Marathi Bible Reading | Saint Nicholas | 6th December 2020



रविवार  
 
६ डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
दुसरा रविवार 

बारीचे संत निकोलस ह्यांचा सण 
(महागुरू,वर्तनसाक्षी)

"तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील."

खिस्मस काळामध्ये सांता क्लॉस किंवा नाताळ बाबाची जी परंपरा ख्रिस्तसभेमध्ये सध्या प्रचलित आहे त्याचा संबंध ह्याच संत निकोलसशी आहे.

इटलीमधील बारी ह्या प्रांताचे संत निकोलस हे संपूर्ण जगभरचे लोकप्रिय संत म्हणून प्रसिद्ध आहेत. पवित्र नगरी येरूशलेम येथून तीर्थयात्रेवरून परतत असताना ते मायरा येथे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चमध्ये गेले. योगायोगाने त्या धर्मप्रांताचे महागुरूस्वामी नुकतेच मरण पावले होते आणि स्थानिक धर्मगुरूंनी असे आपसात ठरविले होते की दुसऱ्या दिवशी सकाळी देवळात प्रवेश करणाऱ्या पहिल्या पुरुषाला नवीन महागुरू म्हणून घोषित करावयाचे. अशा प्रकारे निकोलसच्या गळ्यांत महागुरुपदाची माळ आपोआपच पडली.

देवाने संत निकोलस द्वारे अनेक सदनात चमत्कार घडवून आणले मुलांसाठी असलेले त्याचे प्रेम आणि गोरगरिबांविषयी त्याला वाटणारी काळजी पुढे वाक्प्रचार व सुभाषिताचा विषय बनला. 

गरिबांवर व लहान मुलांवर त्याचे प्रेम होते (त्याचे परोपकारकार्य मात्र गोपनीय होते). निकोलस हा जहाजचालक आणि प्रवाशांचा आश्रयदाता संत मानल जातो. त्यामुळे तो समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या लोकांमध्ये अधिक लोकप्रिय व प्रसिद्ध आहे, निरपराध आणि चुकलेल्यांचाही संरक्षक आहे. तसाच तो सर्व मुलांचाही आवडता संत आहे. शिवाय तो रशिया, ग्रीस, सिसिली, लॉरेन, लाईग्रीक आणि नेपल्स ह्या देशांचा आश्रयदाता आहे.

ह्यांना सांताक्लोस किव्वा ख्रिसमस बाबा म्हणून प्रेसिद्ध झाले.

पहिले वाचन : यशया ४०:१-५,९-११ 

वाचक :  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"प्रभूचा मार्ग तयार करा."

सांत्वन करा. माझ्या लोकांचे सांत्वन करा. येरुशलेमच्या लोकांना धीर द्या. तुमच्या दुष्कर्माचे प्रायश्चित्त झाले आहे. प्रभूकडून तुमच्या सगळ्या पापांबद्दल तुम्हांला पुरेपूर शिक्षा मिळून चुकली आहे. ऐका, कुणी ओरडून सांगत आहे : "रानावनातून प्रभूसाठी रस्ता तयार करा. आमच्या देवासाठी अरण्यातून सरळ राजमार्ग बनवा. दयाखोऱ्यात भराव टाका आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी भुईसपाट करा. उंच सखल जमीन सपाट करा आणि ओबडधोबड जमीन गुळगुळीत करा, म्हणजे प्रभूचे वैभव प्रकट होईल आणि सारी मानवजात मिळून ते पाहील. ही प्रभूच्या तोंडची वाणी आहे."

हे सियोना, शुभसंदेश आणणाऱ्या जासुदा, उंच पर्वतावर चढ. हे येरुशलेमा, शुभसंदेश आणणाऱ्या जासुदा, मोठ्याने बोल. भिऊ नको. आपला आवाज चढव. यहुदाच्या नगरांना सांग : "पहा तुमचा देव, आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे बघा. त्याच्या हाती सत्ता आहे. त्याची कमाई म्हणजे त्याने मुक्त केलेले लोक तो घेऊन येत आहे. तो त्यांना देणार असलेले पारितोषिक त्याच्याबरोबर आहे. एखाद्या मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपाचा प्रतिपाळ करील. लहान कोकरांना तो वेंगेत उचलून घेईल आणि दूध पाजणाऱ्या मेंढ्यांना सांभाळून नेईल."

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ८५:९अब-१०,११-१२,१३-१४

प्रतिसाद :   हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव दे.


