Marathi Bible Reading | St.Lazarus | 17th December 2020

      

गुरुवार 
 
१७ डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
तिसरा साप्ताह 

संत लाझरस ह्यांचा सणं
"त्याचे नाव सर्वकाळ राहो"

योहानच्या अकराव्या अध्यायात बेथानी येथील मार्था आणि मरिया ह्यांचा भाऊ लाझरस ह्याला मेलेल्यांतून जिवंत करण्याचा चमत्कार प्रभू येशूने केल्याचे विस्तृत वर्णन करण्यात आलेले आहे. मृतांतून पुन्हा उठविल्या गेलेल्या प्रभूच्या ह्या मित्राविषयी बायबलमध्ये आणखी काहीही माहिती उपलब्ध नाही. काही इतिहासकारांच्या मते तो संत पीटरबरोबर सिरिया येथे गेला. 

पॉव्हेन्स येथे संत मेरी माग्दालेनाविषयी जी दंतकथा प्रसिद्ध होती तिच्या संदर्भात पाश्चात्य ख्रिस्तसभेमध्ये लाझरसच्या घटनेची आठवण करण्यात आली. पोप बेनेडिक्ट नववे ह्यांनी एका पत्रात लिहिल्याप्रमाणे लाझरसला एका यंत्रविरहित बोटीमध्ये त्याच्या बहिणीसह बसविण्यात आले आणि गॉल देशाच्या वायव्येला सोडण्यात आले. तिथे त्याने मार्सेलिअस ह्या ठिकाणी हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. तिथेच त्याला महागुरूपद बहाल करण्यात आले आणि डॉमिशिअन राजाच्या कारकीर्दीत त्याला रक्तसाक्षीत्वाचे मरण आले. त्याला एका गुहेमध्ये पुरण्यात आले त्याच्यावरच पुढे संत व्हिक्टरच्या नावाने एक गुरूविद्यालय उभारले गेले.

पहिले वाचन : उत्पत्ती ४९:२.८-१०

वाचक :  उत्पत्ती  या पुस्तकातून घेतलेले वाचन

याकोबाने आपल्या मुलांना बोलावले व म्हटले, "याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका. तुमचा बाप इसरायल याच्याकडे कान द्या. हे यहुदा, तुझे बंधू तुला धन्यवाद देतील. तुझा हात तुझ्या शबूंची मानगुटी धरील. तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील. यहुदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबून बसला आहे. त्याला कोण छेडणार ? यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञांकित होतील."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ७२:१-२-४, ७-८,१७

प्रतिसाद : त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल.

१) हे प्रभो, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे. या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे. म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील, तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल.

२)देशाच्या सात्त्विकतेमुळे, जनतेला सुखसमृद्धी लाभो जनतेतल्या गरिबांना तो न्याय देवो. गरजवंतांच्या मुलाबाळांना मदत करो. 

३) त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. आणि चंद्र लोप पावेपर्यंत सर्वत्र शांती नांदेल. एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रार्यंत, युफ्राटीस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल.

४) त्याचे नाव चिरंजीव होवो, ते सूर्यासारखे अनंत टिको, त्याच्या नावाने लोक आपणाला धन्य म्हणोत, सर्व राष्ट्रे त्याच्या नावाला धन्यवाद देवोत.


जयगोष                                                                       

आलेलूया,आलेलूया !

सर्वसमर्थ परमेश्वराचा शहाणपणा, 

जो आपल्या शक्तीने आणि हळूवारपणाने सर्वांना हुकूम सोडतो,

त्याने येऊन आपल्याला सत्याचा मार्ग शिकवावा.

आलेलूया !

शुभवर्तमान 

मत्तय  १:१-१७

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

आब्राहामचा वंशज येशू ख्रिस्त, ह्याची वंशावळ: आब्राहाम हा इसहाकचा बाप, इसहाक याकोबचा, याकोब यहुदा व त्याचे भाऊ यांचा बाप, यहुदा, पेरेस आणि जेरह याचा बाप (यांची आई तामार) पेरेस हेसरोनचा, हेसरोन रामचा, राम अम्मीदाबचा, अम्मीनादाब नहशोनचा, नहशोन सलमोनचा, सलमोन बवाजचा बाप (बवाजची आई राहाब), बवाज ओबेदचा बाप (ओबेदची आई रुथ) ओबेद इशायचा आणि इशाय राजा दावीद याचा बाप.

दावीद शलमोनचा बाप होता (शलमोनची आई पूर्वी उरियाची बायको होती). शलमोन रहबामचा, रहबाम अबियाचा, अबिया आसाचा, आसा यहोशाफाटचा, यहोशाफाट योरामचा योराम उज्जियाचा, उज्जिया योथामचा, योथाम आहाजचा, आहज हिज्कियाचा, हिज्किया मनश्शेचा, मनश्शे आमोनचा, आमोन योशियाचा योशिया हा यखन्या आणि त्याचे भाऊ यांचा बाप, या काळात यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले.

बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर: यखन्या शलतीएलाचा बाप, शलतीएल जरुब्बाबेलचा, जरुब्बाबेल अबिहूदचा, अबिहूद एल्यकीमचा, एल्याकीम अज्जूरचा, अज्जूर सादोकचा, सादोक याखीम एलिहूदचा, एलिहूद एलाजारचा, एलाजार मत्तान, याकोबचा, याकोब योसेफचा बाप. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.

अशारीतीने आब्राहामपासून दावीदपर्यंत एकंदर चौदा पिढ्या, दावीदपासून बाबिलोन येथे हद्दपार होईपर्यंत चौदा पिढ्या, बाबिलोन येथे हद्दपार झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या झाल्या.


प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :
यहूदाच्या कुळात तारणाऱ्याचा जन्म होईल, सर्वजण त्याच्यापुढे नतमस्तक होतील व राष्ट्र त्याची आज्ञांकित होतील. असा इतिहास उत्पत्तीच्या पुस्तकाद्वारे आपण पहिल्या वाचनात ऐकतो. तोच इतिहास विस्तृतपणे शुभवर्तमानात देण्यात आला आहे. परमेश्वराने मानवाच्या तारणाची योजना पूर्वीपासूनच आखली होती. त्याची निवडलेली प्रजा व निवडलेल्या वंशाद्वारे तारणकर्ता जन्म घेणार होता. आब्राहामाच्या देवावरील विश्वासामुळे त्याचा वंश बहरला आणि बेचाळीस पिढ्यांच्या प्रतिक्षेनंतर येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. प्रदीर्घ काळ परमेश्वर त्यांच्याबरोबर राहून त्याच्या प्रजेचे रक्षण केले. येशू ख्रिस्ताची वंशावळ पाहून तो राजांचा राजा आहे हे सिद्ध होते. ख्रिस्त हा आपल्या सर्वांचा राजा आहे. ह्या राजाच्या आगमनासाठी सिद्ध होऊन त्याला शरण जाऊ या.

प्रार्थना -  हे प्रभू येशू, तुझ्या आगमनाची वाट पाहत असताना तुला आमच्या अंत:करणात स्वीकारण्यास पात्र बनावेत म्हणून तुझी कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या