"तुमच्या श्रद्धेप्रमाणेच तुमच्या बाबतीत घडून येवो."
पहिले वाचन : यशया २९:१७-२४
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
प्रभू परमेश्वर म्हणतो : "लबानोनची बाग होण्यास. बागेचे वन गणले जाण्यास थोडासा अवधी आहे, त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील आणि आंधळ्याचे डोळे काळोखापासून मुक्त होऊन पाहतील. नम्र जनांचा परमेश्वराच्या ठायीचा आनंद वृद्धी पावेल. लोकांतील दीनजण इस्राएलच्या पवित्र प्रभूच्या ठायी उल्लास पावतील. कारण जुलूम करणारे नाहीसे झाले आहेत. हेटाळणी करणारे संपले आहेत. वाइटाला जागणारे सर्व समूळ उच्छेद पावले आहेत. ते नुसत्या शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवतात. वेशीवरील स्पष्टवक्त्यांसाठी जाळे पसरतात आणि धार्मिकांना घडघडीत लबाडीने उलथून पाडतात.'
म्हणून आब्राहामाचा उद्धारकर्ता परमेश्वर, याकोबच्या घराण्या विषयी म्हणतो "यापुढे याकोव लज्जास्पद ठरणार नाही आणि त्याचा चेहरा फिका पडणार नाही. कारण त्याचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील तेव्हा ते माझे नाव पवित्र मानतील, याकोबच्या पवित्र प्रभूला पवित्र मानतील आणि इस्राएलच्या देवाचे भय बाळगतील. श्रांतबुद्धी जनांना समज येईल आणि कुरकुर करणारे बोध घेतील."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र २७:१-४,१३-१४
प्रतिसाद : प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे.
१) प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे मी कोणाला भिऊ? प्रभू माझ्या जिवाची संरक्षक तटबंदी आहे. मला कुणाची भीती?
२) मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली आणि तीच मिळवण्याची मी शिकस्त करीन. ती म्हणजे साऱ्या आयुष्यभर मी प्रभुसदनी रहावे. प्रभूचे सुंदर ध्यान पहात रहावे आणि मंदिरात त्याचे मनन करावे.
३) माझ्या जीवनात प्रभूच्या चांगुलपणाचा अनुभव घडेल, अशी मला खात्री आहे. प्रभूची प्रतीक्षा कर. हिंमत बाळग, धीर धर. प्रभूचीच प्रतीक्षा कर.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे आकाशा, वरून वृष्टी कर. आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो, पृथ्वी उकलो. तारण आणि धार्मिकता ही प्रफुल्लित होवोत.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय ९:२७-३१
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशूवर श्रद्धा ठेवल्याने दोन आंधळे बरे होतात. येशू त्याच्या गावातून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे येऊ लागले ते मोठमोठ्याने ओरडू लागले. "अहो, दावीदपुत्र आमच्यावर दया करा. येशू घरात गेला तेव्हा ते आंधळे त्याच्याकडे आले. येशूने त्यांना विचारले, "तुम्हांला हवे ते मी करू शकतो अशी तुमची श्रद्धा आहे काय?" "होय प्रभू," त्यांनी उत्तर दिले. येशूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि तो म्हणाला, "तुमच्या श्रद्धेप्रमाणेच तुमच्या बाबतीत घडून येवो. त्याबरोबर त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, "हे कोणाला कळू नये म्हणू खबरदारी घ्या." पण ते तेथून निघाले आणि त्या साऱ्या प्रदेशात येशूविषयी सांगत सुटले.

0 टिप्पण्या