Marathi Bible Reading | St. Dominic of Silos | 20th December 2020

   


रविवार   
 
२० डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
चौथा रविवार  

✝️संत डॉमणिक सिलोस ह्यांचा सण✝️ 
(वर्तनसाक्षी)

“हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.” 

सर्व संदेष्टे व देवाच्या तारणकार्य योजनेतील नेते, प्रणेते यांमध्ये आणि सर्व संतगणामध्ये मरियेचे स्थान महान आहे. मरिया सर्व मानदंडाच्या पलिकडे आहे कारण संत महात्म्यांमध्ये परमेश्वराच्या कृपेचा चमत्कार आपणास जाणवतो परंतु मरिया मातेमध्ये त्या विधात्याच्या परिपूर्णतचे दर्शन आपल्याला होते.  देवाची इच्छा हा एक अति मौल्यवान नियम मरियेने पाळला आणि ती देवपुत्राची माता बनली. प्रत्यक्ष परमेश्वर तिच्या उदरी जन्माला आला. ख्रिस्ताची माता होण्यासाठीच मरियेची निर्मिती देवाने केली होती. मरियेचे संपूर्ण जीवन  ख्रिस्त केंद्रित झाले होते. ख्रिस्तासंबंधी सर्व घटना मरियेने आपल्या अंत:करणात श्रद्धेने जपून ठेवल्या. सुख, दु:ख, मोह, कसोटी अशा सर्व वेळी मरिया परमेश्वरी इच्छेनुसार वागली आणि कृपापूर्ण स्त्री गणली गेली. जणू तिच्या जन्मापासून स्वर्गराणीच्या मुकूटपदार्यंत प्रभू तिच्या बरोबर राहिला. त्या कृपापूर्ण मरियेस कोटी कोटी प्रणाम. 

✝️

पहिले वाचन : २ शमुवेल ७:१-५,८ब-११.१६

वाचक :  शमुवेल  या पुस्तकातून घेतलेले वाचन

राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथान नामक संदेष्ट्यास म्हणाला, "पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे." नाथान राजास म्हणाला, "तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे." त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, जा, माझा सेवक दावीद ह्यास सांग, 'परमेश्वर म्हणतोः तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? तू माझ्या प्रजेचा, इसरायलचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणले, जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इसरायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यांस रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील आणि ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत. इसरायल लोकांवर मी शास्ते नेमले होते. त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यांस त्रस्त करत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत. तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की, मी तुझे घराणे कायमचे स्थापीन तुझे घराणे आणि तुझे राज्य ही तुझ्यापुढे राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८९:२-५,२७.२९

प्रतिसाद : प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन

१) प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन. तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल. तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.

२)“मी स्वत: निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे. माझा दास दावीद याला अभिवचन दिले आहे. तुझा वंश मी अबाधित ठेवीन. तुझे सिंहासन पिढ्यान्पिढ्या राखीन."

३) तो मला म्हणेल, "तूच माझा पिता, माझा देव, माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस." त्याच्यावरचे माझे प्रेम अढळ राहील. त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील.

दुसरे वाचन : १ रोमकरांस पत्र १६:२५-२७

वाचक :  रोमकरांस पत्र या पुस्तकातून घेतलेले वाचन

आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखाच्याद्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरून व माझ्या सुवार्तेप्रमाणे आणि येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यात समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे युगानुयुग गौरव असो ! आमेन.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयगोष                                                                       

आलेलूया,आलेलूया !

पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो.

आलेलूया !

शुभवर्तमान 

लूक  १:२६-३८

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गेब्रियल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.” ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, "मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दीवाद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही." मरीयेने देवदूताला म्हटले, "हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही." देवदूताना उत्तर दिले, "पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलिशबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही." तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो." मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :
पहिल्या वाचनात देवाने दावीदाबरोबर केलेल्या कराराचे स्पष्टीकरण मिळते. ह्याच दावीद राजाच्या वंशात तारणारा आला. प्रभूयेशूखिस्त जन्माला शुभवर्तमानात मरियेला देवाची योजना सांगितली तेव्हा ती गोंधळली. कुमारी अवस्थेत गर्भवती होणे ही कल्पनाच भयावह होती पण दैवी कृपा असल्यावर कसलीही भीती वाटत नाही. म्हातारपणात अलिशिबेला गर्भ राहिला आहे असे देवदूताने मरियेला कळविल्यावर देवाला काहीही अशक्य नाही ह्या विश्वासाने मरियेने आपले सर्वस्व देवाठायी अर्पण करून म्हटले, पहा मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो. प्रभूच्या जन्माची तयारी करीत असताना त्याच तारणाऱ्याच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मी सिद्ध आहे का? त्याच्या पाचारणाला होकार देण्यासाठी माझी श्रद्धा मजबूत आहे का? प्रभूच्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात घडो असे धैर्याने म्हणण्यासाठी मला सर्वस्वी प्रभूला शरण जायला हवे.

प्रार्थना -  हे परमेश्वरा, सर्व प्रकारच्या आपत्तीमध्ये आम्ही तुझा धावा करावा आणि तुझ्या इच्छेप्रमाणे वागावे म्हणून आमच्या बरोबर राहा, आमेन.

✝️

🙏श्रद्धावंतांच्या प्रार्थना🙏

धर्मगुरू : माझ्या बंधुभगिरनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आम्ही तयारी करीत आहोत. त्याच्या दयेची आपण कळकळीने याचना करू या . दीन जनांना सुवार्ता घोषित करण्यासाठी आणि पश्चातापी पाप्यांना बरे करण्यासाठी तो या जगात आला . आजच्या जगात त्याने पुन्हा यावे आणि सर्व गरजवंतांना मुक्तिदान द्यावे म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करू या.

प्रतिसाद : प्रभो, आमची प्रार्थना ऐक .

१ .आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी आपल्या सेवा कार्याद्वारे संपूर्ण मानवजातीला ख्रिस्ताचा मार्ग शोधण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करू या. 

२ .सर्व राजकीय नेत्यांनी देशाच्या विकासाबरोबर तळागाळातील लोकांसाठी कार्य करावे तसेच कोरोना विषाणुपासून सर्वांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.

३ .लवकरच आपण ख्रिस्त जयंती साजरी करणार आहोत म्हणून आपण सर्वांनी योग्यरित्या मनाची व अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करावी आणि ख्रिस्त आपला तारणारा ह्याला आपल्या जीवनात स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करू या .

४.जीवनात येणा-या प्रत्येक संकटाना मरियेप्रमाणे सामोरे जाण्यास परमेश्वराने आपल्याला धैर्य व सामर्थ्य द्यावे म्हणून म्हणून आपण प्रार्थना करू या. 

५. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराश्रित व निराधार लोकांना घडावा, कोरोना विषाणुपासून व सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे तसेच उद्या / आज विवाहबद्ध होणा-या वधूवरांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करू या .

थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या .

धर्मगुरू : हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्यापासून कोणीही दूर जाऊ नये आणि सर्वांनी आपले तारण प्राप्त करून घ्यावे अशी तुझी मानव जातीकडून अपेक्षा आहे . तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक . तुझ्या शांतीने तू जगाला मार्गदर्शन कर आणि मनःस्वास्थ्य व आनंद याद्वारे तुझ्या ख्रिस्तसभेला तुझी सेवा करू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूख्रिस्ताद्वारे करतो . आमेन .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या