Marathi Bible Reading | St. Adelaide | 16th December 2020

  

बुधवार  
 
१६ डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
तिसरा साप्ताह 

संत ऍडलेड विधवा हिचा सणं

"आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात आणि गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते."

प्रभू येशू आजसुद्धा अनेकांच्या जीवनात अद्भूत कृत्ये करीत आहे. ! त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व त्याला तारणारा म्हणून स्वीकारणाऱ्या सर्वांना  तो जीवनदान देत आहे. आपल्या सर्वांच्या जीवनातील सर्व अनिष्टांपासून आपले रक्षण व्हावे.  आपले परिवर्तन व्हावे आणि प्रभुच्या कृपेचा महान अनुभव आपल्याला यावा  म्हणून आपण अंतर्मुख बनून प्रभूला सर्वस्वी शरण जाऊ या.

पहिले वाचन : यशया ४५:६ब-८,१८.२१ ब२५

वाचक :  यशया  या पुस्तकातून घेतलेले वाचन

प्रभू म्हणाला, “मीच प्रभू आहे, माझ्याशिवाय अन्य कोणी देव नाही. प्रकाशाचा जनक मीच आणि अंधकाराचाही जनक मीच. कल्याण मीच करतो आणि अरिष्टही मीच आणतो. ह्या साऱ्या गोष्टी करणारा मी प्रभू आहे. हे आकाशा, वरून वृष्टी कर. धार्मिकतेचा पाऊस पाड. हे पृथ्वी, तू उघड, म्हणजे तारण आणि धार्मिकता ही रोपाप्रमाणे उगवतील. ह्या सर्वांचा जनक मी प्रभू आहे." आकाशाचा उत्पादन कर्ता देव प्रभू आहे. त्यानेच पृथ्वी बनवली. तिला आकार दिला आणि भक्कम केले. त्याने तिला उत्पन्न केले ते ती निर्जन राहावी म्हणून नव्हे तर लोकांनी तिच्यावर वस्ती करावी म्हणून. तेव्हा तो असे म्हणतो, "मी प्रभू आहे. माझ्याशिवाय न्यायी आणि तारणकर्ता इतर कोणी देव नाही.

पृथ्वीवरल्या सर्व लोकांनो, तुम्ही माझ्याकडे वळा आणि आपला उद्धार करून घ्या. "कारण मी अनन्य देव आहे. मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की, प्रत्येकजण माझ्यापुढे गुडघा टेकवील आणि माझ्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ आपल्या तोंडाने वाहील " माझ्या मुखातून सात्त्विकपणे निघालेला हा शब्द आहे त्यात बदल होणार नाही.

"न्यायनीती आणि सामर्थ्य केवळ प्रभूपाशीच आहे, असे माझ्यासंबंधी म्हणतील. ज्यांनी माझा द्वेष केला, ते लज्जित होऊन मला शरण येतील. प्रभूकडूनच इस्राएलच्या वंशजांना विजय आणि वैभव मिळेल."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८५: १०-१४

प्रतिसाद : हे आकाशा, वरून वृष्टी कर

१) प्रभूदेव काय म्हणतो ते मी ऐकेन, कारण तो आपल्या लोकांचे, आपल्या भक्तांचे क्षेमकुशल इच्छितो. त्याचे ऐश्वर्य आमच्या देशात नांदावे,

२)म्हणून त्याची भक्ती करणाऱ्यांचा उद्धार करायला तो सिद्ध असतो.दया आणि निष्ठा यांचा संगम झाला आहे. नीती आणि शांती यांचे मीलन झाले आहे. भूमीवर मानवी निष्ठा वर झेप घेत आहे. स्वर्गातून देवाची न्यायपरायणता खाली डोकावत आहे.

३) खरोखर, प्रभू आमची भरभराट करील. आमची जमीन आम्हाला पीकपाणी देईल. नीती त्याच्या आघाडीला राहील. शांती त्याच्या पावलांवर पाऊल टाकील.

जयगोष                                                                       

आलेलूया,आलेलूया !

परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा.

आलेलूया !

शुभवर्तमान 

लूक  ७:१६-२३

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

योहानने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारायला पाठवले की, "जो येणार आहे तो आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पहावी?" ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, "बाप्तिस्मा करणाऱ्या योहानने आम्हांला आपल्याकडे असे विचारायला पाठवले आहे की, जो येणार आहे तो आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? त्याच घटकेला येशूने पुष्कळ लोकांना रोग, पीडा आणि वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बऱ्याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती. मग त्याने त्यांना उत्तर दिले, "तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या योहानला जाऊन सांगा, आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात आणि गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय."

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :
ख्रिस्तसभेमध्ये प्रभूयेशूशिवाय अन्य देवाला स्थान नाही. परमेश्वर सांगतो मीच प्रकाश आणतो, मीच अंधःकार आणतो. सुखात आणि दुःखात मीच तुमच्याबरोबर असतो. मीच सर्वांचा उत्पादन कर्ता आहे. तुम्ही माझ्याकडे वळा  शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने शिष्याद्वारे प्रभूकडे विचारणा केली की, जो येणार आहे तो आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पहावी? म्हणूनच प्रभू येशूने सांगितले, मी आंधळे, पांगळे, कुष्ठरोगी यांना बरे केले ते योहानास जाऊन सांगा, जीवनात सुखात आणि आनंदात परमेश्वरावरील श्रद्धा डळमळीत होत नाही पण दुःखात आणि संकटात त्याच श्रद्धेला तडा जाऊन अन्य देवाच्या मागे जाण्याचा मोह होतो. पण परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रभशी एकनिष्ट राहायला हवे कारण न्यायनीती आणि सामर्थ्य केवळ प्रभूपाशीच आहे.

प्रार्थना -  हे प्रभू येशू, आमच्या जीवनात ये आणि आमच्या जीवनाचा ताबा घे, आम्हाला सर्व पापांपासून दूर कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या