“पाहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो."
मात्र अखिल मानवजातीचे तारण करण्यासाठी देवपित्याने पवित्र मरियेची निवड केली व तिच्याद्वारे तारणारा जन्माला आला. आज ख्रिस्तसभा पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भसंभव हा सण साजरा करीत आहे. पवित्र मरियेला देवाने तिच्या आईच्या उदरातील गर्भसंभवापासूनच पवित्र व निष्कलंक ठेवले होते, कारण ती देवपुत्राची माता होणार होती. पवित्र मरियेचे जीवन हे . परमेश्वराने घडविले होते कारण तिला निष्कलंक ठेवण्यामागील उद्देश हाच की तिच्या उदरी देवपुत्र प्रसवणार होता. पवित्र आत्म्याच्यायोगे मरिया गर्भवती झाली त्याविषयी संत थॉमस अक्वायनस म्हणतात, 'पवित्र मरिया पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती झालेली असल्यामुळे तिला पवित्र आत्म्याचे निवासस्थान म्हणणे उचित आहे.'परमेश्वराने मरियेचे जीवन विशेषरितीने आपल्या पुत्राच्या जन्माकरिता राखून ठेवले होते. पवित्र मरियेचा सन्मान करीत असताना तिच्यासारखे शुद्धतेचे, पवित्रतेचे जीवन जगण्यासाठी प्रेरणा घेऊ या. विशेषरितीने तिच्यासारखे ख्रिस्त केंद्रित होण्यासाठी प्रेरणा मागू या.
पहिले वाचन : उत्पत्ती ३:९-१५.२०
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
आदामाने त्या झाडाचे फळ खाल्ल्यावर परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस?" तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे आहे म्हणून भिऊन लपलो." देवाने म्हटले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले ? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय?" आदाम म्हणाला, "जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले." परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?" स्त्री म्हणाली, "सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले." तेव्हा परमेश्वर देव सर्पांस म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू आणि वनचर यांपेक्षा तू शापग्रस्त आहेस. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तू आणि स्त्री तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके ठेचील आणि तू तिची टांच फोडशील." आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण ती सर्व जीवधारी जनांची माता होती.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ९८
: १,२-३अ, ३ब-४
प्रतिसाद : परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुतकृत्ये केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.
२) परमेश्वराने स्वत: सिध्द केलेले तारण प्रकट केले आहे. राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.
३) पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, उच्च स्वराने, आनंदाने गा.
दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र १:३-६.११-१२
वाचक : इफिसकरांस पत्र या पुस्तकातून घेतलेले वाचन
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्य असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला खिस्तामध्ये आशीर्वादीत केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या दृष्टीसमोर पवित्र आणि निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आम्हाला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता , प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुल प्रमाणात केली आहे. आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहो, ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती करावी.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे कृपापूर्ण मरिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो. स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस.
आलेलूया !
शुभवर्तमान
लुक १:२६-३८
वाचक :लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावीत एका कुमारीकडे गेब्रियल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.” ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, "मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव." तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही." मरिया देवदूताला म्हटले, "हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही." देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातील अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही." तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो." मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.

0 टिप्पण्या