Marathi Bible Reading | St. Peter Canisius | 21st December 2020

    


सोमवार  
 
२१ डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
चौथा सप्ताह  

✝️संत पीटर कनेशिअस ह्यांचा सण✝️ 
(वर्तनसाक्षी, धर्मपंडित)

स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य!” 

✝️

पहिले वाचन : गीतरत्न २:८-१४

वाचक :  गीतरत्न  या पुस्तकातून घेतलेले वाचन

हा माझा वल्लभाचा शब्द! पाहा तो डोंगरावरून उड्या टाकीत, टेकड्यावरून दौडत येत आहे ! माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे. पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे. तो खिडकीतून डोकावत आहे. तो झरोक्यातून पाहत आहे.

माझा वल्लभ मला म्हणाला, "माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, पाहा, हिवाळा गेला आहे. पाऊस संपून गेला आहे. पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत. पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे.

आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे. अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत. द्राक्षवेलीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे. माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये. अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशाला राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे, कारण तुझा कंठ मधुर आहे. तुझे मुख रम्य आहे.'

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३३:२ ३,११-१२,२०-२१

प्रतिसाद : प्रभूशी एकरूप होऊन आनंदित व्हा.

१) वीणेवर प्रभूच्या उपकारांचे स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्याकरिता एखादे नवे गीत गा. वीणेवर आपली कला पणाला लावा. आनंदाने गजर करा.

२)प्रभूची योजना सदैव टिकते त्याच्या मनातले विचार पिढ्यान्पिढ्या अढळ असतात. प्रभू ज्या राष्ट्राचा देव, तेच सुखी. प्रभूने त्यांना लोक म्हणून निवडलेले आहे.

३) आमच्या जिवाला प्रभूचा ध्यास लागला आहे. तोच आमचा सहाय्यकर्ता, आमची संरक्षक ढाल. आमच्या मनाला होणाऱ्या आनंदाचा उगम त्याच्याच ठायी आहे. त्याच्या पवित्र नामावर आमचा भरवसा आहे.


जयगोष                                                                       

आलेलूया,आलेलूया !

सकाळच्या नक्षत्रा, चीरप्रकाशाच्या तेजा, नीतिसूर्या, ये आणि अंधारात राहाणाऱ्यांना आणि मृत्यूच्या छायेत असलेल्यांना प्रकाशित कर.

आलेलूया !

शुभवर्तमान 

लूक  १:३९-४५

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावाला त्वरेने गेली आणि जखर्याच्या घरी जाऊन तिने अलिशबेला अभिवादन केले. अलिशबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने हालचाल केली व अलिशबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च काढून मोठ्याने बोलली, "स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल."

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :
पवित्र आत्म्याच्या कृपेने परिपूर्ण असलेली मरिया अलिशिबेची सेवा करण्यासाठी गेली. अलिशिबासुद्धा मरियेच्या आगमनाने पावन झाली आणि तिने प्रभूची माता म्हणून तिचा गौरव केला. पवित्र मरिया देवमाता असूनसुद्धा दुसऱ्याच्या सेवेसाठी धावून गेली. तिने आपले सर्वस्व देवाला वाहिले. तिच्या हृदयांतून दुःखाची तलवार आरपार गेली तरी तिच्या श्रद्धेला तडा गेला नाही. ती ख्रिस्ती श्रद्धेचा एक आदर्श आहे म्हणूनच ती आपल्या सर्वांची आई बनली. पवित्र मरियेसारख्या निःस्वार्थी सेवेची आज जगाला गरज आहे. सेवेचे बुरखे पांघरणारे स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. म्हणूनच पवित्र मरियेसारखे सेवामय, प्रार्थनामय आणि श्रद्धामय जीवन जगण्यासाठी, प्रभूच्या तारणदायी रहस्यामध्ये सहभागी होण्यासाठा, पवित्र मरियेचे अनुकरण करून देवावरील आपली श्रद्धा दृढ होण्यासाठी पवित्र मरियेची मध्यस्थी मागू या.

प्रार्थना -  हे प्रभू परमेश्वरा, श्रद्धेने व निष्ठेने तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या