"या पिढीची मी कोणाशी तुलना करू ?"
पोप दमास्कस पहिले ह्याचे चारित्र्य धुतल्या तांदळासारखे होते. शुद्ध खिस्तसभेचे ते शुद्ध मेंढपाळ आणि धर्मपंडित होते. त्यांच्याशी त्या काळात तरी स्पर्धा करू शकणार नाही असा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्याठायी होता. शिवाय ते जसे पवित्र जीवन जगत होते तसेच ज्ञानासाठी व अभ्यासासाठी वेळ काढून ठेवीत, आपली श्रद्धा अबाधित ठेवताना त्यांची नजर गरीब लोकांवरूनही भिरभिरत असे.
सर्व प्रकारची धार्मिक प्रकरणे हाताळण्याचा अधिकार पोपना असावा हेही त्यांनीच कायद्याच्या साच्यात बसविले.
त्यांच्या काळात संत जेरोम रोम शहरात आला. काही काळापर्यंत तो पोपमहाशयांचा गुप्त सेक्रेटरी होता. त्यावेळी पोपमहोदयांनी त्यांना बायबलचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले आणि बायबलचे लॅटिन भाषेत भाषांतर करण्याची परवानगीही त्यांनी संत जेरोम ह्यांना दिली.
रोमन मिस्साग्रंथामध्ये प्राचीन काळी खूप लांबलचक व दीर्घ उपासना समाविष्ट करण्यात आलेली होती; परंतु ह्या पोपमहाशयांनी ती थोडीशी संक्षिप्त रूपात तयार केली, ती आजतागायत वापरात आहे. त्यामुळे त्यांना रोमन मिस्साग्रंधाचे जनक किंवा उद्गाते म्हटले जाते. ११ डिसेंबर ३८४ साली ते मरण पावले.
पहिले वाचन : यशया ४८:१७-१९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
तुमचा उद्धारकर्ता इस्राएलचा पवित्र प्रभुदेव असे म्हणतो, "मी तुमचा प्रभुदेव आहे. तुमच्यासाठी जे हितकारक असेल त्याचेच मी तुम्हांला शिक्षण देतो. ज्या मार्गाने तुम्ही जायला हवे त्या मार्गाने मी तुम्हांला नेतो. माझ्या आज्ञांकडे तुम्ही लक्ष पुरवले असते तर किती छान झाले असते. मग निरंतर वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुम्हाला शांती लाभली असती. तुमची सात्त्विकता सागराच्या लाटांप्रमाणे भरून वाहिली असती. तुमचा वंशविस्तार वाळूसारखा विपुल झाला असता तुमची संतती रेतीच्या कणांसारखी अगणित झाली असती त्यांचा नाश व्हावा किंवा नावनिशाणी मिटावी असे मी घडू दिले नसते."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १:१-४,६
प्रतिसाद : प्रभो, तुझ्यामागे येणाऱ्याला जीवनाचा प्रकाश लाभेल.
१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही, पापीजनांच्या वाऱ्याला उभा रहात नाही, किंवा देवनिंदकांच्या बैठकीत सामील होत नाही, उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, त्याच्या धर्मशास्त्राचे रांत्रदिवस मनन करतो तो धन्य
२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते, यथाकाळी त्याला बहर येतो, त्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो असतो. तो हाती घेतो ते सर्व सफळ होते.
३) पण दुर्जनांचे ते मुळीच नाही वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते. परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
पाहा, आपला राजा, जगाचा मालक येईल. तो आपल्याला दोरखंडाच्या बंधनातून मुक्त करील
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय ११:१६-१९
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
"त्यांनी योहानचे ऐकले नाहीच परंतु परमेश्वरपुत्राचेसुध्दा त्यांनी ऐकले नाही."
येशू म्हणाला, "या पिढीची मी कोणाशी तुलना करू ? चावडीवर जमलेली मुले आपल्या सवंगड्यांना म्हणतात, 'आम्ही बासरी वाजविली पण तुम्ही नाचला नाही, आम्ही विलापगीत गायले पण तुम्ही शोक केला नाही.' त्याप्रमाणे ही पिढी आहे.
कारण योहान आला त्याने उपवास केला आणि द्राक्षरस घेतला नाही, तर सगळे म्हणतात त्याला भूत लागले आहे' मानवपुत्र आला आणि तो खातोपितो तर सगळे म्हणतात, बघा, कसा खादाड आणि दारूबाज आहे, हा नोकरदारांचा तसाच पापीजनांचा दोस्त आहे.' पण देवाचे ज्ञान रास्त आहे हे खऱ्या ज्ञान्यांच्या कृत्यांवरून पटते."

0 टिप्पण्या