Marathi Bible Reading | St. Lorcán Ua Tuathail | 14th November 2020

    


सामान्य काळातील 

बत्तिसावा सप्ताह 

संत लॉरेन्स ओ' तुले ह्यांचा सण (वर्तन साक्षी)

शनिवार
 
१४ नोव्हेंबर २०२०

"देवाचे जे निवडले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय?" 

 परमेश्वर दयाळू , कनवाळू व प्रेमळ आहे, तोच अंतर्यामी परमेश्वर आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकतो. आपण धैर्याने, चिकाटीने कळकळीने प्रार्थना व विनंती करणे गरजेचे आहे.कारण, देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस प्रार्थना करतात त्यांना तो निश्चितच प्रतिसाद देतो. आपण सर्वजण देवाचीच लेकरे आहोत. देव आपल्यावर प्रेम करतो.

पहिले वाचन : ३ योहान : १: ५-८

वाचक :  योहानाचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 

प्रिय गायस, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस. त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटेस लावशील तर बरे करशील. कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काहीएक न घेता खिस्ताच्या नामाखाली बाहेर पडले आहेत. म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी घेऊ.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ११२:१-६

प्रतिसाद : परमेश्वराचे भय धरतो तो मनुष्य धन्य !

१)परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो. आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य ! त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.


२)धनसंपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत.


३)जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपले व्यवसाय करील, तो कधीही ढळणार नाही, नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत.

ते सदासर्वकाळ अढळ आहेत.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १८:१-८

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.

त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये, ह्याविषयी येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला, तो असाः एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे आणि माणसाला जुमानत नसे आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्यापुढे वारंवार येऊन म्हणत असे की, 'माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा.' पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, 'जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.' तेव्हा प्रभूने म्हटले, "अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?"

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
प्रार्थना म्हणजे आपल्या शब्दांची बडबड नव्हे किंवा आपल्या इच्छेप्रमाणे मागणे नव्हे. प्रार्थना म्हणजे अखंडितपणे, सातत्याने, चिकाटीने परमेश्वराशी एकरूप होणे. प्रभू येशूख्रिस्त प्रार्थना करण्यासाठी एकांती व रानात जाऊन रात्र घालवित असे. आजच्या शुभवर्तमानात येशूख्रिस्ताने प्रेरणादायी दाखला सांगितला आहे. चिकाटीने प्रार्थनेत टिकून राहण्यासाठी येशू न्यायाधीश आणि विधवा यांचा सुंदर उतारा दिला आहे. त्याकाळी दोन प्रकारचे न्यायाधीश होते. १. शिकून सवरलेले सुशिक्षित, २. लाच देऊन पद मिळवलेले. वरील उताऱ्यातील न्यायाधीश दुसऱ्या प्रकारचा असावा, जो लाच देऊन पद मिळविलेला असेल म्हणून तो कोणालाच जुमानत नव्हता व सर्वांकडून त्यांना न्याय देण्यासाठी पैसा घेत असावा. पण एक विधवा काय देऊ शकेल? या विचाराने तो अस्वस्थ होऊन तो तिला न्याय देत नसावा. परंतु तिच्या वारंवार विनवणी व येण्याने तो न्याय द्यावयास आणि सुटका मिळविण्यास तयार होतो हेच प्रार्थनेत होतो. अत्याग्रही विधवेने कळकळीने केलेली विनंती आहे. अन्यायी न्यायाधिशाला तिचा न्याय करावाच लागला. म्हणूनच विश्वासाने केलेली प्रार्थना देव का स्वीकारणार नाही? संत पॉल थेस्सलनीकाकरांस सांगतो, "निरंतर प्रार्थना करा." परमेश्वर तुम्हाला नक्कीच उत्तर देईल. प्रार्थना कुठेपण करा पण विश्वासाने, चिकाटीने, जिद्दीने करा.

प्रार्थना - हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या अस्तित्वाची व प्रेमाची जाणीव आम्हास सदैव असावी व तुझ्या प्रेमाच आणि सहवासाचा अनुभव अम्हास यावा म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या