"माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन."
ख्रिस्तसभा आज प्रभू येशूचा शिष्य व प्रेषित संत अँन्ड्र्यूचा सण साजरा करीत आहे. संत पेत्राचा भाऊ असलेल्या अँन्ड्र्यूला प्रभूने मासेमारी करीत असतांना बोलविले आणि विश्वासाने तो येशूचा शिष्य बनून त्याच्या मागे चालू लागला. संत पेत्र, याकोब व योहान ह्यांच्यानंतर येशूच्या जवळचा शिष्य म्हणून संत अँन्ड्र्यूचे नाव घेतले जाते. सर्व प्रेषितांमध्ये सुद्धा संत अन्ड्रयूला आदराचे, सन्मानाचे व विशेष अधिकाराचे स्थान होते. संत अँन्ड्र्यू ह्यांनी आशिया मायनार, तुर्कस्थान, मासेदोनीया आणि ग्रीस ह्या प्रांतात प्रभूयेशूची सुवार्ता पसरविली. आपले प्रेषितीय कार्य करीत असताना ख्रिस्तीजनांचा भयंकर छळ करणाऱ्या निरो राजाने संत अँन्ड्र्यूला तुरुंगात टाकले. इंग्रजीतील एक्स आकाराच्या क्रुसावर खिळे न ठोकता गच्च आवळून बांधून त्याला मरणदंडाची शिक्षा देण्यात आली. दोन दिवस क्रुसावर तडफडणाऱ्या संत अँन्ड्र्यू ह्यांनी प्रभू येशूचा जयजयकार केला.आपल्या क्रुसाला त्याने प्रणाम केला व म्हटले 'हे चांगल्या क्रुसा तुला प्रणाम! हे स्तुति योग्य क्रुसा! हे अतिप्रिय क्रुसा! मला तुझ्या वेंगेत घे.'
संत अँन्ड्र्यू प्रौढकुमारिका आणि कोळी लोकांचा आश्रयदाता संत आहे.
पहिले वाचन : रोमकरांस पत्र : १०:९-१८
वाचक : रोमकरांस पत्र या पुस्तकातून घेतलेले वाचन
येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंत:करणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो आणि जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, "त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही." यहूदी आणि हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वाना पुरवण्याइतकातो संपन्न आहे. कारण "जो कोणी प्रभूचे नाम घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल." तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? "चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगण्याचे चरण किती मनोरम आहेत!" असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, "हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे?" ह्याप्रमाणे विश्वास संदेशाने आणि संदेश ख्रिस्ताच्या विश्वासाने प्राप्त होतो. पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते."त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर आणि त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १८ : २-३, ४-५
प्रतिसाद : निशीदिनी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो.
१) आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
२) वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
प्रभू म्हणतो, माझ्यामागे चला
म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तयलिखित ४:१८-२२
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. मग लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले. मग लगेच ते तारू आणि आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले.

0 टिप्पण्या