"माझे घर प्रार्थनेचे घर होईल."
मंदिराचे पावित्र्य राखणे ही प्रत्येक माणसाची जबाबदारी असते. मंदिरात प्रार्थना, भक्ती व देवाची उपासना करायची असते. मंदिरात माणूस आणि देव ह्यांचा संवाद होत असतो. मंदिरात गडबड, गोंधळ व बाजारूपणा असेल तर त्याचे पावित्र्य भंग पावते. आपण सर्वांनी त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. परमेश्वराच्या मंदिरातून सर्वांसाठी कृपेचा झरा सतत वाहत असतो. आपल्या व्यथा, वेदना, समस्या व अडचणी घेऊन आपण मंदिरात उपस्थित असलेल्या प्रभू बरोबर संवाद साधू या. आपले शरीर सुद्धा देवाचे मंदिर आहे (१करिंथ ३:१६-१८). त्यामध्ये परमेश्वराचा आत्मा वास करीत आहे. आपण आपल्या मंदिरावर चिंतन करू या.
पहिले वाचन : प्रकटीकरण : १०:८-११
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
मी, स्वतः योहान ह्याने, आधी स्वर्गातून झालेली जी वाणी ऐकली होती ती पुन्हा ऐकली ती अशीः “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे." तेव्हा मी त्या देवदूतांकडे जाऊन, 'ते लहानसे पुस्तक मला दे' असे म्हटले. तो मला म्हणाला, "घे आणि खाऊन टाक,ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल." तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले आणि खाऊन टाकले, ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, "अनेक लोक, राष्ट्र, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि राजे ह्यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ११९:१४.२४,७२,१०३,१११,१३१
प्रतिसाद : आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हांला राज्य आणि याजक असे केले आहेस.
१) तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यांनद करतो. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत.
२) सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यापेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधूर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.
३) तुझे निर्बंध माझे सर्वकाळ वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. मी तोंड उघडून धापा टाकल्या,कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १९:४५-४८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू मंदिरात गेला आणि त्यात जे विक्री करत होते त्यांना तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला, "माझे घर प्रार्थनेचे घर होईल, असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे."
तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे. पण मुख्य याजक, शास्त्री आणि लोकांचे पुढारी हे त्याचा घात करायला पाहत असत. तरी काय करावे हे त्यांना सुचेना, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.

0 टिप्पण्या