Marathi Bible Reading | St Gregory the Wonderworker | 19th November 2020

 

१९ नोव्हेंबर २०२०

सामान्य काळातील 

तेहत्तीसावा सप्ताह

अद्भुत चमत्कारकर्ता संत ग्रेगरी ह्यांचा सण (वर्तनसाक्षी)
संत ग्रेगरीला अद्भुत चमत्कारकर्ता म्हणतात, कारण त्याच्याद्वारे देवाने असंख्य चमत्कार घडवून आणलेले आहेत. निस्साच्या संत ग्रेगरी ह्यांनी त्याचं चरित्र रेखाटले आहे. "श्रद्धेचे महात्म्य" ह्या आपल्या साहित्य निर्मितीमध्ये ग्रेगरी ह्यांनी सार्वकालिक जीवन, अतिपवित्र त्रैक्यामधील समानता व परिपूर्णत्व ह्याचे वर्णन केलेले आहे. पूर आणि संकटकाळी संत ग्रेगरी ह्यांचा धावा केला जातो.

"तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस." 

स्वर्गत प्रवेश मिळविण्यासाठी कुकर्म आणि पापांपासून परावृत व्हावे व पश्चाताप करुन देवाबरोबर समेट करणे गरजेचं आहे. नाही तर, पापात खितपत पडलेल्यांचा नाश होणे खात्रीचे आहे.

आपण देवाला शरण जावे, सन्मार्गाने जीवन जगावे आणि देवराज्याचे वारसदार बनावे ही प्रभूची इच्छा आहे. प्रभू परमेश्वर वेळोवेळी जीवन परिवर्तनासाठी आपल्याला बोलावित आहे.


पहिले वाचन : प्रकटीकरण : ५:१-१० 

वाचक :  प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली आणि सात शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी स्वत: योहानने पाहिली आणि "गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडायला कोण योग्य आहे," असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळीपैकी एकजण मला म्हणाला, "रडू नकोस, पाहा, यहुदा वंशाचा सिंह, दावीदचा अंकुर ह्याने जय मिळवला, म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे."

तेव्हा राजासन आणि चार प्राणी ह्यांच्यामध्ये आणि वडीलमंडळी ह्यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता, असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला, त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे सात आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी आणि चोवीस वडीलजन कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा आणि धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतात:

तू गुंडाळी घ्यावयास आणि तिचे शिक्के 

फोडावयास योग्य आहेस,

कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या 

रक्ताने सर्व वंश निरनिराळ्या भाषा बोलणारे, 

लोक आणि राष्ट्रे ह्यांमधून आमच्या देवासाठी 

विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी 

त्यांस राज्य याजक केले आहेस. 

आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.


हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र १४९:१-२,३-४,५-६अ.९ब

प्रतिसाद : आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हांला राज्य आणि याजक असे केले आहेस.

१)परमेश्वराचे स्तवन करा. नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो, सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हासोत.

२)ती नृत्य करत त्यांच्या नामाचे स्तवन करोत, डफ आणि वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत, कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे, तो नम्रजनांना तारणाने सुशोभित करतो.

३)भक्त गौरवामुळे उल्हासोत, ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल परमेश्वराचे स्तवन करा.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे

अंत:करण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १९:४१-४४

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 

मग येशू शहराजवळ आल्यावर येरुशलेमकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, "जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील आणि तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला आणि तुझ्या मुलाबाळांना धुळीला मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.


प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू येरुशलेमकडे पाहून शोकाश्रू ढाळीत आहे. पश्चात्ताप व विश्वास न ठेवणारे यांच्यासाठी प्रभू अश्रू ढाळत आहे. रोमी सैन्याने टायटसच्या प्रतिनिधीत्व यहुद्यांवर हल्ला करून त्यांचे शहर व मंदिरे बहुतांश उद्ध्वस्त केले, त्यावेळेस दगडावर दगड राहिला नाही भिंतीदेखील धुळीस मिळाल्या. येशूने हे भाकीत करताना येरुशलेमसाठी रडला कारण ज्या शहराच्या नावात शांती आहे त्याच शहराने शांतीच्या राजकुमाराला ओळखले नाही आपण देवाला शरण जावे, सन्मार्गाने जीवन जगावे आणि देवराज्याचे वारसदार बनावे ही प्रभूची इच्छा आहे. प्रभूने प्रयत्न करून देखील येरुशलेमातील झाकलेले डोळे उघडले गेले नाही, त्यांचे कुमार्ग, सुमार्ग बनले नाहीत. त्यांनी देवाचे वचन ऐकूने देखील न ऐकल्यासारखे केले. ख्रिस्तसभेने पवित्र संस्काराद्वारे आपल्या प्रत्येकाला परिवर्तनाची आणि कृपादानांची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आपण त्या संधीचा उपयोग करतो का?
प्रार्थना - हे प्रभू, जीवनातील प्रत्येक अनमोल क्षण तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या