"कारण, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे"
जोसाफाट ह्याने धर्मगुरूंच्या जीवनात खूप सुधारणा घडवून आणल्या त्याला स्वत:ला धर्मगुरूपदाची दीक्षा मिळताच लवकरच त्याला मठाधिकारी, महागुरू आणि शेवटी वयाच्या २८ व्या वर्षी पोलोझोकचे आर्चबिशप अशा चढत्या क्रमाने पदव्या मिळत गेल्या.शेतात, इस्पितळांमध्ये आणि प्रसंगी तुरुंगात जाऊन प्रवचने दिली. लोकांची सेवा केली आणि त्यांची पापनिवेदने ऐकली. त्याच्या ह्या श्रमांना प्रभूने भरभरून फळ दिले.त्यांचे खाजगी जीवन त्याग, पावित्र्य आणि वैराग्य ह्यांचा त्रिवेणी संगम समजला जातो. ते वारंवार उपवास करीत, कधी कधी मांसाहार वर्ज्य करीत. आपल्या शरीराला यातना देत आणि जमिनीवर झोपत. त्यांच्या भक्तीचे एक द्योतक म्हणजे संत जोसाफाट जमिनीला आपले डोके टेकवून नमन करीत आणि मोठ्याने प्रार्थना करीत की,
"हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाच्या पुत्रा, मज पाप्यावर दया कर."
पहिले वाचन : फिलेमोनला पत्र: १:७-२०
वाचक : पौलचे फिलेमोनला पत्र यातून घेतलेले वाचन
तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला आणि माझे सांत्वन झाले. कारण, हे प्रभो तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे. ह्याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताच्या वतीने पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो. तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला आणि मलाही उपयोगी आहे. त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्रणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले. सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते, तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने युगानुयुग तुझे व्हावे, त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या आणि प्रभूच्या ठायी ह्याहून किती तरी अधिक तो प्रिय असावा. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार करा. त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. हा माझा पौलाचा स्वदस्तुरचा लेख आहे, ते मी फेडीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. हे बंधो, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर. माझ्या जिवाला ख्रिस्ताच्या ठायी विश्रांती दे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १४६:७-१०
प्रतिसाद : याकोबचा देव ज्याच्या सहाय्याकरिता आहे तो धन्य.
१)परमेश्वर सदा आपले सत्यवचन पाळतो, छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो. भुकेल्यांना अन्न देतो.परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.
२)परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो, परमेश्वर नीतिमांनावर प्रेम करतो, परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो.
३)तो अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यान्पिढ्या राज्य करतो. परमेश्वराचे स्तवन करा.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १७:२०-२५
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
देवाचे राज्य केव्हा येईल असे परुश्यांनी विचारले असता येशूने त्यांस उत्तर दिले. "देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, 'पाहा, ते येथे आहे!' किंवा 'तेथे आहे!' असे म्हणणार नाहीत, कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे." त्यावर त्याने शिष्यांस म्हटले, "दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हास दिसणार नाही. ते तुम्हाला म्हणतील, 'पाहा, तो तेथे आहे!' 'पाहा, येथे आहे!' तर तुम्ही जाऊ नका आणि त्यांच्यामागे लागू नका. कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या आगमनाच्या दिवशी होईल. तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे आणि ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे.”

0 टिप्पण्या