१) प्रभुदेव काय म्हणतो ते मी ऐकेन. कारण तो आपल्या लोकांचे, आपल्या भक्तांचे क्षेमकुशल इच्छितो. त्याचे ऐश्वर्य आमच्या देशात नांदावे म्हणून त्याची भक्ती करणाऱ्यांचा उद्धार करायला तो सिद्ध असतो.

२) दया आणि निष्ठा याचा संगम झाला आहे. नीती आणि शांती यांचे मीलन झाले आहे. भूमीवर मानवी निष्ठा वर झेप घेत आहे.

३) स्वगातून देवाची न्यायपरायणता खाली डोकावत आहे, खरोखर प्रभू आमची भरभराट करील आमची जमीन आम्हाला पीकपाणी देईल नीती त्याच्या आधाडीला राहील शांती त्याच्या पावलांवर पाऊल टाकील,


दुसरा वाचन : पेत्रचे दुसरे पत्र ३:८-१४ 

वाचक :  पेत्रचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"आम्ही नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांची वाट पाहत आहोत." प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही दृष्टिआड करू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षासारखा आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणू म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या अभिवचनाविषयी करीत नाही तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा स्फोटक आवाज करून नष्ट होईल. सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सृष्टी जळून खाक हाईल. ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहात राहा आणि प्रभूचा तो दिवस लवकर यावा म्हणून त्याची प्रतीक्षा करून धडपड करीत राहा. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टीची वाट पाहात असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक आणि निर्दोष असे शांतीमध्ये असलेले त्याला आढळावेत म्हणून होईल तितके प्रयत्न करा.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा, सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. 

आलेलूया !


शुभवर्तमान 

मार्क १:१-८

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 

देवपुत्र येशू ख्रिस्त याच्या विषयीच्या शुभसंदेशाचा प्रारंभ. संदेष्टा यशया याच्या ग्रंथात लिहिले आहे "बघ, मी माझा दूत तुझ्यापुढे पाठवतो. तो तुझी वाट मोकळी करील. रानावनात कुणीतरी घोषणा करीत आहे : "प्रभूचा मार्ग सिद्ध करा. त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. त्याप्रमाणे बाप्तिस्मा करणार योहान रानावनात प्रकट झाला. पापक्षमा व्हावी म्हणून पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्या अशी घोषणा तो करीत असे. तेव्हा साऱ्या यहुदिया प्रांताचे आणि येरुशलेमचे नागरिक त्याच्याकडे लोटू लागले. ते आपली पापे पदरी घेत आणि त्याच्याकरवी यार्देन नदीत बाप्तिस्मा घेत. योहान उंटाच्या केसाचे कपडे घालीत असे आणि कमरेला चामड्याचा कमरपट्टा बांधीत असे. टोळ आणि रानमध यांवर तो निर्वाह करी. तो मोठ्याने पुकारून सांगे, "माझ्यापेक्षा समर्थ असा कुणी माझ्यानंतर येत आहे, खाली लवून त्याच्या पादत्राणांचे बंद सोडायची माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील."

प्रभूचे हे शुभवर्तमान...


चिंतन :
माझ्या लोकांनी पापांतून मुक्त व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आजची वाचने तारणाऱ्याच्या आगमनाची तयारी करण्यासाठी आवाहन करीत आहेत. प्रभूच्या आगमनाचा मार्ग तयार करण्यासाठी प्रत्येकाला साद घालण्यात येत आहे. प्रभूला आपल्या लोकांचा कळवळा आहे. अगदी मेंढपाळाप्रमाणे सांभाळ करण्यासाठी तो येत आहे. संत पौल सांगत आहे की, कोणाचा नाश व्हावा अशी प्रभूची इच्छा नाही. प्रत्येकाला नवी पृथ्वी व नवे आकाश पाहण्याची संधी मिळेल. पण त्यासाठी आपले जुने जीवन बदलून पश्चात्ताप करून शुद्ध आचरणाद्वारे, भक्तिभावाने प्रभूच्या आगमनाची प्रतिक्षा करायला हवी. शुभवर्तमानात पापक्षमेसाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घेण्यासाठी योहान आवाहन करीत आहे. मी बाप्तिस्माद्वारे ख्रिस्तसभेचा सभासद बनलो आहे पण ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीनुसार माझे आचरण आहे का? ख्रिस्ताने माझ्या हृदयात जन्म घेण्यासाठी माझे हृदय शुद्ध आहे का?


प्रार्थना - हे प्रभू येशू, निर्मळ हदयाने तुला आमच्या जीवनात स्वीकारण्यास आम्ही बनावेत म्हणून आम्हाला पश्चातापी अंत:करण दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या