"ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
एकदा संत मार्टिन आपल्या घोड्यावरून प्रवास करीत असताना रस्त्याच्या कडेला त्याला एक भिकारी थंडीने कुडकुडत असताना दिसला. त्याच्या अंगावर लाज झाकण्यापुरती लक्तरे होती. ते पाहून मार्टिनला त्याची दया आली. मार्टिनने मागचा पुढचा विचार न करता स्वत:च्या अंगावरील अत्यंत उंची झगा आपल्या हातातील तरवारीने कापून टाकला व त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती लपेटला. त्या भिका-याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मार्टिन सुखावला. एका आगळ्या वेगळ्या आनंदात समाधानाने तो घरी परतला. रस्त्यावर त्याला पाहणारे सर्व लोक मार्टिनला हसत होते. रात्री स्वप्नात त्याला प्रभू येशू त्या झग्यामध्ये दिसला. त्याच्या अंगावर उरलेल्या झग्याचा तुकडा होता. पुढे मार्टिनच्या अंगावरील फाटका झगा तो फ्रैंकीश किंग्सच्या नावाने उभारलेल्या चपलमध्ये बरीच वर्षे जपून ठेवण्यात आला.
रक्तसाक्षी नसूनही एक संत म्हणून गौरविला गेलेला मार्टिन हा पाश्चात्य देशातील एक पहिला संत मानला जातो. मध्ययुगात तर त्याची कीर्ती दिगंतापर्यंत जाऊन पोहोचली. त्याच्यामुळे पाश्चात्य देशातील बरीचशी ख्रिस्तमंदिरे त्याच्याच नावाने उभारली गेलेली आहेत. शिवाय काही शहरांनाही त्याचे नाव देण्यात आले आहे.
मार्टिन ११ नोव्हेंबर ३९७ साली मरण पावला.
हे प्रभो जर तुझ्या लोकांना माझी गरज असेल तर कष्ट करण्यात मी कधीही हयगय करणार नाही. तुझ्या पवित्र इच्छेप्रमाणे होवो.- संत मार्टिन
पहिले वाचन : तितास पत्र ३:१-७
वाचक : पौलचे तितास पत्र यातून घेतलेले वाचन
सर्वांनी सत्ताधीश आणि अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य आणि सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे. अशी सर्वांना आठवण दे. कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे आणि विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा आणि हेवा ह्यात आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र आणि एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणकर्ता देव ह्याची दया आणि मनुष्यांवरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान आणि पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुल प्रमाणात ओतला आहे, ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे सार्वकालिक जीवनाचे वारस व्हावे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र २३:१-६
प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे
१)परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो.
२)तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गानी चालवतो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टांस भिणार नाही. कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.
३)तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरले आहे.
४) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर, तू आपल्या सत्पथाने मला चालव, आलेलुया!
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १७:११-१९
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू येरुशलेमकडे चालला असता शोमरोन आणि गालील ह्यामधील एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, "अहो येशू गुरुजी, आम्हांवर दया करा, " त्याने त्यांच्याकडे पाहून म्हटले, "तुम्ही जाऊन स्वत:ला याजकांना दाखवा." मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो, असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णीत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, "दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊजण कोठे आहेत? ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? "आणि येशूने त्याला म्हटले," ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."

0 टिप्पण्या