काळात आपल्या जीवनाचे सिंहावलोकन करु या. आणि प्रभूच्या स्वागतास तयार राहूया व आपल्या अंतःकरण शुद्ध करूया.
पहिले वाचन : यशया : ६३ १६ व-१७
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. 'आमचा त्राता' हे तुझे प्राचीन काळापासून नाम आहे. हे परमेश्वरा, आम्हांला तुझ्या मार्गातून का बहकू देतोस? आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करतोस? तुझे सेवक, तुझे वतन झालेले वंश, यांच्याकरिता परत ये. तू आकाश छेदून खाली उतरला असतास तर तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते. हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही किंवा त्याचे नाव कानी आलेले नाही, अथवा कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. जो आवडीने धर्माचरण करतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करतात त्यांना तू भेट देतोस. पाहा, तू आम्हांवर कोपलास, कारण आम्ही पापी ठरलो. ह्या स्थितीत आम्ही बराच काळ आहोत तर आमचा उद्धार होईल काय? आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व धर्मकृत्ये गलिच्छ वस्त्रासारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आमच्या अधर्माने आम्हाला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. तुझा धावा करणारा कोणी नाही. तुझा आश्रय घेण्यासाठी कोणी स्वत:ला जागृत करीत नाही. कारण तू आपले मुख आम्हांपासून लपविले आहेत. आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहे. तरीसुद्धा, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही माती आहोत. तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ८०:२.३,१५-१६,१८-१९
प्रतिसाद : हे समर्थ देवा, आम्हांला पूर्व स्थितीवर आण.
१) हे इस्राएल राष्ट्राच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे. करुबासनावर विराजमंजान झालेल्या परमेश्वरा, आम्हांला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे. उद्धार करायला धावून ये.
२) हे सर्वसमर्थ देवा, पुन्हा मागे फीर, स्वर्गातून नजर टाकून बघ,
या द्राक्षलतेची, आपल्या उजव्या हाताने लावलेल्या रोपांची काळजी घे.
३) तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी समर्थ केलेल्या मानवावर तुझा वरदहस्त राहू दे. पुन्हा कधी आम्ही तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही. आम्हांला नवजीवन दे
दुसरे वाचन : १करिंथकरांस :११:३-९
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
बंधुजनहो, देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हांला कृपा आणि शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये तुम्हावर झालेल्या देवाच्या कृपेमुळे मी तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो. ती कृपा ही की, जसजशी खिस्ताविपयीची साक्ष तुम्हांमध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात आणि सर्व ज्ञानात संपन्न झाला आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानांत उणे पडला नाहीत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून शेवटपर्यंत तोच तुम्हांला दूढ राखील. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू यांच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वासपात्र आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव दे. तू सिद्ध केलेले तारण आम्हाला प्रदान कर
आलेलूया !
शुभवर्तमान
मार्क १३:३३ ३७
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला "सावध राहा, कारण ती घटका केव्हा येईल हे तुम्हाला माहीत नाही, एखादा माणूस प्रवासाला निघतो. घर सोडतेवेळी तो ते नोकराच्या ताब्यात देतो. प्रत्येकाने आपले काम करायचे असते. दारावरच्या पाहरेकऱ्याला तो दक्ष राहायची आज्ञा करतो. तसेच हे आहे. कारण घराचा यजमान संध्याकाळी येईल की मध्यरात्री येईल, पहाटे कोंबडा आरवण्याच्या वेळी येईल की सकाळी येईल, हे तुम्हाला माहीत नाही. जर तो अकस्मात आला तर त्याला तुम्ही झोपलेले सापडू नये म्हणून दक्ष राहा. मी जे तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो. दक्ष राहा.
प्रार्थना - हे प्रभू येशू, तुझ्या आगमनाची तयारी करुन तुझी साक्ष जगाला देण्यास आम्ही सर्वदा तयार असावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

0 टिप्पण्या