रोम शहरामध्ये पाचव्या शतकात संत बिवियाना हिच्या नावाने एक ख्रिस्तमंदिर उभारण्यात आले होते. त्यामध्ये तिचा मृत अविनाशी अशा अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेला होता. पोप संत सिम्प्लीसिऊस ह्यांनी ते मंदिर आशीर्वादित केले होते. तिचे दुःखसहन आणि त्यामागची पार्श्वभूमी ह्याविषयी इतिहासात काहीच माहिती उपलब्ध नाही.
बिबियाना आणि डेमेट्रीया ह्या दोन बहिण्णीना खूप दारिद्रयाचे जीवन जगावे लागले. त्यांच्याकडची सर्व संपत्ती व मालमत्ता मूर्तिपूजकांनी व त्यांच्या मातापित्याच्या मारेकऱ्यांनी त्यांच्याकडून हिरावून घेतली. पाच महिने ह्या दोन कुमारिका उघड्यावर वणवण हिंडू लागल्या. परंतु अशाही अवस्थेत उपवास व प्रार्थना करीत दोघींनी ते दिवस कृपावंत करून टाकले.
"येशू अनेकांना बरे करतो आणि भाकरींचा चमत्कार करतो."
प्रभू येशू ख्रिस्ताने देवराज्याची सुवार्ता तळागाळातील सर्वापर्यंत पोहचविली. जणू देवराज्यच त्याने आपल्या जीवनाद्वारे भूतलावर साकारले आपण सुद्धा आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे परस्परांवर दया करुन देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी पुढाकार घेऊ या.परमेश्वराच्या दयेचे व प्रेमाचे साक्षीदार बनू या.
पहिले वाचन : यशया: २५:६-१०अ
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
सेनाधीश परमेश्वर ह्या पर्वतावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची आणि राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन, तो या पर्वतावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीशा करील. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकील. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करील, कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या समयी ते म्हणतील, "पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास आणि हर्ष करूया." कारण परमेश्वराचा हात ह्या पर्वतावर राहील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र २३:१-२अ,२ब-३,५,६
प्रतिसाद : प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वसती करीन.
१) प्रभू माझा मेंढपाळ आहे. मला कशाची कमतरता नाही हिरव्यागार कुरणात तो मला विसावू देतो.
२)मला तो प्रशांत जलाशयाकडे नेतो मला तो नवजीवन देतो. आपल्या स्वभावानुरूप मला तो सन्मार्ग दाखवतो.
३)माझ्या शत्रूच्या देखत तू माझ्यासाठी मेजवानी करतोस. तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक केला आहेस माझा पेला ओसंडत आहे.
४) खरेच, आयुष्यभर मला सुखाचे आणि प्रेमाचे दिवस लाभतील आणि प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वसती करीन.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा नियंता आहे. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आम्हांला तारील.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय १५:२९-३७
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू सोर व सिदोन भागांतून गालील सरोवराच्या बाजूने पुढे डोंगराळ भागात गेला आणि तेथे बसला. तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झंडी त्याच्याकडे लोटल्या. लंगडे, पांगळे, आंधळे, मुके अशा अनेकांना लोकांनी आणून येशूच्या पायावर घातले. तेव्हा येशूने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, पांगळे बरे झाले, लंगडे चालू लागले आणि आंधळ्यांना दिसू लागले हे पाहून लोक चकित झाले आणि त्यांनी इसरायलाच्या देवाला धन्यवाद दिले. मग आपल्या शिष्यांना जवळ बोलावून येशू त्यांना म्हणाला, "मला या जनसमुदायाची दया येते. गेले तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत. त्यांना खायला काही नाही. त्यांना उपाशी परत पाठवायची माझी इच्छा नाही, कारण कदाचित वाटेत ते कासावीस होतील." "या निर्जन प्रदेशात एवढ्या मोठ्या जमावांला खाऊ घालायला पुरेशा भाकऱ्या आम्हाला कुठून मिळणार ?" शिष्यांनी त्याला विचारले. येशू त्यांना म्हणाला, किती भाकऱ्या आहेत तुमच्या जवळ?" सात आणि थोडे लहान मासे," ते म्हणाले. मग लोकांना जमिनीवर बसायची आज्ञा करून येशूने त्या सात भाकऱ्या आणि मासे घेतले, देवाचे आभार मानून त्यांचे तुकडे केले आणि शिष्यांजवळ ते दिले. शिष्य ते लोकसमुदायाला वाढत गेले. तेव्हा ते सगळे जेवून तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले ते सात पाट्या भरले.

0 टिप्पण्या