Marathi Bible Reading | Peter Fourier | 9th December 2020

 

बुधवार  
 
९ डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
दुसरा साप्ताह 

संत पीटर फोरिअर ह्यांचा सणं
(वार्तांसाक्षी)
पुरुषांसाठी फा. पीटर ह्यांनी संत सेबेस्टीयन (सण २० जाने.) ह्यांच्या नावाने सोड्यालिटी स्थापन केली आणि स्त्रियांसाठी पवित्र जपमाळेची सोड्यालिटी तर मुलींसाठी निष्कलंक गर्भसंभवाची सोड्यालिटी स्थापन केली. मुलांना चांगले धार्मिक वळण लागावे म्हणून माटेनकोर्टच्या ह्या चांगल्या धर्मगुरूंनी ख्रिस्ती सद्गुणांवर आधारित छोट्या छोट्या नाटिकांची एक मालिकाच प्रसिद्ध केली. ती इतकी लोकप्रिय झाली की, मुलांना त्या नाटिकांतील अनेक संवाद तोंडपाठ येत. संदर्भ -संतांचा सहवास

"अहो कष्ट करणाऱ्यांनो आणि भारी ओझी वाहाणाऱ्यांनो, माझ्याकडे या. मी तुम्हाला विसावा देईन"

ह्या जगातील जीवनात अनेक आव्हाने, अडथळे व संकटे आणि दुःखे आहेत. अशा प्रसंगी आपण डगमगतो व जीवनात निराशा येते, जीवन नीरस बनते, म्हणूनच परमेश्वराच्या सहवासाची आस धरणे गरजेचे आहे. प्रभू येशू जो महासमर्थ व सनातन देवाचा पुत्र आहे, जगातील सर्व प्रकारच्या गडबड-गोंधळात प्रभूची हाक आपल्याला ऐकू येत नाही. आपण स्वत:च आपली बुद्धिमत्ता व शहाणपण वापरून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा प्रभू येशू जो दयेचा व करुणेचा महासागर आहे त्याच्याकडे जाऊ या. आपल्या जीवनात असलेली सर्व ओझी आपण प्रभूवर सोपवू या. विशेषत: वाईट सवयींचे ओझे, क्षमा न करण्याचे ओझे, आपसातील संबंध बिघडविल्याचे ओझे, अशी सर्व ओझी घेऊन प्रभूच्या वाणीकडे लक्ष देऊ या.

पहिले वाचन : यशया ४०:२५-३१

वाचक :  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

माझी कुणाशी तुलना कराल? माझ्यासमान कोण आहे?" असे पवित्र प्रभू विचारतो. वर नजर टाका. कुणी निर्माण केलेत हे तारे ? त्याची गणना करून त्यांना सेनेप्रमाणे बाहेर आणणाऱ्याने आणि त्या सर्वांना त्यांच्या नावाने हाक मारणानेच. त्याचे सामर्थ्य आणि शक्ती इतकी अफाट आहे की, एकही तारा कधी मागे राहात नाही. हे याकोबा, कशाला कुरकुरतोस? हे इसरायला का बडबडतोस? माझी दैनावस्था प्रभूच्या नजरेआड झाली आहे. माझा देव माझ्या हक्कांकडे दुर्लक्ष करतो," असे का म्हणतोस? तुम्हाला कळत नाही का? तुम्ही ऐकले नाही का? प्रभू हा सनातन देव, अफाट विश्वाचा निर्माता आहे. तो दमत नाही की थकत नाही. त्याच्या बुद्धीचा कुणाला ठाव लागत नाही. दमलेल्यांना तो चैतन्य देतो. दुर्बलांना सबळ करतो. तरुण देखील दमतात आणि थकतात. नवजवान थकवा आल्याने धडपडतात. परंतु प्रभूवर भरवसा ठेवणारे नवा जोम संपादन करतील. गरुडांप्रमाणे पंख फडफडवीत ते भरारी मारतील. ते धावतील पण थकणार नाहीत. ते चालतील पण त्यांना शीण येणार नाही.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र १०३:१-२,३-४,८.१०

प्रतिसाद :  हे माझ्या मना, प्रभूचे धन्यवाद गा. १ हे माझ्या मना, प्रभूचे धन्यवाद गा

१) हे माझ्या अंत:करणा, त्याच्या मंगल नावाचे धन्यवाद गा. हे मना, प्रभूचे धन्यवाद गा. त्याचे अनंत उपकार विसरू नकोस.

२) तो माझे सगळे अपराध पोटात घालतो. माझे सगळे रोग दूर करतो. मृत्यूच्या खाईतून तो माझा उद्धार करतो. आपल्या वात्सल्याची आणि अपार करुणेची पाखर माझ्यावर घालतो.

३) प्रभू करुणेचा आणि प्रेमाचा सागर आहे. तो मंदक्रोध आणि दयानिधी आहे. आमच्या पापांप्रमाणे तो आमची फेड करत नाही. आमच्या दुष्कृत्यांप्रमाणे आमची परतफेड करीत नाही.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

पाहा, आपला सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर येईल. आणि आपल्या दासाचे डोळे प्रकाशित करील. 

आलेलूया !


शुभवर्तमान 

मत्तय  ११:२८-३०

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 

त्यावेळी प्रभू येशूने भाकीत करून म्हटले, "अहो कष्ट करणाऱ्यांनो आणि भारी ओझी वाहाणाऱ्यांनो, माझ्याकडे या. मी तुम्हाला विसावा देईन". माझे जू आपल्या मानेवर घ्या. माझ्यापासून शिका. कारण मी लीन आणि नम्र अंतःकरणाचा आहे. तुमच्या मनाला शांती मिळेल, कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान...


चिंतन :
मानवी जीवन हा एक अद्भुत चमत्कार आहे. ह्या जीवनाचा आनंद लुटताना अनेकदा जीवनाचा खरा अर्थ न समजल्यामूळे स्वार्थापोटी किंवा अभिलाषेपोटी आपल्या जीवनात दुःख येते. अडचणी, समस्या निर्माण होतात. अशावेळी देवावरील श्रद्धा डळमळते आणि आपण देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रभूयेशू सांगतो अहो कष्टी आणि ओझी वाहणाऱ्यांनो तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. जीवनात असलेली सर्व ओझी आपण प्रभूवर सोपवायला हवीत. कारण आपला क्रूस हा येशू स्वतः त्याच्या खांद्यावर घेत असतो आणि आपल्या जोडीला जर प्रभूयेशू असेल तर आपला भार नक्कीच कमी होईल. मात्र आपली ओझी नक्की कशाची आहेत? आपल्या पापांची, अहंकाराची आहेत का ? मग ही ओझी कमी करण्यासाठी प्रथम पश्चातापपूर्वक येशूकडे जायला हवे. येशू नक्कीच आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला शांतीचा अनुभव येईल कारण येशू लीन आणि नम्र अंतःकरणाचा आहे.


प्रार्थना - हे प्रभू येशू, कृपा व दयेच्या सागरा, तुझ्या सहवासात विसावण्यास मला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या