"उपदेशकांनी जर स्वत:च्या खाजगी जीवनात रस न घेता जर खरिस्ताच्या प्रेषितकार्यात स्वत:ला प्रामाणिकपणे झोकून दिले असते तर आज आपण जितके ख्रिस्ती लोक पाहतो त्यांच्या कितीतरी पटीने लोकांनी बाप्तिस्मा स्वीकारला असता."- संत फ्रान्सिस झेवियर
"पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा"
ख्रिस्तसभा आज सुवार्ता प्रसारक संत फ्रान्सिस झेवियरचा सण साजरा करीत आहे. अत्यंत श्रीमंतीत वाढलेला फ्रान्सिस बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी होता. उच्चशिक्षण घेऊन नाव लौकिक मिळवायचा आणि यश संपादन करायचे म्हणून पॅरीसच्या जगविख्यात विश्वविद्यालयात असताना त्याची गाठ संत इग्नेशियस लोयोला ह्यांच्याशी पडली. 'मानवाने सारे जग जिंकले परंतू स्वत:चा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ?' (मत्तय १६:२६),हा अमृत वचनाचा स्पर्श फ्रान्सिसला झाला.फ्रान्सिसच्या अंतरमनाचा ठाव ख्रिस्ताच्या वचनांनी घेतला आणि तो संत इग्नेशियसने स्थापन केलेल्या येशू संघामध्ये दाखल झाला व धर्मगुरुची दीक्षा घेतली. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी फ्रान्सिसने आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. पोर्तुगालपासून सुरु झालेला फ्रान्सिसचा मिशनरी प्रवास योगायोगाने त्याला भारतात घेऊन आला. गोव्यातील आणि दक्षिण भारतातील मिशनरी कार्य करीत असतानाच पूढे जपान, चीन आणि ऑस्ट्रेलीयापर्यंत फ्रान्सिसने ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. संत फ्रान्सिसने ख्रिस्ताला परिधान केले होते व त्याची सुवार्ता सांगण्यासाठी तो झपाटलेला होता. ख्रिस्ताच्या मळ्यातील संत फ्रान्सिस एक महान सुवार्ता प्रचारक झाला. प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या प्रत्येकाला पाचारण करुन सांगत आहे. "पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. "प्रभू येशूची सुवार्ता पसरविण्यासाठी आपण तयार आहोत का? जागतिक महत्वाकांक्षा बाळगून जागतिक वैभव मिळविण्यापेक्षा स्वर्गीय वैभव मिळविण्यासाठी आपण संत फ्रान्सिस झेवियरच्या मध्यास्थीने प्रार्थना करु या.
पहिले वाचन : यिर्मया १ : ४-८
वाचक : यिर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे "मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून जन्मण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे."
तेव्हा मी म्हणालो, "अहो, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे.' मग परमेश्वर मला म्हणाला, " 'मी केवळ बाळ आहे' असे म्हणू नकोस, ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा आणि तुला आज्ञापीन ते बोल. त्यांना तू भिऊ नकोस. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
दुसरे वाचन : इफिसकरांस: ३:१-१३
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. देवाची ती कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल म्हणजे प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे, ते तुम्ही वाचून पाहाल तर खिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेष्टयांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानांना कळवण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की, परराष्ट्रीय लोक ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर आणि अभिवचनाचे वाटेकरी आहेत. आमच्याबरोबर देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्याद्वारे मी सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी खिस्ताच्या अगाध समृध्दीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे, ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिध्दीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडळीच्याद्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की, तुम्हाप्रीत्यर्य मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हांला भूषणावह आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ७१ : १-२, ५-६, १४-१५
प्रतिसाद : मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन.
१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे, मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायनीतीने माझा उध्दार कर, माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर.
२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो, माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस कारण तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.
३) कारण हे प्रभो, परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस, माझ्या तरुणपणापासून माझे श्रध्दास्थान आहेस. जन्मापासून तूच माझा आधार आहेस, मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस.
४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिध्द केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझी अदभुत कृत्ये वर्णिली आहेत.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १० : १-१६
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
प्रभूने आणखी बहात्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वत: जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला पाठवत आहे, पाहा. पैशाची थैली, झोळी किंवा वहाणा घेऊ नका, वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, 'ह्या घरास शांती असो, असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा मी, 'देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा : 'आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील झाडून तुमची तुम्हांला परत करतो, तथापि हे लक्षात ठेवा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.' मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमला त्या दिवशी सोपे जाईल."
"हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार ! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सौदोन ह्यात घडली असती तर त्यांनी तेव्हाच गोणपाट आणि राख अंगांवर घेऊन बसून पश्चाताप केला असता. ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सीदोन ह्यांना सोपे जाईल. हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उच्चपदाला पोहचशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील.
"जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो."

0 टिप्पण्या