"मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी."
मार्गारेट ही हुशार होती, विविध धर्मपरिषदांमध्ये ती हिरिरीने सक्रीय सहभाग घेत असे. तिच्या सहभागामुळे आणि वक्तव्यामुळे सेल्टीक चर्च रोमच्या अमलाखाली आले. तिच्या उदार अंत:करणातून वाहणाऱ्या कृपेच्या झऱ्यावर जणू अनेक ख्रिस्तमंदिरांचा आणि मठांचा पाया रचला गेलेला होता. कितीतरी गुलामांना तिने आपल्या दानशूरपणामुळे गुलामगिरीतून मुक्त केले. त्याचबरोबर न्याय आणि दया ह्यांचा योग्य संगम आपल्या देशामध्ये घालण्याचा तिने प्रयत्न केला.
संत मार्गरिट तासन् तास प्रार्थनेमध्ये दंग असे. भोजनानंतर तिने रचलेली प्रार्थना कितीतरी शतके " संत मागरिटचा आशीर्वाद" ह्या नावाने प्रसिद्ध होती. गरिबांची ती व्यक्तिशः सेवा करीत असे. स्कॉटलंडचा राजा आणि राणी मार्गरिट दिवसाला ३०० भिकाऱ्यांना व गरिबांना अन्न पुरवीत. तेही आपल्या राजवाड्यातील भव्य सभागृहामध्ये!
तिच्या आठ मुलांपैकी दोघे व्रतस्थ जीवन जगणारे भिक्षूक बनले तर इतरांनी आपल्या देशाचे समर्थपणे नेतृत्व केले. तिची मुलगी संत मॅटिल्डा हिचा इंग्लंडचा राजा हेन्री पहिला ह्याच्याशी विवाह झाला. पुढे ती उत्तम राणी मॉड या नावाने इतिहासप्रसिद्ध झाली.
संत मागरिट १६ नोव्हेंबर १०९३ साली मरण पावली. पोप इनोसेंट चौथे ह्यांनी तिला संतपद दिले. ती स्कॉटलंडची आश्रयदाती संत मानली जाते.
"हे सर्वसमर्थ परमेश्वरा, माझ्या आयुष्यातील अखेरच्या क्षणी माझ्यावर मोठा कठीण प्रसंग व यातना पाठवून तू आपल्या दयेने मला माझ्या पापांपासून शुद्ध केले त्याबद्दल मी तुझे आभार मानते."-स्कॉटलंडची संत मार्गारेट
पहिले वाचन : प्रकटीकरण : १:१-४,२:१-५
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
देवाकडून येशू खिस्ताला झालेले हे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या सेवकांना दर्शविण्याकरिता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला सेवक योहानला कळवले. त्याने देवाच्या वचनाविषयी आणि येशू खिस्ताविषयो म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारे, ते ऐकणारे आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य होत. कारण समय जवळ आला आहे. आशियातील सात मंडल्यांना योहानकडूनः जो आहे, जो होता आणि जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्यापसून, इफिस येथील मंडळीच्या दुताला लिहीः 'जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो. सोन्याच्या सात समयांमधून चालतो,' तो असे म्हणतो: "तुझी कृत्ये, तुझे श्रम आणि तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नामामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर आणि पश्चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १:१-२,३,४-६
प्रतिसाद : विजयीजनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खायला देईन.
१)जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.
२)जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.
३)दुर्जन तसे नाहीत. ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. कारण नीतिमांनाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १८:३५-४३
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा भीक मागत वाटेवर बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, "हे काय आहे ?" त्यांनी त्याला सांगितले, "येशू नाझरेथकर जवळून जात आहे." तेव्हा तो ओरडून म्हणाला, "अहो येशू, दावीदच्या पुत्रा, माझ्यावर दया करा!” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले, तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, "अहो दावीदच्या पुत्रा, माझ्यावर दया करा!” तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, "मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे ?" तो म्हणाला, "प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णीत त्याच्यामागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.

0 टिप्पण्या