"पीक फार आहे खरे, पण कामगार थोडे आहेत"
प्रभू येशूच्या शिष्यांनी, प्रभूची आज्ञा आचरणात आणली. सर्व प्रेषितानी शब्दाद्वारे व कृतीद्वारे देवराज्य पसरविले व सर्वांना आजार मुक्ती दिली. प्रेषितामार्फत सुरु झालेले देव राज्याचे कार्य आजपर्यंत सुरु आहे. विशेषत: ख्रिस्तामध्ये स्नानसंस्कार स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तिला देवराज्य पसरविण्यासाठी प्रभू येशूने पाचारण केले आहे. आपण आजच्या वाचनात चिंतन करणार आहोत. आपल्या वाणीद्वारे, कृतीद्वारे आपण कशा प्रकारे देवराज्याची सुवार्ता घोषवित आहोत. आपण जेथे आहोत तेथे देवाचा शब्द इतरांपर्यत पोहोचवायचे आहे. कारण पिक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत.
पहिले वाचन : यशया ३०:१९-२१.२३-२६
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
इस्र्रायलचा प्रभू परमेश्वर असे म्हणतो:- सीयोनेत, यरुशलेमेत, लोकांची वस्ती राहील. तू यापुढे कधी शोक करणार नाहीस. तुझ्या विनवणीच्या शब्दांबरोबर तो तुझ्यावर अवश्य कृपा करील. ती ऐकताच तो तुला पावेल. प्रभू भाकरीची टंचाई आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य करील, तरी यापुढे तुझे शिक्षक दृष्टीआड राहणार नाहीत. तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. हाच मार्ग आहे. या मार्गाने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो. तू आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील. भूमी पीक देईल. ते अन्न रसभरीत आणि सत्वपूर्ण असेल. त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील. शेतात राबणारे बैल आणि जवान गाढव यांस दाताळ्याने उफणलेल्या आणि सुपाने पाखडलेल्या धान्याचे आंबवण खावयास मिळेल. मोठ्या कत्तलीच्या दिवशी बुरुज पडतील तेव्हा उंच डोंगरांवर आणि प्रत्येक उंच टेकडीवर झरे व ओहोळ होतील. त्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांच्या जखमा बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बऱ्या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा मोठा होईल.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १४७:१-२,३-४,५-६
प्रतिसाद : जे परमेश्वराची आशा बाळगतात ते सर्व धन्य.
१) प्रभूचे स्तवन करा. आपल्या देवाचे गुणगान करणे चांगले आहे. त्याचे स्तवन करणे सुखदायक आणि योग्य आहे. प्रभू येरुशलेम उभारतो. पांगलेल्या इस्रायलला गोळा करतो.
२) भग्नहृदयी लोकांना तो बरे करतो. त्यांच्या जखमांवर पट्ट्या बांधतो. तो ताऱ्यांची गणती करतो. त्या सर्वांना नावे देतो.
३) आमचा स्वामी महान आहे. त्याचे सामर्थ्य प्रचंड आहे. त्याची बुद्धिमत्ता कल्पनातीत आहे. नम्रजनांना प्रभू उचलून धरतो. दुर्जनांना धुळीस मिळवतो.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय ९:३५-१०:१.६-८
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू साऱ्या शहरातून आणि गावातून फिरत होता. त्याने त्यांच्या सभास्थानांतून शिक्षण दिले, स्वर्गराज्याचा शुभसंदेश दिला आणि सर्व प्रकारच्या रोगदुखण्यांनी पीडलेल्यांना बरे केले.
त्याने लोकसमुदायाला पाहिले तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले आणि पांगलेले होते. मग तो शिष्यांना म्हणाला, "पीक फार आहे खरे, पण कामगार थोडे आहेत, ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामगार पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा."
येशूने मग आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावून त्यांना भुताखेतांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व प्रकारचे रोग आणि दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला.
त्या बारा जणांना येशूने अशी आज्ञा देऊन पाठवले, "इस्राएल घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. जाता जाता अशी घोषणा करा, की, स्वर्गराज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना जिवंत करा, महारोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.

0 टिप्पण्या