"ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल."
संत पिटर यांच्या थडग्यावर उभारलेले हे महामंदिर ब्रामान्ते व मायकल आंजेलो ह्यांच्या कलाकल्पकतेतून साकारले आहे. ह्या महामंदिराची उभारणी १६ व्या शतकात झाली.
संत पीटरचे महामंदिर हे जगातील सर्वात मोठे आणि ऐश्वर्यसंपत्र महामंदिर मानले जाते. एकाच वेळी या महामंदिरामध्ये ५०,००० भाविक उपासना व आराधनेसाठी एकत्र जमू शकतात. पोप अर्बन सातवे ह्यांनी १८ नोव्हेंबर १६२६ रोजी या महामंदिराचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन व समर्पण केले.
संत पौलाच्या थडग्यावर उभारलेल्या ह्या महामंदिराची रचना प्राचीन महामंदिर याप्रमाणे आहे. हे महामंदिर आकर्षकता आणि भक्तीच्या दृष्टीने संत पीटर महामंदिरापेक्षाही अधिक प्रभावी आहे. ते पोप पायस नववे ह्यांनी १८५४ साली आशीर्वादित केले. त्याच्या दोन दिवस आधीच पोपमहाशयांनी पवित्र मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवाविषयीच्या शिकवणुकीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले होते.
पहिले वाचन : प्रकटीकरण : ४:१-११
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
मी, स्वत: योहानाने पाहिले तो, स्वर्गात दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती, ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या कर्ण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लागलीच मी आत्म्याने संचरित झालो. तो पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे आणि सार्दी ह्या रत्नांसारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले आणि डोक्यावर सोन्याचे मुकूट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते. राजासनाच्या आतून विजा, वाणी आणि मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या देवाचे सात आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता.
राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूला, पुढे आणि मागे अंगभर डोळे असलेले चार प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा आणि चौथा प्राणी उडत्या गरूडासारखा होता. त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा सहा पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि "पवित्र, पवित्र, पवित्र जो होता, जो आहे आणि जो येणार तो सर्वप्रथम प्रभू देव." असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत.
राजासनावर बसलेला जो युगानुयुगे,जिवंत आहे त्याचा जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान आणि उपकारस्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडीलजन राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात, जो युगानुयुगे जिवंत त्याला नमन करतात आणि मुकूट राजासनापुढे ठेवून म्हणतात.
"हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस. कारण तू सर्व काही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले आणि अस्तित्वात आले."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १५०:१-२,३-४,५-६
प्रतिसाद : पवित्र, पवित्र, पवित्र, प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे.
१) परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीबद्दल त्याची स्तुती करा.
२)कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार आणि वीणा वाजवून त्याचे स्तवन करा तंतूवाद्ये आणि बासरी वाजवून त्याचे स्तवन करा.
३) खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मी मनापासून पाळावयास मला शिकव.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १९: ११-२८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशूने त्यांस एक दाखला सांगण्यास सुरुवात केली. तो येरुशलेमजवळ होता आणि देवाचे राज्य आता लगेच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते, म्हणून तो म्हणाला, "कोणी एक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या दहा नोकरांना बोलावले आणि त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हांवर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या नोकरांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांस आपणांकडे बोलावायला सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत." त्याने त्याला म्हटले, शाबास, भल्या नोकरा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमावल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे. मग आणखी एक येऊन म्हणाला, "महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता आणि जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.हे तो त्याला म्हणाला, "अरे दुष्ट नोकरा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यांस सांगितले, ह्याच्यापासून ती मोहर घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!. मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या शत्रूंच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांस येथे आणा आणि माझ्यादेखत ठार मारा.
ह्या गोष्टी सांगून तो वर येरुशलेमकडे जात असताना स्वत:पुढे चालत होता.

0 टिप्पण्या