Marathi Bible Reading | St. Elizabeth of Hungary | 17th November 2020

  



१७ नोव्हेंबर २०२०

सामान्य काळातील 

तेहत्तीसावा सप्ताह

हंगेरीची संत एलिझाबेथ हिचा सण (वर्तन साक्षी)

"मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आणि तारावयास आला आहे." 

एलिझाबेथ बालपणापासून पावित्र्यात वाढली आणि भक्तिमय जीवन जगली. ह्या जीवनाचे प्रतीक म्हणजे तिने सोन्या- मोत्याचे दागिने वापरण्यास नकार दिला आहे. ती म्हणत असे की, माझ्या प्रभूला तर काट्यांचा मुकूट प्रदान करण्यात आलेला होता मग मी सोन्या-चांदीचे दागिने कशी काय वापरू?

संत एलिझाबेथ हिचे आध्यात्मिक मार्गदर्शक मार्बर्गचे फा, कोनार्ड म्हणतात, जेव्हा मी तिला विचारले की, तुइ्या मालमत्तेचे व संपत्तीचे मी काय करावे? तेव्हा तिने उत्तर दिले की, जे माझे आहे ते सर्व गोरगरिबांच्या मालकीचे आहे. तिने सर्व काही गोरगरीब व दीनदलितांना वाटून टाकण्यासाठी माझ्या स्वाधीन केले. ज्या कपड्यात आपल्याला पुरण्यात यावे अशी तिची इच्छा होती असा एक जुना फाटका अंगरखा मात्र तिने स्वत:कडेच ठेवला.

पहिले वाचन : प्रकटीकरण : ३:१-६.१४-२२ 

वाचक :  प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

मी, स्वत: योहान ह्याने, प्रभूने मला सांगताना ऐकले,:

"सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत आणि सात तारे आहेत तो असे म्हणतो: तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो, आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर. कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारले आणि ऐकले ह्याची आठवण कर, ते जतन करून ठेव आणि पश्चात्ताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन, मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळवली नाहीत , अशी थोडी नावे सार्दीस येथे तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवतो तो अशारीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्यांचे नाव  पत्करीन. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको."

"लावदिकीया येथील मंडळींच्या दुताला लिही: जो आमेन, जो विश्वसनीय आणि खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकरण तो असे म्हणतो:

तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू शीत नाहीस आणि उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे आणि मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा आणि वस्त्रहीन आहेस हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला सल्ला देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे, तुझी लज्जास्पद नम्रता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्र विकत घे आणि तुला दृष्टी यावी डोळ्यात घालायला अंजन म्हणून विकत घे. जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो, म्हणून आस्था बाळग आणि पश्चात्ताप कर. पाहा, मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन आणि त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत ते ऐको."

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र १५:२-५

प्रतिसाद : विजयीजनांना मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.

१) हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील ? तो सात्त्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो, जो मनापासून सत्य बोलतो तो, जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो.

२)तो आपल्या बंधूंचे वाईट करत नाही, शेजाऱ्यांची निंदा करत नाही, अधर्माला तुच्छ लेखतो, पण परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो

३)तो आपला पैसा व्याजी लावत नाही, तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

तुझे नियम मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १९: १-१०

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 

येशूने यरिहोत प्रवेश केला आणि तो पुढे जात होता. तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशु कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, "जक्कय त्वरा वरून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे." तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, "हा पापी मनुष्याच्या घरी उतरायला गेला आहे."

तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, "प्रभो, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य गरिबांना देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर तर चौपट परत करतो." येशूने त्याला म्हटले, "आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही आब्राहामचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आणि तारायला आला आहे."


प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
लूकच्या शुभवर्तमाला दीन दुबळ्या आणि गरीब लोकांचे शुभवर्तमान म्हणून ओळखले जाते. प्रत्येक श्रीमंत मनुष्य देवाचा भक्त नसून काही वेळा पैश्याचाच भक्त आहे हे सत्य नाही. काहीजण धनदौलत असूनदेखील देवाला पैशापेक्षा जास्त प्राधान्य देतात. आजच्या उताऱ्यातील जक्कयदेखील, (हिब्रू भाषेत 'जक्कया' म्हणजे शुद्धता.) ह्या शुद्धतेपासून तो खूप दूर होता. पोप सोळावे बेनेडिक्ट म्हणतात, खरी शुद्धता ही देवाची करणी आहे. जक्कयदेखील काही प्रमाणात त्याच प्रकारचा आहे. जक्कय हा पैशाने श्रीमंत होताच पण समाजाच्या दृष्टीने तो पापी होता, येशूला पाहण्याची त्याची तीव्र इच्छा होती पण त्याचा ठगणेपणा आणि जमलेली गर्दी त्याच्या इच्छेआड येत होती. तरीदेखील तो जिद्द सोडत नाही, तो झाडावर चढतो आणि येशूच्या येण्याची वाट पाहतो. जेव्हा आपण एक पाऊल उचलतो, तेव्हा परमेश्वर नव्याण्णव पाऊले उचलून पुढे येतो. हेच येशूने केले. येशू फक्त आलाच नाही तर तेथे येऊन थांबला, जक्कयला खाली बोलाविले व त्याच्या घरी जाऊन त्याच्यासोबत वेळ घालवला. प्रभू येशूच्या आगमनाने जक्कयच्या जीवनाचे परिवर्तन झाले आणि पश्चात्ताप करण्यासाठी व समेट करण्यासाठी तो तयार झाला. प्रभू येशूने जक्कयचे अंतःकरण ओळखले आणि प्रभू त्याला म्हणाला, "आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे." "कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारावयास आला आहे." तोच प्रभू आपल्या अंतःकरणात, घरात, कुटुंबात, शेजाऱ्यामध्ये येऊ इच्छित आहे. देव माझ्या शोधात आहे, पण मी देवाचा शोध कुठे करत आहे ? येशू आपल्या दाराशी उभा राहून आपले दार ठोठावीत आहे व संगत आहे. मला तुला शुद्ध करायचे आहे. आपण तयार आहोत का प्रभू येशूला आपल्या अंतःकरणात स्वीकारण्यासाठी?

प्रार्थना -  हे प्रभू येशू, माझ्या जीवनात ये आणि माझे मलीन ह्रदय स्वच्छ कर व मला तुझ्या तारण दायी प्रकाशात आण, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या