Marathi Bible Reading | St. Leo the Great| 10th November 2020

Pope Leo I The Great  


सामान्य काळातील

बत्तिसावा सप्ताह 

संत लिओ महान ह्यांचा सण  

मंगळवार 

१० नोव्हेंबर २०२० 

"आम्ही केवळ नोकर आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे." 

संत लिओ महान हे १० नोव्हेंबर ४६१ साली मृत्यू पावले. त्यांनी केलेले बरेच लिखाण व प्रवचने धर्मगुरूंच्या दैनंदिन प्रार्थनापुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यांच्या विद्वतेमुळे ख्रिस्तसभेने त्याला धर्मपंडित हो पदवी दिली आहे.

"हे प्रभो, तुझा क्रूस हा सर्व आशीर्वाद यांचा उगम व सर्व कृपादानांचा झरा आहे. त्यामध्ये श्रद्धावंतांना दुर्बळतेत शक्ती, अपमानात गौरव व सन्मान आणि मृत्यूमध्ये जीवन लाभते. - संत लिओ महान"

पहिले वाचन : तितास पत्र २:१-८.११-१४

वाचक :  पौलचे तितास पत्र यातून घेतलेले वाचन 

सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती आणि सहनशीलता, ह्यांमध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे. त्या चहाडखोर, मद्यपान सक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतीवर आणि मुलांबाळांवर प्रेम करावे. त्यांनी मर्यादशील, शुद्धचरणी, घरकामात मग्न, मायाळू, आपआपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता आपणाला दाखव. शुद्धता, गांभीर्य आणि ज्याला दोष लावता येत नाही असे सदभाषण  ह्यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. ह्यासाठी की, विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. तो आपल्याला असे शिकवतो की, धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव आणि तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला आणि ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने आणि सुभक्तीने वागावे. त्याने स्वत:ला आपल्याकरिता दिले, ह्यासाठी की, त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वत:चे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ३७:३-४,१८,२३,२७,२९

प्रतिसाद : नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते.


१)परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करील.


२)नीतिमान लोकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते, त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे.


३)वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील तिच्यात ते सदैव निवास करतील.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात,

ती नेत्रांना प्रकाश देतात.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १७:७-१०

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, तुम्हापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल काय, "आताच येऊन जेवायला बस? उलट माझे जेवण तयार कर,माझे खाणेपिणे येईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा आणि पी, असे तो त्याला म्हणणार नाही काय? सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय ? त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, आम्ही सांगितलेल्या कामाचे नोकर आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.'

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
संत पॉल आजच्या पहिल्या वाचनात ख्रिस्ती माणसाने वर्तन कसे करावे. त्याविषयी विशेषतः वडीलजन वृद्ध पुरुष आणि स्त्रियांना मार्गदर्शन करीत आहे. वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती आणि सहनशीलता ह्यांमध्ये दृढ़ राहावे. त्यांनी तरुणांना बोध करावा. वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे, त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्या. तरुण स्त्रियांनी आपल्या पतीवर आणि मुलांबाळांवर प्रेम करावे. संत पॉलने दिलेला सल्ला व मार्गदर्शन आपल्याला नीतिमुल्यांची जोपासना करण्यासाठी प्रेरणादायी आहे. सध्या आपल्या समाजातील परिस्थिती बदलेली आहे. आजकाल वृद्धांचा सल्ला घेण्यास तरुणांना आवडत नाही. परंतु अनुभवी व वृद्ध व्यक्तीकडे जीवनाच्या अनुभवाची शिदोरी असते. त्यांनी प्रभूची आदरयुक्त भीती बाळगून समाजातील आपली प्रगती केलेली आहे. दैनंदिन जीवन जगत असताना कठीण परिस्थितीतसुद्धा ते आदर्श जीवन जगले. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला पौलाचे मार्गदर्शन योग्य ठरते. आजच्या शुभवर्तमानात सांगण्यात आले आहे. "आम्ही कोणत्याही मानास पात्र नसलेले सेवक आहोत. आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले." नोकर हा कधीच धन्याची जागा घेऊ शकत नाही पण धनी जेव्हा नम्र होऊन नोकराच्या बरोबरीला येतो, तेव्हा तो नोकराच्या प्रतिष्ठेचा आहे.

प्रार्थना -हे प्रभू येशू, सदाचाराने जीवन आचरण करण्यास व निष्ठेने
आमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास आम्हास कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या