Marathi Bible Reading | 15th December 2020

 


मंगळवार  
 
१५ डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
तिसरा साप्ताह 

संत वेनांशिअस फॉर्च्युनाटूस ह्यांचा सणं
( महागुरू, वर्तनसाक्षी) 
संत व्हेलेरियन ह्यांचा सणं
(महागुरू, रक्त साक्षी) 

"नाकेदार आणि वारांगना तुमच्याही अगोदर देवराज्यात जातील."

जे पश्चात्ताप करुन जीवन परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील असतात तेच खऱ्या अर्थाने देवाची इच्छा व आज्ञा पाळतात. आपण अनेकदा स्वत:ला धार्मिक, नीतिमान व भक्तिमान समजतो व समाजातील पापीजनांना तुच्छ समजतो, मात्र परमेश्वर पापी माणसांचे अंत:करण जाणतो. ख्रिस्ताचा आंतरिक स्पर्श झालेली व्यक्ति पापी असली तरी तिचे परिवर्तन शक्य आहे. आपण अंतर्मुख बनून आपले ख्रिस्ती जीवन खरोखरच देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो का ह्यावर चिंतन करु या.

पहिले वाचन : सफन्या   ३:१-२,९-१३

वाचक :  सफन्या  या पुस्तकातून घेतलेले वाचन

बंडखोर, भ्रष्ट आणि बलात्कारी नगरीचा धिक्कार असो. तिने वचन मानले नाही. बोध घेतला नाही. परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही. ती आपल्या देवासमीप आली नाही. मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन आणि परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नावाचा धावा एकचित्ताने करतील. कुशाच्या नद्यांपलीकडून ते माझ्या उपासकांना आणतील. ते माझ्या पांगलेल्यांची कन्या मला अर्पण म्हणून आणतील. ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करशील त्याविषयी त्या दिवसात तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही. कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणाऱ्यांना तुझ्यातून नाहिसे करीन. माझ्या पवित्र पर्वतावर तू यापुढे तोरा मिरवणार नाहीस. मी तुझ्यामध्ये नम्र आणि गरीब लोक राहू देईन. ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील. इस्राएलचे उरलेले जन काही अनिष्ट करणार नाहीत. लबाडी करणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळावयाची नाही. ते चरतील आणि विश्रांती मिळवतील. कोणी त्यांना भिववणार नाही.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३४:२-३, ६-७, १७-१९, २३,

प्रतिसाद : मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला.

१) मी प्रभूला सदासर्वदा धन्यवाद देईन त्याचे स्तवन सतत माझ्या मुखी असेल. प्रभूविषयीचाच अभिमान माझ्या मनी बसेल. हे ऐकून नम्र लोकांना आनंद होईल.

२) त्याच्याकडे पाहणाऱ्यांची मुद्रा तेजस्वी होते. त्यांचा चेहरा निराशेने पडणार नाही. मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला आणि माझी संकटे हरण केली.

३) वाईट करणार्यांची आठवणदेखील पृथ्वीवरून बुजवून टाकावी म्हणून प्रभू त्यांना विन्मुख होतो.सात्त्विक जन धावा करतात, प्रभू ऐकतो, तो सर्व संकटातून त्यांना सोडवतो.

४) ज्यांची कंबर खचली आहे अशांच्या जवळ प्रभू असतो. ज्यांचे अवसान गळाले आहे अशांचा तो उद्धार करतो. प्रभू आपल्या सेवकांचे प्राण वाचवतो. त्याला शरण जाणारे कुणीही दोषी ठरणार नाहीत.


जयगोष                                                                       

आलेलूया,आलेलूया !

पहा, आपला प्रभू त्याच्या लोकांचे तारण करण्यास येईल. जे त्याला भेटण्यासाठी सज्ज आहेत ते धन्य.

आलेलूया !

शुभवर्तमान 

मत्तय  २१:२८-३२

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

येशू मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांना म्हणाला, "तुम्हाला काय वाटते, सांगा बरे ? एका माणसाला दोन मुलगे होते. तो थोरल्याकडे गेला आणि म्हणाला, 'मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.' मुलाने उत्तर दिले, 'बाबा, मी जातो पण तो गेलाच नाही. बापाने मग जाऊन धाकट्याला तसेच सांगितले. धाकट्याने उत्तर दिले, 'मी नाही जात पण नंतर त्याला वाईट वाटले आणि तो गेला. मग या दोघांपैकी कुणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले?"ते म्हणाले, "धाकट्याने." येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला खरेच सांगतो, नाकेदार आणि वारांगना तुमच्याही अगोदर देवराज्यात जातील. योहानने तुमच्याकडे येऊन तुम्हाला सन्मार्ग दाखवला पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण नाकेदारांनी आणि वारांगनांनी ठेवला. तुम्ही हे पाहिले तरी नंतरही तुम्ही पश्चात्ताप केला नाही आणि विश्वासही ठेवला नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :
एखाद्या गोष्टीसाठी होकार किंवा नकार देणे हे प्रत्येकावर अवलंबून असते. पण तो दिलेला होकार किंवा नकार खरोखरच योग्य आहे का ? ह्यावर विचार करूनच पूढची कृती करायला हवी. कारण आपला निर्णय पाप व पुण्य ठरवित असतो आणि देवराज्यात जाण्यासाठी त्याचाच हिशोब द्यावा लागतो. माझा देवपिता माझ्याकडून चांगल्या कार्याची अपेक्षा करतो मग मी चर्चला दिलेली वचने पाळतो का? ख्रिस्तसभेमध्ये केवळ दिखावा म्हणून माझे कार्य असेल तर मला पुण्य कसे प्राप्त होईल? मला स्वर्गराज्य कसे मिळणार. उलट पापी लोक पश्चात्ताप करून देवाच्या जवळ जातील व देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगतील त्यांना नक्कीच स्वर्गराज्य बहाल होईल असा संदेश प्रभूयेशू देत आहे. प्रत्येकाला परमेश्वराचे पाचारण होत असते, त्या पाचारणाला आपण सामोरे जायचे की त्यापासून दूर जायचे, हे प्रत्येकावर अवलंबून आहे.

प्रार्थना -  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे पश्चात्तापी व परिवर्तनशील जीवन, जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या