Marathi Bible Reading | St. Stanislaus Kostka | 13th November 2020

   


सामान्य काळातील 

बत्तिसावा सप्ताह 

संत स्टॅनिस्लॉस कॉस्तका ह्यांचा सण (वर्तन साक्षी)

शुक्रवार
 
१३ नोव्हेंबर २०२०

"जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील, तो आपल्या जिवाला मुकेल." 

संत स्टॅनिस्लॉसने आपल्या प्रसन्न पावित्र्याने, दिव्य निरागसतेने आणि शुद्धतेने सर्वांना जिंकून घेतले. किरकोळ शरीरयष्टी असूनही त्याने सर्व प्रकारची तपश्चर्या आणि आध्यात्मिक साधना आत्मसात केली. देवाने त्याला अलौकिक कृपादानांनी विभूषित केले. 

हृदय विकार, प्राणघातक आजार आणि अंत्यसंस्काराविना येणारे मरण ह्यावर मात करण्यासाठी संत स्टॅनिस्लॉस ह्याचा धावा केला जातो. बऱ्याच संस्थांमध्ये नवशिष्यांचा तो आश्रयदाता संत मानला जातो. 

मी विशिष्ट वेळेसाठी नव्हे तर सार्वकालिक जीवनासाठी जन्मलेलो आहे. -संत स्टॅनिस्लॉस

पहिले वाचन : २ योहान : १:४-९

वाचक :  योहानाचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 

आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला. बाई, आता मी तुला विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. कारण फसवणुक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबुल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणुक करणारा आणि खिस्तविरोधक असलाच आहे. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिकवणीला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही, जो शिकवणीला धरून राहतो त्याला पिता आणि पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ११९:१-२,१०-११,१७-१८

प्रतिसाद : परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य.


१)जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य.


२)अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे, तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस, मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.


३)आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १७:२६-३७

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.

येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक पीत होते. लग्न करत होते आणि लग्न करून देत होते. तसेच ज्या प्रमाणे लोटच्या दिवसात झाले, त्याप्रमाणे होईल म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते. घरे बांधत होते, परंतु या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी आणि गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश  झाला. मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल. त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरिता खाली येऊ नये आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये, लोटच्या बायकोची आठवण करा, जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मी तुम्हास सांगतो. त्या रात्री एका बिछान्यावर दोघे असतील, एक घेतला जाईल आणि दुसरा तेथेच ठेवला जाईल. दोघी मिळून दळत असतील, एक घेतली जाईल आणि दुसरी तेथेच ठेवली जाईल." त्यांनी त्याला म्हटले, "प्रभुजी, कोठे?"त्याने त्यांना म्हटले, "जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील."

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
आजच्या शुभवर्तमानात येशू स्पष्टपणे म्हणत आहे की, "जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील, तो आपल्या जिवाला मुकेल." येशू त्याच्या शेवटच्या प्रवासावर होता, तो येरुशलेमला येत होता अशा स्थितीत तो जगाच्या समाप्तीबद्दल सांगतो. जसे नोहा आणि लोटच्या वेळी घडले होते, तेच समाप्तीच्या वेळी घडेल. पाणी व अग्नी ह्या दैनंदिन जीवनातील  गोष्टी वापरून तो सर्वोना सावध करत आहे. "आपले दैनंदिन जीवन म्हणजे सहल, खेळ, मनोरंजन नाही त्याच्यापलीकडेही काहीतरी आहे आणि ते म्हणजे सार्वकालिक जीवन, पण हे जीवन आपल्या दैनंदिन जीवनावर जगण्यावर, वागण्यावर अवलंबून आहे. जीवन ही देवाची देणगी आहे आणि ते देवाच्या योजनेप्रमाणेच जगणे महत्वाचे आहे. जीवन जगत असताना देव आपल्याला पश्चात्तापाच्या अनेक संधी देत असतो. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा सदुपयोग व्हावा म्हणून प्रयत्नशील बनूया.

प्रार्थना - हे प्रभू परमेश्वरा, जिवाला सूख मिळावे व स्वच्छंदी जीवन जगता यावे ह्या प्रयत्नात आम्ही अनेकदा तुला विसरतो. आम्हाला पश्चात्तापी अंत:करण दे, आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या