Marathi Bible Reading | Saint Albert the Great | 15th November 2020


१५ नोव्हेंबर २०२०

सामान्य काळातील 

तेहत्तीसावा रविवार

संत आल्बर्ट महान ह्यांचा सण (वर्तन साक्षी)

"तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो." 

आपल्या खाजगी जीवनात संत आल्बर्ट हे अत्यंत नम्र स्वभावाचे डॉमनिकन होते. पुष्कळ वेळा ते पायीच प्रवास करीत. देवावर त्यांचा बालकासमान विश्वास आणि प्रेम होते, तर गरिबांविषयी आणि दुर्दैवी लोकांविषयी त्यांच्या मनात अतीव कणव व कळकळ होती. अंतराळशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोल, वेधशास्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र कृषिविभाग, खाणीतील संशोधन तंत्र, प्राणीशास्त्र, अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व व ज्ञान अगाध असल्यामुळे मध्ययुगीन काळातील "विश्वविख्यात पंडित" "युनिव्हर्सल डॉक्टर" ही पदवी त्यांना देण्यात आली आहे.

 "जितकी तुमची श्रद्धा मजबूत आणि प्रार्थना आग्रहाची असेल तितक्या

अधिक प्रमाणात तुम्ही देवाकडे जे काही मागाल ते देव तुम्हाला देईल."

-संत आल्बर्ट महान

पहिले वाचन : नीतिसूत्रे : ३१:१०-१३.१९-२०.३०-३१

वाचक :  नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन

सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते ? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर विश्वास ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते, अहित करत नाही. ती लोकर व ताग खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. ती आपल्या हाती चाती घेते, ती हातांनी चरखा धरते. ती गरिबांसाठी मूठ उघडते, गरजवंतास हात देते, सौंदर्य भुलवणारे आहे आणि लावण्य व्यर्थ आहे. परंतु परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातचे श्रमफळ तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांमुळे भर वेशीत तिची प्रशंसा होवो.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र १२८:१-२,३,४-५

प्रतिसाद : जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य !

१)जे परमेश्वराचे भय धरतात, जे प्रभूच्या मार्गानी चालतात ते धन्य! तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.

२)तुझ्या माजघरात तुझी पत्नी सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील.

३)पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या मनुष्याला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.


दुसरे वाचन : थेस्सलनीकाकरांस :५:१-६

वाचक :  पौलचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन


प्रभूच्या दिवसाने तुम्हांला चोरासारखे गाठू नये." बंधूनो, काळ आणि समय याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हांला स्वत:ला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. "शांती आहे, निर्भय आहे" असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजनहीं, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहा, आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाही. ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे आणि सावध राहावे.


हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.

आलेलूया !


शुभवर्तमान 

मत्तय २५:१४-३०

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.


येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला: "ज्या प्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या नोकरांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे स्वर्गाचे राज्य आहे. त्याने एकाला पाच हजार शेकेल, एकाला दोन हजार आणि एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यांवर व्यापार केला आणि आणखी पाच हजार मिळवले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्याने आणखी दोन हजार मिळवले. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जमीन खणली आणि तिच्यात आपल्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. मग बराच काल लोटल्यावर त्या नोकरांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला, तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर पाच हजार शेकेल सोपवून दिले होते. पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार शेकेल मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, "शाब्बास, भल्या आणि विश्वासू नोकरा तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला. महाराज, आपण माझ्यावर दोन राजार शेकेल सोपवून दिले होते. पाहा, त्यावर मी आणखी दोन हजार शेकेल मिळाले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, "शाबास भल्या आणि विश्वासू नोकरा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करोन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो" नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहा, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता आणि जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता, म्हणून मी भ्यालो आणि तुमचे हजार शेकेल मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पाहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, "अरे दुष्ट आणि आळशी नोकरा, जेथे मी पेंरले नाही तेथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार शेकेल त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार शेकेल आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. या निरुपयोगी नोकराला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाने चालेल." 

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
खरा श्रद्धावंत हा आपल्या सद्गुणांनी ओखळला जातो. दुर्गुणापासून जो दूर राहतो. सद्गुणी स्त्री आपल्या घराला परमेश्वराच्या आशीर्वादाने आकारते. सदगुणी व्यक्ती परमेश्वराच भय व आदर ह्या नीतिचा अवलंब करून आपले जीवन प्रपंच घडविते. हा आपल्या जीवनात भक्ती मार्ग,ज्ञान मार्ग, कर्म मार्ग असा योग आणतो. हे सद्गुण श्रद्धावंतात प्रकट होतात तेव्हा साक्षात परमेश्वर त्यांचे जीवन उभारतो.

भक्ती मार्ग: विश्वासाने, एकनिष्ठेने खऱ्या जीवनाने विधात्याची भक्ती. तो कितीही संकटे, दुःख, अडचणी आल्या तरी कन्या परमेश्वराला सोडत नाही. जुन्या करारातील ईयोब आपण कसा विसरणार? देवाने दिले देवाने नेले देवाचे जाव धन्य असो.

ज्ञान मार्गः हुशारी, शहाणपण हे पवित्र आत्म्याचं दान. आपली भक्ती अंधश्रद्धेत नसावी तर ज्ञानात असावी. आपल्या ज्ञानाद्वारे नीति जीवन, न्यायजीवन आपण जगू शकतो व सत्यात चालू शकतो. जुन्या करारात शलमोन राजाने ज्ञानाची देणगी देवाकडे मागितली जेणेकरून आपली पावले प्रकाशाकडे असावी.

कर्म मार्गः संत आपणाला आठवण करून देतात की आपली प्रार्थना अशी असू द्या की, सर्वस्व प्रभूवर अवलंबून आहे पण आपले कार्य असं असू द्या की सर्वस्व आपल्यावर अवलंबून आहे.

प्रार्थना - हे प्रभू येशू, तुझे विश्वासु, कर्तव्यदक्ष व एकनिष्ठ अनुयायी बनण्यास व फलदायी जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या