"हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे."
देवाचे वचन फलदायीच बनत असते, आपल्या जीवनातील सर्व प्रकारचा आंधळेपणा, पांगळेपणा, मुकेपणा, आजार व संकटे ह्यातून मुक्ती देणारा प्रभू आपल्या जीवनातसुद्धा चमत्कार घडवून आणू शकतो. आपण मात्र आपले जीवन आचरण तपासून पाहण्याची गरज आहे. ऐहिक सुख आणि वैभव मिळवण्याच्या नादात आपल्याला देवाचा विसर पडतो. म्हणूनच आपली देवावरील श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम तपासून पाहण्यासाठी हा आगमन काळ आहे. श्रद्धा, पाप स्वीकार, पश्चात्ताप आणि शरणागत होऊन आपण देवाच्या सहवासाचा अनुभव घेऊ शकतो.
पहिले वाचन : यशया ३५:१-१० १७
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वर स्वतः येईल आणि तुमचा उद्धार करील . "
अरण्य आणि रुक्ष भूमीही हर्षतील. वाळवंट उल्हासेल आणि कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल. आनंदाने गाऊन ते उत्सव करील. लबानोनची शोभा त्याला मिळेल, कार्मेल आणि शारोन यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. थरथरणारे हात दृढ करा. लटपटणारे गुडघे बळकट करा, घाबऱ्या मनाच्या लोकांना म्हणा, धीर धरा. भिऊ नका. पाहा, तुमचा देव सूड घ्यायला, अनुरूप असे प्रतिफळ द्यायला येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
तेव्हा अंधाचे नेत्र उघडतील. बहिऱ्यांचे कान मोकळे होतील. लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील. मुक्याची जीभ गजर करील, कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल. तृषित भूमीच्या ठिकाणी उपळते झरे होतील. कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू आणि लव्हाळे यासहित गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होईल. त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्यावरून अपवित्र जन जाणार नाहीत. पण तो त्याच्यासाठी, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी ते मार्ग चुकणार नाहीत. तेथे सिंह असणार नाहीत. हिंस्र पशूचा तेथे शिरकाव होणार नाही. तेथे ते आढळणार नाहीत. पण तेथे उद्धरलेले संचार करतील. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. ते जयजयकार करीत सियोनात येतील. त्याच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद आणि हर्ष पावतील. दुःख आणि उसासे पळ काढतील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ८५:८-१४
प्रतिसाद : पहा, आपला प्रभू परमेश्वर.
१) प्रभुदेव काय म्हणतो ते मी ऐकेन कारण तो आपल्या लोकांचे, आपल्या भक्तांचे क्षेमकुशल इच्छितो. त्याचे ऐश्वर्य आमच्या देशात नांदावे, म्हणून त्याची भक्ती करणाऱ्यांचा उद्धार करायला तो सिद्ध असतो.
२) दया आणि निष्ठा यांचा संगम झाला आहे. नीती आणि शांती यांचे मिलन झाले आहे. भूमीवरील मानवी निष्ठा वर झेप घेत आहे. स्वर्गातून देवाची न्यायपरायणता खाली डोकावीत आहे.
३) खरोखर, प्रभू आमची भरभराट करील. आमची जमीन आम्हाला पीकपाणी देईल. नीती त्याच्या आघाडीला राहील. शांती त्याच्या पावलांवर पाऊल टाकील.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.
आलेलूया !
शुभवर्तमान
लुक ५:१७-२६
वाचक :लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
एके दिवशी येशू शिक्षण देत असताना गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया आणि येरुशलेम येथून आलेले परुशी आणि शास्त्राध्यापक तेथे बसले होते आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य येशू ठायी होते. तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षघाती मनुष्याला बाजेवर आणले आणि त्याला आत नेऊन प्रभूसमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु दाटीमुळे त्यांना आत वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, "हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." तेव्हा शास्त्री आणि परुशी असा विचार करू लागले की, हा दुर्भाषण करणारा कोण आहे ? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो ? येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले. "तुम्ही आपल्या मनात असले विचार का करीत आहात ? पापांची क्षमा झाली आहे किंवा उठून चाल, ह्यातून कोणते म्हणणे सोपे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, "मी तुला सांगतो ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. तेव्हा तो लागलीच त्याच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला. तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले. तो देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, "आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.

0 टिप्पण्या