"कुमारी गर्भवती होईल. तिला मुलगा होईल. त्याला इम्मानुएल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल."
आम्हाबरोबर किंवा आमच्यासह देव ही संकल्पना त्याकाळी न पटणारी| अशी होती, कारण देव आकाशात कुठेतरी उंच ठिकाणी आहे व त्याला आपण पाहू शकत नाही, असे त्यांना वाटत असे. पण देव आपल्या सर्व सुख:दुखात समरस होईल ही कल्पना व विचार म्हणजेच आम्हाबरोबर देव. म्हणूनच प्रभूयेश् ख्रिस्त सामान्य, गरिब, गरजवंत व दुःखी-कष्टी असलेल्या सर्वांबरोबर राहीला. त्याने भुकेल्यांस अन्न दिले, आंधळ्यास डोळे दिले, मुक्यास वाचा दिली, आजारी व भुतग्रस्त माणसांना निरोगी आणि बंधमुक्त केले, मेलेल्यांस जिवंत केले, सर्वांसाठी तारणारा, मुक्तीदाता, रक्षणकर्ता, सांभाळकर्ता असा परमेश्वर माणसांसाठी माणूस बनला. ह्या आगमनकाळात आम्हांबरोबर देव, इम्मानुएल च्या आगमनाची पुन्हा आपण एकदा वाट पाहत आहोत. पवित्र कुमारी मरीया व योसेफ ह्यांनी त्याच्या आगमनाची तयारी केली, असे आपण आजच्या शुभवर्तमानात पाहतो. आपल्या सर्वांच्या जीवनात नव्याने जन्म घेण्यासाठी प्रभूयेशू येत आहे. त्याला अंत:करणापासून स्वीकारण्यासाठी आपण तयारी करु या.
पहिले वाचन : यिर्मया २३:५-८
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
प्रभू म्हणतो, "पाहा असा काळ येणार आहे की, ज्यात दावीदच्या वंशवृक्षाला शुद्ध अंकुर फुटेल असे मी करीन. तो राजा म्हणून सुज्ञतेने राज्य करील. संपूर्ण देशभर तो न्यायनीती व सचोटी यांना उचलून धरील. प्रभूचे हे बोल आहेत. त्याच्या कारकिर्दीत यहुदाचे लोक सुरक्षित वावरतील. इस्राएलचे लोक शांतिसमाधानाने राहतील. 'प्रभू आमचे नीतिनिधान' असे नाव लोक त्याला देतील. "
प्रभू म्हणतो, "यास्तव पाहा, असे दिवस येणार आहेत की, इस्राएल लोकांची मिसर देशातून सुटका करणाऱ्या जिवंत प्रभूची शपथ, असे लोक म्हणणार नाहीत. त्याऐवजी उत्तरेकडच्या आणि ज्या देशात प्रभूने इस्राएल घराण्यातील लोकांना पांगवले होते तेथून त्यांना परत आपल्या मायदेशी आणणाऱ्या जिवंत प्रभूची शपथ, असे ते म्हणतील. मग ते आपल्या स्वत:च्या देशात राहतील."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७२: १-२,१२-१३,१८-१९
प्रतिसाद : त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल.
१) हे प्रभो, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे.या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे. म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील. तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल.
२)त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला तसेच गरजवंत आणि असहाय्य लोकांनादेखील तो सोडवील गरीब आणि गरजवंत ह्यांच्यावर तो दया करील, गरजवंताच्या जिवांचे तो रक्षण करील.
३) प्रभूदेवाला धन्यवाद असो. तोच इस्राएलचा देव, अलौकिक कृत्ये करतो. त्याचे थोर नाम सदासर्वदा सुवंदित असो. त्याचा महिमा साऱ्या भूतलावर पसरो आमेन ! आमेन !
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
सिनाय पर्वतावर मोशेला आज्ञा देणाऱ्या इस्राएल घराण्याच्या हे अधिपते, ये आणि आपले हात पुढे करून आमचे संरक्षण कर.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय १:१८-२४
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली:
त्याची आई मरीया हिचा योसेफशी वाड् निश्चय झालेला होता. पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच, पवित्र आत्म्याच्या योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने आपला वाड् -निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, “दावीद पुत्रा, योसेफ, आपली बायको म्हणू मरियेचा स्वीकार करायला भिऊ नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव 'येशू' असे ठेव. कारण तो आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे."
या घटना घटण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेष्ट्यामार्फत वदवले होते, "कुमारी गर्भवती होईल. तिला मुलगा होईल. त्याला इम्मानुएल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल."
मग योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आदेशाप्रमाणे त्याने मरियेचा स्वीकार केला.
प्रभूचे हे शुभवर्तमान...

0 टिप्पण्या