"योहानपेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही."
आपण आपल्या विपत्तित किंवा संकट समयी जेव्हा स्वत:ला सावरू शकत नाही, तेव्हा प्रभू परमेश्वर म्हणतो, 'मी तुला सहाय्य करीन.' परमेश्वर सहाय्य करतो व सर्व प्रसंगातून आपल्याला वाचवतो. प्रभू येशूची शिकवण ऐकणारे व ते ग्रहण करणारे धन्य आहेत, आपण आपले दररोजचे जीवन जगत असताना प्रभूच्या वचनाप्रमाणे आचरण करावे व प्रभूच्या आज्ञांचे पालन करावे म्हणून प्रयत्नशील राहू या.
पहिले वाचन : यशया ४१:१३-२०
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
मी प्रभू तुझा देव तुझा उजवा हात आपल्या हाती धरून आहे आणि मीच तुला सांगत आहे की, तू भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करीन. हे क्षुद्र याकोब, हे दीन इस्राएल, तू भिऊ नकोस. मी इस्राएलचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारकर्ता, तुमच्या मदतीला धावून येईन. प्रभूचे हे बोल आहेत. बघ मी तुला नवीन तीक्ष्ण अनेक दात असलेले मळणीचे यंत्र बनवीत आहे. तू डोंगराची मळणी करून त्यांचा चुराडा करशील. टेकड्यांचा तू भुगा करशील. तू त्यांना उफणशील आणि वाऱ्यावर ते उडून जातील. वावटळ त्यांना उधळून लावील. मग प्रभूठायी तू उल्हास पावशील आणि इस्राएल पवित्र प्रभूचा अभिमान बाळगशील. जेव्हा दीन आणि दरिद्री जनांना पाण्याची तहान लागेल आणि ते मिळणार नाही जेव्हा त्यांची जीभ तहानेने कोरडी पडेल तेव्हा मी प्रभू स्वतः त्यांची विनंती ऐकेन. मी इस्राएलचा देव त्यांचा त्याग करणार नाही मी उजाड टेकड्यांवर नद्या आणि खोल दऱ्यांतून झरे वाहवीन. जेथे वाळवंट आहे तेथे मी पाण्याचे तळे बनवीन निर्जन प्रदेशात झरे उत्पन्न करीन. वाळवंटात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी आणि कण्हेर यांची लागवड करीन, कोरडवाहू जमिनीत वन निर्माण होईल. सुरू, देवदारू आणि भद्रदारू यांची वने तेथे फोफावतील. लोक ते पाहतील आणि समजतील की, प्रभूने असे केले आहे. ते विचार करतील आणि त्यांना कळेल की इस्राएलच्या पवित्र प्रभूची ही निर्मिती आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १४५:१,९-१३
प्रतिसाद : प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे.
१) माझ्या देवराया, मी तुझे माहात्म्य वर्णीन, सदासर्वदा तुझ्या नामाचा महिमा गाईन. प्रभू सर्वांशी चांगला आहे त्याने निर्मिलेल्या सर्वावर त्याची दयादृष्टी असते.
२) हे प्रभो, सर्व प्राणिमात्र तुझे स्तवन करतात. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
३) हे परमेश्वरा, तुझ्या राज्याचे ऐश्वर्य ते वर्णितात. तुझा पराक्रम ते कथन करतात. तुझी महान कृत्ये आणि तुझ्या राज्याचे शाही वैभव ते मानवजातीला जाहीर करतात.
४) तुझे राज्य म्हणजे युगानुयुगीचे राज्य. तुझी सत्ता पिढ्यान्पिढ्या टिकते.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे प्रभो शांतीचे वरदान घेऊन आमच्याकडे ये, म्हणजे आम्ही सोज्वळ हृदयांनी तुझ्या सान्निध्यात आनंद आणि जल्लोष करू.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय ११:११-१५
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू लोकसमुदायाला म्हणाला, "मी तर खरेच सांगतो, स्त्रीच्या पोटी आलेल्या सर्वात योहानापेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही. मात्र स्वर्गराज्यातला सर्वात कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानच्या काळापासून तर या घटकेपर्यंत स्वर्गराज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत, कारण योहानच्या काळापर्यत सर्व संदेष्ट्यांनी आणि धर्मशास्त्राने संदेश दिले आणि हे मान्य करायची तुमची इच्छा असेल तर येणार असलेला एलिया तो हाच आहे; ज्याला ऐकायला कान असतील त्याने ऐकावे."

0 टिप्पण्या