"तुम्ही जे पाहत आहा ते पाहणारे डोळे धन्य."
संत एलिजियुसच्या धर्मप्रांतामध्ये हजारो लोक मूर्तिपूजक होते. त्यांच्या अंधश्रद्धालु रितीरिवाजांचे निर्मूलन करणे खूप कठीण होते. त्यांचे परिवर्तन करण्यासाठी एलिजियुस ह्याने आपल्या आयुष्याची उरली सुरली २० वर्षे सुवार्ता प्रसारात व समर्पित जीवन जगण्यात घालविली. तो १ डिसेंबर ६६० रोजी मरण पावला.
तो खुप लोकप्रिय होता व आजही फ्रान्समध्ये तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. टॅक्सी ड्रायव्हर्स, सोनार व लोहार ह्यांचा तो आश्रयदाता संत होय.
माझ्या मुलांनो, विलाप करू नका तर माझ्याबरोबर आनंद करा. मी ह्याच क्षणासाठी जगत आलेलो आहे. ह्या जगातील दुःखातून मुक्त होण्यासाठी मी धडपडत आहे. - संत एलिजियुस
पहिले वाचन : यशया: ११:९-१०
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
इशायाच्या खोडाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आणि सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे आज्ञापालन त्याला आनंददायक वाटेल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय देणार नाही. तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील. पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखरूप वेताने पृथ्वीला ताडण करील. आपल्या मुखाच्या फुंकरीने दुर्जनांचा संहार करील. धार्मिकता त्याचे वेष्टन आणि सत्यता त्याचा कमरबंद होईल.
लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू आणि सिंहाचे पिल्लू एकत्र राहतील. त्यांना लहान मूल वळील. गाय आणि अस्वल मित्र बनतील. त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. छोटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत आणि नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या समयी असे होईल की राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ७२:१-२,७-८,११-१३,१७
प्रतिसाद : त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल.
१) हे प्रभो, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे. या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे, म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्यरीतीने न्यायनिवाडा करील. तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल.
२)त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल आणि चंद्र लोप पावेपर्यंत, सर्वत्र शांती नांदेल. एका समुद्रापासून दुसर्या समुद्रापर्यंत, युफ्राटीस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल,
३)त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला तसेच गरजवंत आणि असहाय्य लोकांनादेखील तो सोडवील. गरीब आणि गरजवंत ह्यांच्यावर तो दया करील. गरजवंतांच्या जिवांचे तो रक्षण करील.
४) त्याचे नाव चिरंजीव होवो, सूर्यासारखे अनंत टिको. त्याच्या नावाने लोक आपल्याला धन्य म्हणोत सर्व राष्ट्र त्याच्या नावाला धन्यवाद देवोत.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव दे.
तू सिद्ध केलेले तारण आम्हाला प्रदान कर
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १०:२१-२४
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
"येशू पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करतो." येशू पवित्र आत्म्याने प्रभावित होऊन प्रार्थना करीत म्हणाला, "हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो. कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू लहान मुलांना प्रकट केल्या आहेत. होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसेल. माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून कोणाला ठाऊक नाही. मग शिष्यांकडे वळून तो त्यांना म्हणाला, "तुम्ही जे पाहत आहा ते पाहणारे डोळे धन्य होत. मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी आणि राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहायला मिळाले नाही आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही."

0 टिप्पण्या